
बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हैसपालन हा मुख्य व्यवसाय अाहे. परंतु यशस्वी म्हैसपालनासाठी शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. कष्ट अाणि योग्य व्यवस्थापनाबरोबर शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड मिळाली तरच या व्यवसायामध्ये चांगले यश मिळू शकते. म्हशीच्या व्यवस्थापनातील सूत्रे सांगणारी मालिका अाजपासून दर बुधवारी देत अाहोत. दुग्धोत्पादनाकरिता म्हैसपालन करताना उत्तम दूध देणारी म्हशीची प्रजातीची निवड ही एक प्रमुख बाब आहे. भारतामध्ये विविध राज्यांतील हवामान, चारा व दुधासाठीची मागणी यावरून म्हशीच्या प्रजाती विकसित झाल्या आहेत. व्यवसाय करताना प्रामुख्याने जास्त उत्पादन क्षमता असणारी तसेच उत्तम प्रजननक्षमता असणारी म्हशीची जात फायदेशीर ठरते. मुऱ्हा, म्हैसाना, जाफराबादी व पंढरपुरी या म्हशीच्या प्रामुख्याने महत्त्वाच्या प्रजाती असून बहुतांश म्हैसपालक व्यवसायाकरिता वरीलपैकी प्रजातीची निवड करतात.
म्हशीच्या विविध प्रजाती व वैशिष्ट्ये १) मुऱ्हा मुऱ्हा ही प्रजाती जगामध्ये दूध उत्पादनवाढीसाठी सर्वात उत्तम जात म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या शाश्वत दूध उत्पादनासाठी उच्च आनुवंशिक क्षमता असणाऱ्या मुऱ्हा म्हशीला देशात व विदेशात सर्वात जास्त मागणी आहे. मूळ वास्तव्य ः हरियाना राज्यातील मुख्यत्वे रोहतक व दिल्ली तसेच उत्तर प्रदेशमधील मीरत येथे प्रामुख्याने आढळते. शरीर रचना ः म्हशीचा रंग गडद काळा असून मान लांब व शिंगे आतून गोल वाकलेली असतात. माथा गोल आणि उभारलेला, कान लांब असतात. शेपटी लांब असून गोंडा काळा असतो आणि ठळक दूध नलिका शरीराला चिकटून असणारी कास ही म्हशीची गुणवैशिष्ट्ये आहेत. दूध उत्पादन ः एका वेतात सरासरी दूध उत्पादन २००० लिटर इतके असून ३००० ते ४००० लिटर इतके दूध उत्पादन मिळते. वजन ५०० ते ५५० किलो असून उत्तम प्रजननक्षम म्हशीमध्ये दोन वेतातील अंतर साधारणपणे १४ ते १५ महिने आहे. स्निग्धाचे प्रमाण ६ ते ७ टक्के इतके असून भाकड काळ हा ९० ते १२० दिवस इतका आहे. उत्तम वाढवलेल्या म्हशीमध्ये प्रथम विण्याचे वय ३ ते ३.५ वर्षे इतके आहे. मुऱ्हा जातीच्या रेड्याचा वापर कमी दूध देणाऱ्या व गावठी म्हशीच्या सुधार कार्यक्रमासाठी केला जातो.
२) जाफराबादी मूळ वास्तव्य ः गुजरात राज्यातील काठीयवाड, सौराष्ट्र व कच्छच्या भागात प्रामुख्याने आढळते. शरीर रचना ः जाफराबादी म्हैस वजनाला भारी असून वजन ५०० ते ६०० किलो असते. माथा मोठा, फुगीर असून शिंगे गोल रुंद असतात व खाली वळून नंतर गोल झालेली असतात. कान लांब, पाय भारी व शेपटी लांब असते. दूध उत्पादन ः सरासरी एका वेतातील दूध उत्पादन १८५० ते २२०० लिटर इतके असते व उच्च वंशावळीच्या म्हशी ३००० लिटरपेक्षा जास्त उत्पादन देतात. दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण ६ ते ७ टक्के इतके असते. उत्कृष्ट संगोपन असलेल्या म्हशीमध्ये प्रथम वेताचे वय ३.५ ते ४ वर्षे इतके असून दोन वेतातील अंतर १४ ते १५ महिने असते. भाकड काळ १०० दिवस व त्याहून अधिक असतो.
