चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला बळकटी

चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला बळकटी
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला बळकटी

पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा दीर्घकालीन पिकांबरोबर हंगामी भाजीपाल्याचे योग्य नियोजन केले आहे. केवळ एका पिकावर अवलंबून राहण्याऐवजी वर्षभर हातात पैसे खेळत राहतील याकडे हरपवडे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथील दिलीप धोंडिराम चौगले या युवा शेतकऱ्याने लक्ष पुरवले आहे. पिकांतील वैविध्यासह विक्रीसाठी वेगवेगळे प्रयोग केल्याने अधिक फायदा मिळविण्यात त्यांना यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हरपवडे (ता. पन्हाळा) येथील दिलीप धोंडिराम चौगले (वय ३५) यांची डोंगर उतार व नदीकाठ अशा दोन ठिकाणी विभागलेली पाच एकर शेती आहे. डोगर उतारावर नाचणी, गवतवर्गीय चारा पिके, तर नदीकाठच्या क्षेत्रात ऊस, केळी, आले यासह भाजीपाला पिके घेतली जातात. चौदा गुंठ्यांतील वैविध्य चौगले यांनी आपल्या पाच एकर शेतीचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक केले आहे. एकूण क्षेत्रापैकी नगदी पिके म्हणून ऊस साठ गुंठे, केळी चौदा गुंठे, तर आले दहा गुंठे क्षेत्रावर घेतले आहे. त्यांची खरी प्रयोगशीलता चौदा गुंठ्यांत दिसून येते. अगदी छोट्या शेतीतून नफा कसा मिळवावा याचे उदाहरण म्हणून या शेतीकडे पाहता येईल. गेल्या चार ते पाच वर्षापासून एक फायदेशीर पीक पॅटर्न बसवला आहे. पाच एकरांपैकी माळभागावरील एका पट्ट्यात सौर ऊर्जेचा वापर करून सिंचनाची सोय केली आहे. तिथे कोबी, भुईमूग, वांगी, मिरची, बियाण्यांसाठी हळद आदी पिके घेतली आहेत. उसाच्या पट्ट्यात दोन्ही बाजूंनी दर आठवड्याला पीक काढणीला येईल अशा बेताने या पिकांच्या लागवडीचे नियोजन केले जाते. या सगळ्या पिकांची लागवड साधारणत: ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. नोव्हेंबरच्या मध्यापासून पिकांची काढणी सुरू होते. साधारणत: दर आठवड्याला शंभर गड्डे कोबी, पाच किलो मिरची व आले विक्रीसाठी काढले जातात. या उत्पादनाच्या विक्रीसाठी वेगळा दृष्टिकोन वापरला आहे. हरपवडे गावाशेजारी अनेक गावे असून, या गावाच्या तिठ्यांवर अनेक चायनीज खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तयार झाले आहेत. या स्टॉलधारकांना कोबी, मिरची आणि आले यांची आवश्यकता असते. हा सर्व ताजा शेतीमाल सुमारे सहा स्टॉलधारकाना पुरवतात. साधारणपणे कोबीचा एक गड्डा दहा ते बारा रुपये, आले प्रति किलो ८० रुपयांपर्यंत, तर ओली मिरची ४० रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होते. त्याचप्रमाणे सकाळी दूध डेअरीजवळ उभे राहून काही भाजीपाल्याची विक्री केली जाते. या सर्व विक्रीतून आठवड्याला किमान पाच ते सहा हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करत असल्याने भाजीपाला अधिक दिवस चांगला राहत असल्याचे दिलीप सांगतात. साधारणपणे जानेवारीपर्यंत हा सिलसिला सुरू राहतो. या अडीच ते तीन महिन्यांमध्ये चौगले कुटुंबीयांना पन्नास ते साठ हजार रुपयांची प्राप्ती यातून होते. बहुतांश दैनंदिन खर्चाची तजवीज यातून होते. या पिकांच्या काढणीनंतर जानेवारीत तिळाची लागवड केली जाते. घरच्यापुरते तीळ ठेवून सुमारे दोन क्विंटल तिळाचे उत्पादन निघते. प्रतिकिलो १२० ते २०० रुपयांपर्यंत त्यास दर मिळतो. या सर्व पिकांच्या सिंचनासाठी ठिबक व पाटपाणी या दोन्ही पद्धतींचा अवलंब केला जातो. भाजीपाला पिकांच्या व्यवस्थापनामध्ये रासायनिक खते टाळली जातात. कीड रोगांच्या नियंत्रणासाठी सेंद्रिय घटक, उदा. निंबोळी अर्क, कडूलिंब पाला, गोमूत्र, हाताने ढवळलेले ताक यांची फवारणी केली जाते. प्रतिबंधात्मक फवारणीमुळे रोग किडीचा फारसा प्रादुर्भाव होत नाही आणि खर्चामध्ये मोठी बचत होत असल्याचा चौगले कुटुंबीयांचा अनुभव आहे. उसाच्या बियाणे प्लॉटमुळे नफ्यात