पाण्याचे बचत गट बनवून दुष्काळ हटविणारे काऱ्होळ

पाणी आल्यानं मोडलेल्या फळबागा पुन्हा उभ्या करणार. गावात पाण्याचे बचत गट निर्माण केले आहेत. निर्माण झालेल्या पाणीसाठ्यात गाळ साठणार नाही याची काळजी आम्ही गावकरी घेणार आहोत. -गणेशराव कुंडलिक खलसे, शेतकरी, काऱ्होळ संपर्क- ९७६५४७०५१४
काऱ्होळमध्ये जलसंधारणाच्या झालेल्या कामांचे दृश्य ड्रोनच्या साह्याने टिपले आहे.
काऱ्होळमध्ये जलसंधारणाच्या झालेल्या कामांचे दृश्य ड्रोनच्या साह्याने टिपले आहे.

अौरंगाबाद जिल्ह्यातील काऱ्होळ गावाने चक्क पाण्याचे बचत गट निर्माण केले आहेत. सुमारे बारा ते तेरा गटांनी केलेल्या कामांमधून पाण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. जलसंधारणाच्या कामातून साठलेल्या पाण्याचा उपसा होऊ न देणे, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा कार्यक्षम वापर हे उद्दिष्ट ठेवून गट कार्यरत आहेत. त्यातूनच शेती व पयार्याने गावच्या अर्थकारणालाच गती मिळून इथलं सारं शिवार हिरवंगार झालं आहे.   दुष्काळाची गडद छाया अनुभवणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही पाण्याची अवस्था तशी बेताचीच आहे. जिल्ह्यात मध्यम, लघू प्रकल्पातील पाणीसाठ्यांची अवस्था चिंता वाढविणारी होती. अशावेळी चार वर्षांपूर्वी पाण्यासाठी टोकाचा संघर्ष करावा लागलेल्या औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील काऱ्होळ गावात मात्र यंदा पाण्याची निश्चिंती आहे. सुमारे सहाशे हेक्‍टरवर विस्तारलेल्या गावशिवारातील सुमारे १७० विहिरींना जलसंधारणाच्या कामामुळे दहा ते बारा फुटांवर पाणी लागले आहे. लोकसहभागाची जोड काऱ्होळ गावशिवारात सेवा संस्थेच्या माध्यमातून दोन वर्षांत जलसंधारणाच्या कामाला लोकसहभागाची जोड मिळाली. या जोडीमुळे गावकुसातील विहिरींची पाण्याची पातळी दहा बारा फुटावर आलीय. गावशिवारात फळबाग, भाजीपाल्याचे क्षेत्र वाढीस लागले. गावाच्या आर्थिक गाड्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दुग्ध व्यवसायातही वृद्धिंगत होण्यास वाव मिळाला आहे. कायम पाण्याच्या चिंतेत असलेल्या गावकऱ्यांचा मोठा प्रश्न मिटल्याने गावपुढाऱ्यांना आता पाणी सोडून गावाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या इतर विषयांकडे लक्ष देण्यास खऱ्या अर्थाने वेळ मिळत असल्याचे चित्र आहे. जलसंधारणाच्या कामासाठी गावाची निवड काऱ्होळ गावालगत चवंड नावाची नदी असून तिला चार ओढे येऊन मिळतात. मात्र पडणारे पाणी ओढ्यातून नदीत व तेथून थेट वाहून जात असल्याने टॅंकरच्या पाण्याशिवाय पर्याय नव्हता. बागांनाही टॅंकरने पाणी देण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रतिकूल परिस्थिती पाहून गावाची निवड जलसंधारण प्रकल्पासाठी करण्यात आली. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने सीएसआर फंडाच्या माध्यमातून सन २०१५-१६ मध्ये प्रकल्पासाठी हे गाव सेवा संस्थेला दत्तक दिले. अशी झाली कामे