३) म्हैसाना ः मूळ वास्तव्य ः गुजरात राज्यातील म्हैसाना जिल्ह्यात ही म्हैस प्रामुख्याने आढळते. काठेवाड, जुनागढ या भागात म्हशीच्या उत्तम संकरापासून मुऱ्हा आणि सुरती या म्हशीच्या प्रजाती तयार झाल्या आहे व दोन्ही प्रजातीतील उत्तम गुणांचा आविष्कार असलेली ही प्रजाती आहे. शरीर रचना ः शरीर मध्यम आकाराचे असून आटोपशीर असते. म्हशीचा रंग काळा असून पायापाशी किंचित पांढरा असतो. शेपूट गोंडा काळा किंवा पांढरा असतो. शिंगे कान मध्यम आकाराची असते. खाली वळून नंतर बाहेर जाऊन वर वळतात. दूध उत्पादन ः सरासरी दूध उत्पादन १८०० ते २००० लिटर इतके आहे. प्रथम वेताचे वेय ३ ते ४ वर्षे असून दोन वेतातील अंतर १५ ते १८ महिन्यांपर्यंत असते. म्हशीचा भाकड काळ हा १०० ते १५० दिवस असतो.
४) पंढरपुरी ः मूळ वास्तव्य ः सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी तालुक्यामध्ये या म्हशी प्रामुख्याने दिसतात. कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यात या म्हशी आढळून येतात. शरीर रचना ः आकारमानाने मध्यम, बांधेसूद मांसलपणा कमी असणारी आहे. म्हशीची शिंगे तलवारीसारखी लांबलचक व डाैलदार असतात. चेहरा निमूळता, माथा मध्यम, डोळे पाणीदार, लांब कान व टोकदार असतात. म्हशीची कास आटोपशीर असून कास मोठी असते. शेपटी लांब गोंडा काळा किंवा पांढरा असतो. वजन सुमारे ४०० ते ४५० किलोग्रॅम असते. दूध उत्पादन ः एका वेतात सरासरी १२०० लिटर इतके दूध उत्पादन मिळते, परंतु उच्च वंशावळीच्या म्हशी १६०० लिटर दूध देतात.
म्हशीची निवड ः बहुतांश पशुपालक म्हशीची निवड जवळच्या बाजारातून करतात. जे पशुपालक मोठ्या प्रमाणावर म्हैसपालन करण्याकरिता दलालाकडून किंवा स्वतः ज्या भागात म्हशीचे मूळ वास्तव आहे येथून म्हशी करतात. ज्या पशुपालकांना दोन किंवा तीन म्हशी खरेदी करावयाच्या असतात ते बाजारातून विण्याच्या अगोदरच्या म्हशी किंवा गाभण म्हशी खरेदी करतात. खरेदी करताना म्हशीची किंमत ही म्हशीची प्रजात, वय, वेताची संख्या व दूध देण्याची क्षमता यावर अवलंबून असते. बऱ्याच वेळा म्हशीच्या दुग्धोत्पादनाची खोटी माहिती दिली जाते. अशा पद्धतीने म्हशीची निवड केल्यास व्यवसायात मोठे अार्थिक नुकसान होऊ शकते. १) पूर्वी म्हशीला कास दाह अाजार असल्यास एक किंवा अनेक सड बंद असण्याची शक्यता असू शकते. २) विताना म्हशीला वासरू अडकणे, झार न पडणे, इ. आजार होऊ शकतात. ३) विल्यानंतर रेडकांचे मरतुकीचे प्रमाण म्हशीमध्ये जास्त असते. जे पशुपालक दलालामार्फत किंवा स्वतः म्हशीची खरेदी करतात अशावेळेससुद्धा गाभण किंवा विलेल्या म्हशीची खरेदी करतात. दलालामार्फत म्हशी मागविण्यात येतात. अशा वेळेस ९-१० म्हशीमध्ये २ ते ३ म्हशी या कमी प्रतीच्या असतात. सद्यःस्थितीत मुऱ्हा, म्हैसाना किंवा जाफराबादी म्हशीची किंमत ६०,००० ते १,००,००० पर्यंत आहे. त्यामुळे म्हैस खरेदी ही बिनचूक व योग्य होणे हे गरजेचे आहे.
म्हैस खरेदी करताना घ्यावयाची काळजी
म्हैस खरेदी करण्यापूर्वी तपासा बाह्य लक्षणे
संपर्क ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२ (स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला )
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.