दुभत्या गाई-म्हशींमधील रोगांचा (Buffalo Cow Disease) प्रादुर्भाव हा जनावरांच्या (Animal) आरोग्य व दूध उत्पादनाला (Dairy Business) मारक ठरतो. त्यामुळे दूध (Milk) उत्पादनात घट येते. जनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचाराचा खर्च वाढतो. हे लक्षात घेऊन आजाराचा प्रसार टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गोठ्याची जैवसुरक्षितता हा एकमेव पर्याय आहे.
जैवसुरक्षितता म्हणजे काय?
दुभत्या गाई-म्हशी व इतर जनावरांतील जैवसुरक्षितता म्हणजे त्यांचे विविध प्रकारच्या जिवाणू, विषाणू, बुरशी तसेच इतर रोग पसरविणाऱ्या गोष्टींपासून संरक्षण करणे होय. रोग पसरविणारे विविध घटकांचा हवा, पाणी, खाद्य, चारा यांच्यासह आगंतुक माणसे, भटके श्वान, पक्षी व बाह्य परजीवी इत्यादींच्या माध्यमातून जनावरांमध्ये रोग प्रसार होतो.
जैवसुरक्षितता प्रणाली
गाई, म्हशींच्या व्यवस्थापनामध्ये गोठ्याची स्वच्छता, चारा आणि खुराक देण्याच्या वेळा, दूध काढण्यामधील अंतर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसेच २४ तास स्वच्छ पाणी, कुट्टी केलेला चारा, लसीकरण, जंतनिर्मूलन, शिफारशीत मात्रेमध्ये खनिज मात्रा, जीवनसत्त्वे द्यावीत. गाई, म्हशींची योग्य काळजी घेतल्यास दुधाचे योग्य प्रमाण राहते.
जनावरांना लाळ्या खुरकूत, कासदाह, ब्रुसेल्लोसिस, ट्युबरक्युलोसिस, व्हायरल डायरिया, त्वचेचे रोग (लम्पी स्कीन त्वचा आजार) होतात. या सर्व रोगांवर जैवसुरक्षिततेमुळे प्रतिबंध करता येतो. संसर्गजन्य रोगांना गोठ्यात येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी योग्य व्यवस्थापन, जैवसुरक्षितता नियमावली, गोठ्याची स्वच्छता, आजारी जनावरांची वेगळी व्यवस्था आदी बाबी अमलात आणणे आवश्यक आहे.
रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. जैवसुरक्षितता प्रणालीमुळे दुभत्या जनावरांची उत्पादन क्षमता आणि दुधाची प्रत उत्तम राहते. नवीन जनावर गोठ्यामध्ये आल्यास रोग पसरण्याची जोखीम वाढते. त्यासाठी नवीन जनावराला पहिले तीन आठवडे इतर जनावरांपासून वेगळे बांधावे. त्याची पशुवैद्यकाकडून नियमित तपासणी करून घ्यावी. दूध काढणारी व्यक्ती स्वच्छ व निरोगी असणे आवश्यक आहे. त्याची नखे वाढलेली नसावीत, कपडे स्वच्छ असावेत. दूध काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.
आगंतुक, गोठ्याला भेट द्यायला येणाऱ्या लोकांना थेट गोठ्यात प्रवेश देऊ नये. भेट देणाऱ्या पाहुण्यांचे हात, चपला बुटाचे निर्जंतुकीकरण करून त्यांना आत जाऊ द्यावे. गोठ्याच्या प्रवेशद्वाराजवळ वाहने आणि लोकांसाठी कमीत कमी ३ फूट रुंद व ६ फूट लांब असे एक फूटबाथ तयार करावे. त्यामध्ये निर्जंतुकीकरणाचे द्रावण किंवा चुन्याची पावडर पसरावी. गोठ्यामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी प्रवेशद्वारातील फूटबाथ मधूनच गोठ्यामध्ये येतील याची काळजी घ्यावी.
गोठ्याला चारी बाजूंनी योग्य पद्धतीने कुंपण करावे. जेणेकरून गोठ्यामध्ये थेट कुणालाही प्रवेश करता येणार नाही. गोठ्यामध्ये गोचीड, माशा, डास, चिलटे यांसारख्या कीटकांमार्फत रोगांचा प्रसार होतो. त्यासाठी या किटकांचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. नियंत्रणासाठी गोठ्यात दररोज कडुनिंबाच्या पानांचा धूर करावा.
तसेच शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी. गोठ्याभोवतालच्या परिसरात पाणी साठणार नाही, दलदल होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण यातूनच माशा, डास, कीटक यांचा प्रादुर्भाव वाढतो. गोठा स्वच्छ असावा. हवा खेळती राहील व भरपूर सूर्यप्रकाश येईल अशी गोठ्याची रचना असावी. गोठ्याची आणि परिसराची नियमित स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करावे.
गोठ्यामध्ये जमिनीपासून ४-५ फुटांपर्यंत चुना लावावा. त्यामुळे गोठा जंतुविरहीत ठेवण्यास मदत होईल.
