उबविण्यापूर्वी तपासा अंड्यांची गुणवत्ता 

कोंबडीने दिलेली सर्वच अंडी उबविण्यासाठी योग्य नसतात.
कोंबडीने दिलेली सर्वच अंडी उबविण्यासाठी योग्य नसतात.

कुक्कुटपालन व्यवसाय करताना अंड्यांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या व्यवसायात मोठ्या भांडवलाची गरज लागत नाही. अशा प्रकारे व्यवसाय करताना कुक्कुटपालकांना अंडे कसे तयार होते? सफल अंडे कोणते? सफल-असफल अंडे कसे ओळखावे याची थोडीबहुत शास्त्रीय माहिती असणे गरजेचे आहे.    ग्रामीण भागात अंडी उबविण्यासाठी खुडूक कोंबडी २१ दिवस बसवून पिलांची निर्मिती करतात. किंवा घरच्याच कोंबडीची अंडी उबविण्यासाठी खुडूक कोंबडीखाली ठेवून पिलांची निर्मिती करून परसातील कुक्कुटपालनाचा व्यवसायवाढवून व्यवसायात सातत्य टिकवण्याचा प्रयत्न करतात. 

अंडे कसे तयार होते 

  • पूर्णपणे वाढ झालेल्या मादीमध्ये स्त्रीबीजग्रंथी द्राक्षाच्या घडाप्रमाणे एकमेकास चिकटून असतात. 
  • त्यातील काही स्त्रीबीजग्रंथी आकाराने मध्यम ते मोठ्या असतात. तर काही स्त्रीबीजग्रंथी आकाराने लहान असतात. 
  • मोठ्या स्त्रीबीजग्रंथीचा रंग पिवळा असतो, तर लहान स्त्रीबीजग्रंथीचा रंग पांढरा असतो. 
  • ज्या स्त्रीबीजग्रंथी आकाराने मोठ्या आणि रंगाने पिवळ्या असतात त्या पिवळ्या बलकावर स्त्रीबीज असते. 
  • पूर्णपणे वाढलेला पिवळा बलक स्त्रीबीजग्रंथीशी जोडलेल्या पापुद्र्यातून बाहेर पडून गर्भशयाकडे सरकू लागतो. 
  • अशा प्रकारे पिवळा बलक स्त्रीबीजासह गर्भाशयाच्या नरसाळ्यासारख्या भागात येतो. त्या नरसाळ्यासारख्या भागास इन्फंडीब्युलम म्हणतात. 
  • यानंतर पिवळा बलक पुढे सरकत सरकत मॅग्रममध्ये येतो. या ठिकाणी पांढरा बलक तयार होतो आणि पिवळ्या बलकच्या भोवती जमा होतो. 
  • मॅग्रमनंतर हे अंडे इस्तेमसमध्ये येते. या इस्तेमसमध्ये अंड्याचा आकार तयार होतो. 
  • इस्तेमसमध्ये अंड्याला आकार येतो. नंतर हे अंडे युटेरसमध्ये येते. या युटेरसमध्ये क्षाराचे शोषण होऊन अंड्याच कवच तयार होते. 
  • युटेरसमध्ये तयार झालेले अंडे व्हजायना मार्गे अंड्याचा रुंद भाग पुढे सरकत सरकत क्‍लोएकाव्हेंटमधून शरीराबाहेर
  • पडते आणि वातावरणातील हवा, उष्णता लागून अंड्याचे कवच कठीण बनते. 
  • अंडी तयार होण्याची प्रक्रिया जवळपास २५ ते २६ तास चालत असते. अशा अंड्यापासून पिलांची निर्मिती शक्‍य आहेका? अर्थात नाही. कारण जोपर्यंत स्त्रीबीज आणि शुक्रजंतू यांचे मिलन होणार नाही तोपर्यंत नवीन जिवाची निर्मिती शक्‍य नाही. त्यामुळे अशी अंडी असफल अंडी असतात. कारण अंडी देणे ही मादीची नैसर्गिक प्रक्रिया आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. अशी अंडी उबवण्यासाठी वापरून काही उपयोग नाही. त्यासाठी सफल अंडे कसे तयार होते? सफल अंडे कसे ओळखावे हे माहित असले पाहिजे. त्यासाठी कोंबडीच्या प्रजनन संस्थेची माहिती असणे गरजेचे आहे. 
  • कोंबडीची प्रजनन संस्था 

  • प्रत्येक मादीच्या शरीरामध्ये मूत्रपिंडाच्या आतील बाजूस स्त्रीबीजग्रंथी चिकटलेल्या असतात. 
  • ज्याप्रमाणे कोंबडीच्या मादी पिलाचे वय वाढत जाते तसतसे स्त्रीबीजग्रंथी ही आकाराने मोठ्या होत जातात. 
  • ज्या वेळेस मादी वयात येते (सर्वसाधारण वय २० ते २२ आठवडे) त्या वेळेस डाव्या बाजूचे स्त्रीबीजकोश आणि
  • गर्भनिलिका मोठी होत जाते. आणि डाव्या बाजूची इंद्रिये बारीक होत होत नष्ट होऊन जातात. 
  • स्त्रीबीज कोशापासून खालील भागातून एक नागमोडी पांढरी नलिका निघून क्‍लोएकामध्ये संपते. या नलिकेस गर्भनलिका म्हणतात. 
  • स्त्रीबीज कोशामध्ये मादीच्या जन्मापासूनच ३६०० स्त्रीबीज असतात. ही सर्व स्त्रीबीज कोंबडीच्या पूर्ण आयुष्यात ती
  • सर्वच्या सर्व मोठी, परिपक्व होत नाहीत. त्यातली बरीच आपोआप नष्ट होतात. 
  • कोंबडीच्या एक वर्षीच्या उत्पादक आयुष्यात जास्तीत जास्त ३०० स्त्रीबीज मोठी होऊन परिपक्व होतात आणि
  • त्याचीच अंडी तयार होतात. 
  • असफ अंडे कसे तयार होते? 

