तीन महिन्यांनंतर परतली तेजी; बाजार उसळला

बाजारात अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाली आहे. मागील दोन-तीन वर्षांत मे महिन्यात बाजारात सर्वाधिक उंच पातळीची नोंद झाली आहे. - संजय नळगीरकर, संचालक, खडकेश्वर हॅचरीज, औरंगाबाद
पोल्ट्री समालोचन
पोल्ट्री समालोचन

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ब्रॉयलर्सच्या बाजारभावात आलेली मरगळ झटकली गेलीय. बाजाराने ८० चा आकडा पार केला असून, यापुढेही तेजीत सातत्य राहण्याचे चित्र आहे.  नाशिक विभागात शनिवारी (ता. २९) रोजी ८२ रु. प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारभावात तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासंदर्भात नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, ‘‘कडक उन्हाळ्याच्या प्रभावामुळे ब्रॉयलर पक्ष्यांचा वजनरूपी पुरवठा घटला आहे. सध्या बाजारात मोठ्या पक्ष्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे चालू आठवड्यांतही तेजीमध्ये सातत्य राहील. गेल्या तीन महिन्यांच्या मंदीच्या पार्श्वभूमीवर बाजाराला या तेजीची खूप गरज होती. ज्या शेतकऱ्यांनी उत्पादनात सातत्य राखले आहे, त्यांना या तेजीचा नक्कीच फायदा होईल.’’ सप्तशृंगी अॅग्रोचे संचालक मनोज कापसे म्हणाले, ‘‘बाजारभावाच्या वरच्या पातळ्यांवर पुरवठा वाढल्यामुळे गुजरात आणि मध्य प्रदेशातील रेट्स महाराष्ट्राच्या समकक्ष आले आहेत. मात्र पुढील दोन दिवसांत पुरवठा कमी होऊन महाराष्ट्राच्या तुलनेत पुन्हा शेजारी राज्यातील बाजार उंचावेल. उत्तर भारतात ओपन फार्मर्सची संख्या अधिक आहे. त्यामुळे तेथे दीर्घकाळ मंदी टिकत नाही. कारण मंदीत संस्थात्मक क्षेत्राच्या तुलनेत ओपन फार्मर्सची तग धरून राहण्याची क्षमता कमी असते. या पार्श्वभूमवीर, मंदीसह उन्हाळ्याच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील बाजार यापुढे तेजीत राहण्याची अपेक्षा आहे.’’ बाजार सुधारला, पण...  तज्ज्ञांच्या मते, बाजारभाव ८० रु. प्रतिकिलोच्या वर टिकला तरच तो किफायती आहे, असे म्हणता येईल. कारण सध्याच्या प्रतिकूल तापमानात ब्रॉयलर पक्षी टिकाव धरत नसून, सरासरी १५ ते २० टक्क्यांपर्यंत वजनरूपी उत्पादकता घटली आहे. यामुळे स्वत:चे ब्रीडर्स असलेल्या इंटिग्रेटर्सचा प्रतिकिलो उत्पादन खर्च ६५ रु. वर पोचला आहे. ओपन फार्मर्स आणि नॉन ब्रीडर्स इंटिग्रेटर्सचा प्रतिकिलो खर्च तर अनुक्रमे ७० आणि ७५ रु. च्या वर पोचला आहे. अशा परिस्थितीत जर ब्रॉयलर्स पक्ष्यांना प्रतिकिलो ८० रु. दर मिळत असला तरी तो किफायती नाही, असे म्हणावे लागेल. खडकेश्वर हॅजरिचे संचालक संजय नळगीरकर यांची निरीक्षणे पुढीलप्रमाणे : बाजारात अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाली आहे. चालू पंधरवड्यात बाजारभाव किफायती राहण्याची अपेक्षा आहे. १५ मेपासून अधिक मासारंभ आहे. श्रावण महिन्याप्रमाणेच अधिक मासात उपवास पाळले जातात. मासांहारी पदार्थांचा खप कमी होतो. ही बाब लक्षात घेऊन पोल्ट्री उद्योगाने संतुलित पुरवठ्याचे नियोजन केले आहे. दरवर्षी मेचा पहिला आठवडा बाजारभावाच्या दृष्टीने किफायती असतो. मागील दोन-तीन वर्षांत मे महिन्यात बाजारात सर्वाधिक उंच पातळीची नोंद झाली आहे. मागील आठवड्यात हॅचिंग एग्जचे दर दोन रुपयांनी कमी झाले, तर एका दिवसाच्या पिलाचे (चिक्स) दर स्थिर होते. अंड्यांच्या (टेबल एग्ज) दरात वर्षातील नीचांकी पातळीवरून दहा टक्क्यांची सुधारणा झाली आहे.  

प्रकार     भाव    परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर   ८२   प्रतिकिलो   नाशिक
चिक्स   ३५     प्रतिनग   पुणे
हॅचिंग एग्ज  २५.५  प्रतिनग मुंबई
अंडी    ३१५     प्रतिशेकडा   पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com