थकवा, क्षीण दूर करणारे बहुगुणी डाळिंब

थकवा, क्षीण दूर करणारे बहुगुणी डाळिंब
थकवा, क्षीण दूर करणारे बहुगुणी डाळिंब

भाज्यांबरोबर फळेही आरोग्यासाठी उत्तम असतात. सफरचंद, संत्री, मोसंबी या फळांबरोबरच डाळिंब हे उत्कृष्ट फळ मानले गेले आहे. निसर्गाने यात अनेक औषधी गुणधर्म ओतप्रोत भरल्याने उत्तम आरोग्य निर्माण करण्याची क्षमता डाळिंबामध्ये असते.

डाळिंब हे मुळातच पित्तशामक आहे. त्यामुळे आंबट पाणी घशाशी येणे, जळजळणे, चक्कर येणे, उलट्या अशा लक्षणांमध्ये रोज १ डाळिंब जरूर खावे. तहान लागणे, ऊन सहन न होणे, एकदम गळून जाणे या तक्रारींवर डाळिंबाचे दाणे खाल्ल्यास त्वरित फायदा दिसतो. हृदयविकार असणाऱ्यांनीही डाळिंब जरूर खावे. बऱ्याचदा वेळी-अवेळी जेवण झाले, की अजीर्ण होते. अशावेळी पूर्ण लंघन (उपवास) करावे, पण या उपवासात डाळिंब भरपूर खावे. पोळी-भाजी-भात याला सुटी द्यावी.

डाळिंबाच्या रसात जिरेपूड, मीठ घालून घेतल्यासही चांगला उपयोग होतो. लग्नकार्य, घरगुती समारंभ यांत बाहेरचे भरपूर खाणे होते. बाहेरगावी कार्य असेल तर हवाबदल, पाणीबदल होतो. त्यामुळे पोट बिघडते. अशावेळी डाळिंबाच्या फळाची साल, सुंठ पावडर, बडीशेप पाण्यात उकळून ते पाणी ३-४ वेळेला गरम स्वरूपात प्यावे. त्यामुळे पोटदुखी, जुलाब कमी होतात. डाळिंबाच्या सालीचा तुकडा तोंडात धरल्याने किंवा साल वाळवून त्याची पावडर मधातून घेतल्याने खोकल्यावरही चांगला परिणाम होतो.

डाळिंब सेवनाचे फायदे

  • डाळिंब थकवा दूर करणारे आहे. अतिश्रम, प्रवास, तापानंतरचा येणारा थकवा यासाठी डाळिंबाचे दाणे किंवा रस फार उपयोगी पडतात. त्याने उत्साह वाढतो.
  • डाळिंबापासून दाडीमावलेह हे औषध तयार केले जाते. तेदेखील थकवा आणि पित्त कमी करते. दाडीमादी घृत, दाडीमाष्टक चूर्ण अशी अनेक औषधे डाळिंबापासून तयार केली जातात, पण प्रत्येक व्याधीनुरूप त्याची मात्रा वेगळी असल्याने त्यानुरूप प्रमाण ठरवावे लागते. शिवाय काही औषधांत साखरेचे प्रमाणही असते.
  • शुगरचा त्रास असताना अशी औषधे विचारपूर्वक योजावी लागतात. म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. डाळिंबाच्या फळाच्या सालीप्रमाणे त्याच्या मुळाची सालही औषधी असते. पोटातल्या जंतासाठी वावडिंगाबरोबर मुळाची साल पाण्यात उकळून प्यायल्यास चांगला फायदा होतो.
  • याचाच अर्थ सर्व पित्तप्रकृतीच्या, उष्णतेचा त्रास असणाऱ्यांसाठी डाळिंब हे वरदान आहे. कोणत्याही जातीचे डाळिंब असले तरी उपयुक्तच असते. गर्भारपणामध्ये, सुतिकावस्थेतही डाळिंब आईसाठी आणि बाळासाठी उत्तम कार्य करते. शहाळे, लिंबू सरबत याला डाळिंबाचा रस हा उत्तम पर्याय आहे. फक्त ते गोड आणि व्यवस्थित पिकलेले रसदार असायला हवे.
  • महिलांना एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शिवाय मुलांचे संगोपन, कुटुंबाची काळजी या महत्त्वाच्या गोष्टी असतातच. अशावेळी दमछाक होऊन आलेला शीण कमी करण्यासाठी डाळिंब जरूर खावे.
  • लेखीका पुणे येथे अायुवेर्द तज्ञ अाहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com