कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्य

कापूस गाठींचे उत्पादन कापसावरील प्रक्रिया मंद असल्याने कमी येईल. परंतु शेतकऱ्यांकडे साठा असणार आहे. चीन, बांगलादेशातून जूनमध्ये कापसाची मागणी येवू शकते. कारण देशाच्या कापसाचे दर सर्वात कमी आहेत. यामुळे निर्यात वाढेल. तसेच दरातही सुधारणा अपेक्षित आहे. - अरविंद जैन, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया
cotton jalgoan
cotton jalgoan

जळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) घट येणार आहे. याच वेळी गुजरातमध्ये ११ लाख तर महाराष्ट्रात आठ लाख गाठींनी घट होईल. देशात कापसाचा साठा विक्रमी स्थितीत म्हणजेच ५० लाख गाठींपर्यंत राहील, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. देशात कापसाचे ३५४ लाख गाठींपर्यंतचे उत्पादन २०१९-२० च्या हंगामात येईल, असा अंदाज सुरवातीला असोसिएशनने व्यक्त केला होता. परंतु कोरोनामुळे कापसावर मंदावलेली प्रक्रिया व नैसर्गिक कारणांमुळे हे उत्पादन तब्बल २४ लाख गाठींनी कमी होईल, अशी स्थिती आहे. ऑक्‍टोबर २०१९ ते एप्रिल २०२० यादरम्यान देशात ३२९ लाख गाठींचा पुरवठा होईल, अशी शक्‍यता सुरवातीला व्यक्त करण्यात आली होती. परंतु एप्रिलअखेर २८५ लाख गाठींचा पुरवठा  झाला आहे.  स्थानिक मागणीही कमी कापसाची स्थानिक मागणीदेखील कमी झाली आहे. त्यात देशांतर्गत वस्त्रोद्योगात ३३१ लाख गाठींची गरज किंवा वापर होईल, असा अंदाजही होता. परंतु हा वापर २८० लाख गाठींपर्यंत मर्यादीत राहणार आहे. अर्थातच सुमारे ५१ लाख गाठींचा वापर देशांतर्गत वस्त्रोद्योगात कमी होणार आहे. कोरोनामुळे वस्त्रोद्योग ठप्प आहे. कापूस निर्यात बंद आहे. कापड उद्योगही अडचणीत आहे. यामुळे देशात कापसाची उचल किंवा वापरही कमी होणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.  ४७ लाख गाठींची निर्यात शक्‍य देशातून ४७  लाख गाठींची निर्यात शक्‍य आहे. सुरवातीला असोसिएशनने ४२ लाख गाठींच्या निर्याचीची शक्‍यता व्यक्त केली होती. परंतु निर्यातीसाठी अनुकूल स्थिती तयार होत आहे. आशियातील काही देश कापसासाठी भारताकडे येतील, अशी शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे.  आयातीलाही फटका देशातील वस्त्रोद्योग ठप्प आहे. देशात उत्पादीत न होणाऱ्या पिमा, गिझा प्रकारच्या कापसाची आयात ऑस्ट्रेलिया, इजिप्त, तुर्की आदी देशांमधून केली जाते. तसेच अमेरिकेकडूनही काही ब्रॅण्डेड वस्त्रोद्योग कापसाची आयात करतात. देशात २५ गाठींची आयात होईल, असा अंदाज सुरवातीला होता. परंतु ही आयात १५ लाख गाठींपर्यंत मर्यादीत राहण्याची शक्‍यता आहे. मागील हंगामाच्या तुलनेत आयात १७ लाख गाठींनी कमी होणार आहे. देशातील कापूस उत्पादन (लाख गाठी) 

२०१८-१९ ३१२ 
२०१९-२० ३३० (अंदाज)

या राज्यांमध्ये असे घटणार उत्पादन (लाख गाठींमध्ये)

पंजाब ०.५०
हरयाना १.००
राजस्थान ०.५०
गुजरात ११.००
महाराष्ट्र ८.५०
आंध्र प्रदेश १.००
कर्नाटक २.००
एकूण घट २४.५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com