सांगली ः बेदाण्याचे झिरो पेमेंट (येणे-देणे व्यवहार) न केलेल्या १५ खरेदीदार व्यापाऱ्यांना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने बेदाणा सौद्यात भाग घेण्यास बंदी घातली आहे. येणे-देणे व्यवहार केल्यानंतरच त्यांना सौद्यात बेदाणा खरेदी करता येईल, असे सभापती प्रशांत शेजाळ यांनी स्पष्ट केले.
बेदाणा झिरो पेमेंट अंतर्गत खरेदीदार व्यापारी- अडते आणि अडते-शेतकरी यांच्यातील येणे-देणे व्यवहार, ई-नाम, शेतकरी नोंदणी यासंदर्भात बाजार समितीने सांगली- तासगाव बेदाणा मर्चंट्स असोसिएशनची बैठक घेतली.
या वेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ, सचिव पी. एस. पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मालू, जमनादास ठक्कर, कांतीभाई पटेल, राजू कुंभार, विनायक हिंगमिरे, सुशील हडदरे, पप्पू मजलेकर, शीतल पाटील आदी उपस्थित होते.
दिवाळी सुटीनंतर मार्केट यार्डात बुधवारी (ता. ८) बेदाणा सौद्यास सुरवात झाली. मात्र सौद्यास प्रारंभापूर्वी बाजार समितीने बैठक घेतली. पंधरा खरेदीदार व्यापाऱ्यांकडे अडत्यांचे सुमारे ४० लाख रुपये अडकले आहेत.
पंधरापैकी आठ व्यापाऱ्यांकडे तीन महिने पैसे अडकले असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, हे पैसे जमा करेपर्यंत १५ व्यापाऱ्यांना बैदाणा सौद्यात सहभाग घेता येणार नाही, असे सभापती शेजाळ यांनी स्पष्ट केले.
संबंधित व्यापाऱ्यांनी अडत्यांना तातडीने पेमेंट करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एखाद्या शेतकऱ्याने ॲडव्हान्स घेऊन दुसऱ्याच व्यापाऱ्याला बेदाणा विकला तर ॲडव्हान्स घेतलेल्या व्यापारी/अडत्याचे पैसे परत करेपर्यंत बेदाणा पट्टी रोखण्याचा निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली.