शेततळ्यांतील मत्स्यशेतीचे ‘बेडग मॉडेल’

शेततळ्यांतील मत्स्यशेतीचे ‘बेडग मॉडेल’
शेततळ्यांतील मत्स्यशेतीचे ‘बेडग मॉडेल’

जिथं एका एका पाण्याच्या थेंबासाठी वणवण हिंडावे लागत, तेथे आज पाण्याने काठोकाठ भरलेली शेततळी दिसत आहेत. याच शेततळ्याच्या माध्यमातून यंदा मिरज आणि तासगाव तालुक्यांतील १६० शेतकऱ्यांनी मत्स्यपालन उद्योग सुरू केलाय, अन्‌ त्यांनी आता शेतकरी कंपनीसुद्धा स्थापन केलीय..! मिरज तालुक्यातील बेडग गाव. या गावातून म्हैसाळ योजनेचे पाणी पुढे जाते. परंतु, अनेक भागांत योजनेचे पाणी आले नाही. आज गावात पिके हिरवीगार दिसत आहे, ती केवळ जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांकडे शेततळे म्हणून. गावात सुमारे ८०० हून अधिक शेततळी आहेत. पानमळे ऊस, द्राक्ष, भाजीपाला या पिकांना या शेततळ्यातील संरक्षित दिले जाते. मात्र, येथील नावीन्यपूर्ण विचारांना प्राधान्य देणारे शेतकरी येथेच थांबले नाहीत, त्यांनी शेतीपूरक म्हणून या शेततळ्यांत मत्स्यपालनाचा विचार सुरू केला. गावातील रवींद्र शेळके आणि राजाराम खरात यांनी सांगलीतील मत्स्य विभागाकडून तांत्रिक माहिती, तर संजीव मिश्रा आणि बुधाजी डामसे यांच्याकडून मत्स्यपालनाची माहिती घेतली, अन्‌ सुरू झाला मत्स्यपालनाचा अध्याय...

शेततळ्यात पाणीसाठा असल्याने शेवाळ तयार होते. शेवाळामुळे मोटार आणि ठिबकच्या लॅटरल खराब होतात. त्याचा खर्च वाढतो. तळ्यात मासे सोडल्याने मासे शेवाळ खातात. मोटार आणि ठिबकच्या लॅटरलवर होणारा खर्च कमी झाला. त्यातच माशाची विष्ठा पाण्यात मिसळली जाते. हे पाणी शेतीसाठी चांगले ठरते... हे चक्र समजताच, या पूरक व्यवसायातील शेतकऱ्यांचे गट तयार केले आहेत. त्याची नोंदणीदेखील करून ते गट ‘जीपीएस’ला जोडली आहेत. यामुळे बाजारपेठ, तांत्रिक अडचणीवर मात करणे सोपे झाले झाल्याची माहिती श्री. खरात यांनी दिली.