नवीन जनावरे विकत घेताना त्यांची आरोग्य तपासणी करावी. शक्य झाल्यास जनावरांचा पूर्व इतिहास तपासावा.
जिवाणूनाशक व विषाणूनाशक औषधांचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वापर करावा. आठवड्यातून एक वेळ त्यांची गोठ्यामध्ये फवारणी करावी.
विषाणूनाशक, जिवाणूनाशक, बुरशीनाशक औषधे प्रमाणित केलेली असावीत. ती खाद्य सुरक्षित असल्याची खात्री करावी. त्याचा कुठलाही अंश दुधामध्ये आल्यास जनावरे, मनुष्याला ते अपायकारक नाही याची खात्री करावी.
गोठ्यावर येणाऱ्या लोकांसाठी फूटबाथ व गाड्यांसाठी टायरबाथ किंवा स्प्रे वापरून त्यांचे निर्जंतुकीकरण करावे.
गोठ्यात ओलसरपणा जास्त प्रमाणात राहिल्यास त्यात जंतूची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे कासेला जंतूसंसर्ग होऊन काससुजी होते. म्हणून गोठा कोरडा राहील याची काळजी घ्यावी. कासदाहाला प्रतिबंध करण्यासाठी दूध काढण्याअगोदर आणि नंतर कास स्वच्छ करून जंतुनाशक द्रावणात बुडवावेत. त्यामुळे सडात होणारा जंतूसंसर्ग टाळला जाईल.
जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशी, वासरे, रोगप्रतिकार क्षमता कमी असलेली जनावरे रोगांना लवकर बळी पडतात. त्यामुळे अशा जनावरांची विशेष काळजी घ्यावी.
पशुखाद्य नेहमी कोरड्या जागी ठेवावे. खाद्याला बुरशी लागू नये यासाठी वारंवार खाद्याची तपासणी करावी.
गव्हाणीमध्ये कधीही पाय ठेवू नये.
जनावरांना सकस व संतुलित आहार द्यावा. त्यामुळे जनावर सुदृढ राहते व संसर्गजन्य आजारांना बळी पडत नाही.
मेलेले जनावर तसेच पडलेल्या वाराची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. विल्हेवाट लावताना ८ ते १० फूट खोलीचा खड्डा खोदून त्याच मृत जनावराचा पाठीचा कणा जमिनीवर राहील व चारी पाय वर असतील अशा पद्धतीने पुरावे. मृत जनावराच्या देहावर कळीचा चुना आणि मीठ टाकून मृतदेहावर माती टाकून खड्डा दाबून पुरावे.
गोठा नियमित स्वच्छ करावा. ठराविक दिवसांनी निर्जंतूक करावा. जनावरांना बसण्यासाठी रबर मॅटस असतील तर त्यांच्याखालील भागाची स्वच्छता करावी.
गोठ्यातील सर्व भांडी, दूध काढणी यंत्र, इतर उपकरणे यांचे नियमित निर्जंतुकीकरण करावे.
जनावरांचे वेळेवर लसीकरण करावे. लसीकरणापूर्वी एक आठवडा आधी जंतूनिर्मुलन करून त्यानंतर लसीकरण करावे.
गोठ्यातील जनावर नेहमीपेक्षा वेगळी, अनियमित लक्षणे दाखवू लागल्यास त्वरित संबंधित शासकीय प्रणाली, पशूतज्ज्ञांना त्याची माहिती द्यावी. जेणेकरून जनावरांमध्ये लाळ्या खुरकूत, देवी व इतर संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाला असल्यास त्यावर वेळीच नियंत्रण मिळवता येईल.
गोठ्यामधील दैनंदिन कामकाजाच्या नोंदी ठेवाव्यात.
ग्रुमिंगची (खरारा) आवश्यकता
गायीच्या अंगावर खूप केस असतात. त्यात अडकलेल्या धुळीमध्ये आणि मेलेल्या केसांमध्ये जिवाणू, बुरशी व परजीवी (कीटक) वाढतात. त्यामुळे जनावरांना खाज सुटते. अशा वेळी जनावर आपले शरीर खांबाला, झाडाला, गवाणीला किंवा भिंतीला खाजवून घेण्याचा प्रयत्न करते.
त्यामुळे त्यांना इजा होण्याची शक्यता असते. त्यासाठी खरारा करणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रुमिंग ब्रशचे लांब ब्रिसल्स जनावरांच्या केसांमधून त्वचेपर्यंत पोहचून खरारा करतात. त्यामुळे जनावरांना आराम वाटतो. तसेच आलेला ताण कमी व्हायला मदत होते.
- डॉ. सागर जाधव,
९००४३६१७८४
(पशुपोषणशास्त्र विभाग, पशुधन विकास अधिकारी, बाचणी, जि.कोल्हापूर)
फायदे
खाजेमुळे आलेला ताण कमी होऊन जनावरांना आराम मिळतो.
रक्तभिसरणात वाढ होते.
जनावरांची त्वचा स्वच्छ होते.
जनावर निरोगी राहण्यास मदत होते.
उत्पादकता वाढते.
केस व त्वचा चमकदार होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.