वाढ याव्यतिरिक्त साठ गुंठे क्षेत्रावर चौगले कुटुंबीयांनी को ८६०३२ व को ३१०२ या जातीच्या उसाची लागवड केली आहे. बहुतांशी ऊस परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाण्यांसाठी तोडला जातो. प्रति ऊस पाच रुपये या प्रमाणे ही विक्री होते. साधारण: चाळीस ते ५० टन इतके उत्पादन उस शेतीतून मिळते. कृषी विभागाने आत्माअंतर्गत मिळालेल्या ८६०३२ च्या ऊस बेण्याची लागवड एक एकर क्षेत्रामध्ये केली आहे. बियाण्यांसाठी ऊस विक्री केल्यामुळे कारखान्याला जाणाऱ्या उसापेक्षा अधिक रक्कम मिळते. ऊस शेतीतून त्यांना दीड ते पावणेदोन लाख रुपये उत्पन्न मिळते. दर्जेदार ऊस बियाण्यांच्या निर्मितीसाठी बीजप्रक्रियेसह शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला जातो. केळीची अनोख्या पद्धतीने विक्री चौदा गुंठे क्षेत्रावर जी ९ जातीच्या केळीची लागवड आहे. या केळीच्या विक्रीसाठी त्यांनी अनोखी पद्धत वापरली. हरपवडे गावाच्या परिसरात सुमारे तेरा शाळा आहेत. या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत मुलांना केळी देण्याविषयी त्यांनी आग्रह धरला. पंधरा दिवसातून एकदा या प्रमाणे शाळांना मागणीनुसार दहा डझनपर्यंत केळी पुरवली जातात. सरासरी वीस रुपये डझन दर मिळतो. ही रक्कम साधारण एक महिन्यानंतर मिळते. प्रत्येक शाळेपर्यंत केळी पोचवण्यासाठी गाडीमध्ये थोडी सुधारणा करून घेतली आहे. या पद्धतीतून केळीच्या विक्रीसाठीचे व्यापाऱ्यांवरील अवलंबन कमी होण्यास मदत झाली आहे. केळीपासून वर्षातून नव्वद हजार ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. महापुराच्या नुकसानीनंतरही दाखवली जिद्द कोल्हापूर जिल्ह्याला ऑगस्टमध्ये महापुराचा मोठा दणका बसला. या महापुरात त्यांचे अठरा गुंठे क्षेत्रातील भात पीक पूर्णपणे बुडून खराब झाले. सुरवातीला वाईट वाटले, तरीही निराशा टाळत त्वरीत पुढील पिकाचे नियोजन सुरू केले. पाणी ओसरल्यानंतर खराब झालेले पीक काढून टाकले. वाफसा आल्यानंतर शेत तयार करून पोकळा व वरणा शेंगेची लागवड केली. लाल माठ (पोकळ्याचे उत्पादन निघाले असून, पावटा (वरणा) शेंगेचे उत्पादन काही दिवसांत हाती येईल. या सकारात्मक दृष्टिकोनामुळे महापुराच्या नुकसानीची तीव्रता कमी होण्यास मदत झाली. पत्नी रेखा यांची साथ दिलीप यांना शेतकामात पत्नी रेखा यांची मोठी साथ मिळते. पहाटे पाचला दोघांचाही दिवस सुरू होतो. त्यांच्याकडे दोन म्हशी असून, त्यांचे चारा पाणी, धारा इ. व्यवस्थापन झाल्यानंतर दोघेही आठ वाजता शेतात जातात. दुपारी बारापर्यंत शेतकामे केल्यानंतर काही काळ विश्रांती घेतात. त्यानंतर सायंकाळपर्यंत पुन्हा शेतात कामे करतात. आवश्यकतेनुसार मजुरांची मदत घेतली जात असली तरी बहुतांश वेळा भाजीपाल्याची काढणी व अन्य कामे स्वत: करण्याकडे कल असतो. विविधतेने आर्थिक ताण होतो हलका साधारणत: चौगले कुटुंबीयांना केळीतून वर्षाला एक लाख, कोबीतून वीस हजार, तर उसातून अडीच लाख रुपये मिळतात. सर्व खर्च वजा जाता साधारणत: दीड ते दोन लाख रुपयांचा नफा राहातो. कोणत्याही एकाच पिकावर अवलंबून राहण्यापेक्षा पिकांतील वैविध्यामुळे दरातील चढ उतारामुळे येणारा ताण कमी होण्यास मदत होते. एखाद्या पिकाला दर कमी मिळाला तरी दुसऱ्यातून त्याची भरपाई होते. या पूर्वी राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेमध्येही त्यांनी यश मिळविले होते. विविध पिकांची अधिक उत्पादकता मिळवितानाच सेंद्रिय घटकांच्या वापरातून खर्चामध्ये बचत साधण्याचा प्रयत्न असतो.  

ऊस, केळी आणि आल्यासारखी नगदी पिके एका बाजूला घेताना वर्षभर हातात पैसा खेळत राहायला हवा, या उद्देशाने अर्धा ते एकर क्षेत्रामध्ये वेगवेगळी पिके घेतो. उत्पादनापासून विक्रीपर्यंत सतत नवीन प्रयोग आणि सकारात्मकता यामुळे उत्पन्नामध्ये काही प्रमाणात तरी शाश्वतता आणता येत असल्याचा माझा अनुभव आहे. -  दिलीप चौगले, ९६३७८३९६२९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com