  • सेवा संस्थेच्या वतीने गावकुसाचे २०१५ मध्ये तांत्रिक सर्वेक्षण. त्यातून १५ जागा निवडल्या. त्यावेळी गावात १७० विहिरी असूनही त्यांना दोन-तीन फुटापर्यंत पाणी होते. उन्हाळ्यात या विहिरी कोरड्या पडत. बोअरवेल्सलाही शंभर ते दीडशे फुटांपर्यंत पाण्याचा थेंब नव्हता.
  • सर्वेक्षणातून २०१६ मध्ये चवंड नदीवर तीन जुन्या बंधाऱ्यांचे नाला खोलीकरण.
  • तीन कामांमध्ये जुन्या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने जवळचे बोअर्स व विहिरींना पाणी आले.
  • पहिल्या तीन कामांमुळे बराच फरक पडला. गावातील टॅंकर बंद झाले.
  • सन २०१७ मे महिन्यात एका बंधाऱ्यात चार ते पाच फूट पाणी उपलब्ध होते असे ग्रामस्थ सांगतात.
  • पहिल्याच वर्षी केवळ खोलीकरणाच्या कामात यश मिळाल्याने गावकऱ्यांचा उत्साह वाढला. सन २०१७ मध्ये नव्याने खोलीकरणाची नऊ कामे. त्यातून जवळपास जलक्रांतीच.
  • गावशिवारातील पाण्याचा थेंब नसलेल्या विहिरींना दहा ते बारा फुटांवरच पाणी दिसू लागलं.
  • ज्या विहिरी बुजवायच्या असं शेतकरी म्हणायचे त्यांना पाणी दिसू लागले.
  • गावात पाण्याचे बारा ते तेरा बचत गट. त्यातून जलसंधारणाच्या कामांना वेगाने चालना. प्रत्येक गटात १० ते १२ सदस्यांचा समावेश.
  • कामांची फलश्रुती

  • पूर्वी गावात दोन-तीन एकरच फळबाग होती. आता सुमारे नऊ हेक्‍टरवर द्राक्ष तर आठ हेक्‍टरच्या आसपास मोसंबी, १२ हेक्‍टरवर डाळिंब. त्यासाठी पाण्याची चिंता मिटली.
  • दोन वर्षांत सुमारे ५० ते ६० शेततळी. संरक्षित सिंचनाला शेतकऱ्यांकडून प्राधान्य. आजमितीला सुमारे २२ शेततळ्यांत स्वखर्चातून शेतकऱ्यांनी पन्नी टाकली.
  • गावकऱ्यांना शुद्ध जल प्रकल्पाच्या माध्यमातून अत्यल्प दरात पिण्याचे शुद्ध पाणी मिळते आहे. त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होत अाहे.
  • जलस्वयंपूर्णतेचे होत असलेले फायदे

  • गावात निर्माण होताहेत रोजगाराच्या संधी. शेंद्रा ‘एमआयडीसी’त रोजगारावर जाणाऱ्या मजुरांना मिळाले गावातच काम
  • रब्बी पिके घेण्याची संधी
  • नवी झाडे लावण्याचा उपक्रम
  • गावात दोन डेअरी. त्यामाध्यमातून सुमारे साडेतीन हजार लिटर दुधाचे दररोज संकलन.
  • चाराही उपलब्ध होत असल्याने दुग्धोत्पादनाला व शेतीच्या अर्थकारणाला चालना
  • प्रतिक्रिया पाण्यासाठी झुंजणाऱ्या आम्हा गावकऱ्यांना आता पाच रुपयांत वीस लिटर शुद्ध पाणी मिळू लागलं आहे. त्यामुळं आजारी पडण्याचं प्रमाणही घटलं आहे. -गणेश गुसिंगे संपर्क- ९७६४८४४६०२   शुद्ध पाणी देण्याचा प्रकल्प चालविण्याचं प्रशिक्षण घेतल्यानं रोजगार मिळाला. - गणेश राऊत, युवक, काऱ्होळ   जलसंधारणाच्या कामांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. पण पाण्याबाबत आता निश्चिंती झाली आहे. यात लोकसहभाग महत्त्वाचा ठरला आहे. -सचिन खलसे उपसरपंच, काऱ्होळ, ता. जि. औरंगाबाद संपर्क--९७६५००५५०६

    पाण्यासाठी सर्वाधिक त्रस्त असलेल्या महिलांमध्ये आता समाधान आहे. पाण्यासाठी एकाच पाणवठ्यावर उडणारी जीवघेणी झुंबड थांबली आहे. रामदास खलसे, ग्रामस्थ गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी काही लाख रुपये खर्च केले. आणखी कामे प्रस्तावित आहेत. पाण्याच्या बचत गटांपुढे जाऊन यापुढे गावाचं ‘वाॅटर बजेट’ तयार करून पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यावर भर राहील. -अरविंद येलम  प्रकल्प अभियंता, सेवा संस्था औरंगाबाद संपर्क- ७५८८१६२१२९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com