कुडाळ येथील मत्स्य विद्यापीठात भेट देऊन प्रशिक्षण घेतले. त्यामध्ये गटाचे अध्यक्ष आणि सचिव सहभागी झाले आणि शेततळ्यातील मत्स्यपालनाला सुरुवात झाली. सततच्या दुष्काळामुळे शेती जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी शेततळी घेतली होती, याच शेततळ्यात मत्स्यपालन उद्योग सुरू केला. या उद्योगातून शेतीचा खर्च भागतोच आहे, शिवाय वर्षअखेरीस काही पैसे शिल्लक राहत आहेत. शेतकऱ्यांची कष्टाची तयारी, शासकीय योजनांची साथ आणि आत्मा विभागाचे मार्गदर्शनामुळे शेततळी हा संकटकालीन पर्याय मत्स्यपालनासारख्या पूरक उद्योगाला आधार ठरला आहे. एवढ्यावर हे शेतकरी थांबले नसून, ‘सांगली जिल्हा फिश फार्मिंग ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी’ स्थापन करून पुढील दिशाही निश्‍चित केली आहे. आत्मा विभागाने दिली जोड शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देणे गरजेचे होते. त्यामुळे मिरज येथील आत्मा विभागाने शेतीपूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन निवडला. याकरिता शेतकऱ्यांसाठी मत्स्य शेतीशाळेचे आयोजन केले. त्यामध्ये त्यांना मत्स्यपालनाची तंत्रज्ञान दिले. गेल्या वर्षी ४० शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर शेतीपूरक व्यवसाय सुरू केला. हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मत्स्यपालनाकडे कल वाढला आहे. थेट मार्केटिंगने अधिक फायदा गेल्या वर्षी मुंबई येथील व्यापाऱ्याशी संपर्क केला होता. परंतु, त्यांना पाहिजे तितके मासे उपलब्ध नव्हते. परिणामी गटाने स्थानिक व्यापाऱ्यांना मासे विक्री केली. यंदा मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असून, त्यांच्या विक्रीचे नियोजन केले जात आहे. जिवंत मासे ग्राहकापर्यंत देण्याचा मानस आहे. मासे वाहतुकीसाठी शीतवाहनांची खरेदी करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून रोजगाराला चालना मिळेल. मत्स्यपालनाला अनुदान जिल्हा नियोजन विकास समितीकडून सन २०१९-२० साठी या योजनेतून नावीन्यपूर्ण बाबीतून शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जाहीर केले आहे. मत्स्यबीज, त्यासाठी लागणारे खाद्य अनुदानातून मिळणार आहे. त्यामुळे खर्चात बचत होईल. माशांचे प्रकार

  • मृगल, कटला, रोहू
  • मिळणारा दर प्रतिकिलोस ः ८० ते ११० रुपये
  • विक्री ः शेततळ्यावरून स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी
  • शेततळे ः १० गुंठ्यात
  • पाणी साठवण क्षमता ः २५ लाख लिटर
  • उन्हाळ्यात पाणी साठवण ः ७ ते ८ लाख लिटर
  • एका शेततळ्यात २ हजार मत्स्यबीज सोडले जाते
  • यामुळे माशांची वाढ चांगली होते
  • ७५० ग्रॅम पासून ते दीड किलोपर्यंत मासे मिळतात
  • एका गटात २० शेतकरी
  • मत्स्यासाठी लागणारे खाद्य स्वतः शेतकरी करतात.
  • यंदापासून मत्स्यबीज हॅचरी गटातील एका सदस्याने सुरू केली आहे. त्यामुळे दर्जेदार मत्स्यबीज मिळण्यास मदत होणार आहे.  
  • तालुकानिहाय गट आणि शेतकऱ्यांची संख्या
    तालुका गट शेतकरी संख्या
    मिरज १६०
    तासगाव ६०
    एकूण १० २००

    .

    शेतीला पूरक उद्योग हवाच. त्याशिवाय उत्पन्न दुप्पट होणार नाही. त्यामुळे आम्ही मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. गेल्या वर्षी आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. माझ्याकडे शेततळे नसल्याने मला मत्स्यपालन करता आले नाही. यंदा मी शेततळे घेऊन मत्स्यबीज शेततळ्यात सोडले आहे. - राजाराम खरात, बेडग, ता. मिरज. मोबा. ९८५००४१६५८, ९८३४४९८४०७

    .... मत्स्यपालनाचे तंत्रज्ञान मिळाल्याने गेल्या वर्षी मत्स्यपालन केले असून, यामुळे माझ्या उत्पन्नात वाढ झाली. मुळात जागेवर खरेदी आणि रोख पैसे मिळत असल्याने या वर्षी आणखी एक शेततळे घेऊन त्यात मत्स्यपालन करण्याचे नियोजन आहे. - रामचंद्र खाडे बेडग, ता. मिरज. .... आत्मा मिरज मार्फत शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्याचे तंत्रज्ञान बांधावर दिल्याने शेतकऱ्यांनी शेततळ्यात मत्स्यपालन करण्यासाठी वळले आहेत. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी स्वखर्चातून मत्स्यपालन सुरू केले आहे. यंदा जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांना हा प्रकल्प दाखवला. त्यांनी मत्स्यपालनासाठी अनुदान देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. - मुकुंद जाधवर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com