  • ज्या वेळेस कळपात नर असतो, त्या वेळेस नैसर्गिक संयोगाद्वारे मादीच्या गुदद्वारात नराचे शुक्रजंतू सोडले जातात. 
  • हे शुक्रजंतू योनीमार्फत पुढे सरकत सरकत जाऊन अंड्यातील स्त्रीबीजास जाऊन मिळतात व त्यांचा संयोग झाल्यास ते अंडे सफल होते. त्या अंड्यात जीव तयार होऊन वाढत जातो. जर शुक्रजंतू आणि स्त्रीबीजाचा संयोग न झाल्यास ते अंडे असफल अंडे राहते. 
  • याचा अर्थ कळपात नर असेल तरच सफल अंडे मिळू शकते. कळपात नर आहे म्हणजे कोंबडी(मादीने)ने दिलेली सर्व
  • अंडी सफल अंडी आहेत असा होत नाही. तर सफल अंड्यासाठी स्त्रीबीज आणि शुक्रजंतू यांचे मिलन झाले पाहिजे.
  • मिलन झाले नाही तर कोंबडीची अंडी देण्याची प्रक्रिया चालू असते. कारण अंडी देणे ही मादी कोंबडीची नैसर्गिक प्रक्रिया आहे. 
  • उबवण्यासाठी अंड्यांची निवड 

  • ज्या कळपात सशक्त आरोग्यसंपन्न कोंबडा नर आहे त्याच कळपातील अंडी उबवण्यासाठी निवडावीत. 
  • ज्या कळपातील अंडी उबवण्यासाठी घ्यावयाची असतील त्या कोंबड्यांच्या कळपात १० ते १२ कोंबड्यांमध्ये एक नर कोंबडा असावा. 
  • ज्या कळपातून अंड्यांची निवड करायची आहे तो कोंबड्यांचा कळप रोगराईपासून मुक्त असावा. 
  • अंडी निवडताना अंड्यांचे वजन ५० ते ६० ग्रॅम असावे. अशीच अंडी उबवणीसाठी वापरावीत. 
  • उबवणीसाठी खुडूक कोंबडीखाली ठेवणाऱ्या अंड्याचे वजन, आकार आणि रंग एकसारखा असावा. 
  • एका खुडूक कोंबडीखाली उबवणीसाठी फक्त १२ ते १५ च अंडी ठेवावीत. म्हणजे खुडूक कोंबडी व्यवस्थित अंडी उबवेल. जास्त अंड्यांची संख्या असल्यास कोंबडीची उब व्यवस्थित मिळणार नाही. 
  • उबवणीसाठी फक्त ताज्या अंड्यांचीच निवड करावी. शिळे अंडे उबवणीसाठी उपयोगात आणू नये. ताजे अंडे आणि शिळे अंडे कोणते हे तपासून घ्या. त्यासाठी खालील पद्धत वापरावी. 
  • अंडे पाण्यात टाकून पाहावे. ताजे अंडे असल्यास अंडे पाण्यात बुडते आणि तळाशी समांतर राहते. कारण ते जड असते. जर अंडे शिळे असेल तर अंड्यातील हवेची पोकळी वाढत जाऊन अंडे हलके होते. पाण्यात बुडवले असता
  • अंड्याची रुंद बाजू वर येऊन अंडे पाण्यात तरंगते. 
  • सफल अंडे हे असफल अंड्यापेक्षा लवकर खराब होते. 
  • शिळ्या अंड्यातील नैसर्गिक घटक पूर्व अवस्थेत राहत नाहीत. म्हणजे अंड्यातील नैसर्गिक घटकाच्या रचनेत बदल आढळतो. हे बदल लक्षात येण्यासाठी कुक्कुटपालकांची निरीक्षणशक्ती चांगली असली पाहिजे. 
  • अंड्याचे लाईटच्या प्रकाशात निरीक्षण केले असता अंड्यातील घटकांच्या रचनेत बदल झालेला सहज लक्षात येईल. या बदलावरून ताजे अंडी आणि शिळी अंडी कोणती हे ठरवता येते. 
  • त्यासाठी पुठ्यांचा किंवा लाकडी चोकोनी बॉक्‍स तयार करून बॉक्‍समध्ये लाईटची व्यवस्था करावी. बॉक्‍सच्या एका बाजूस अंड्यापेक्षा लहान छिद्र पाडून घ्यावे. 
  • बॉक्‍समधील लाईट सुरू करावी आणि बॉक्‍सच्या छिद्रावर अंडे ठेवून लाईट प्रकाशात अंड्यातील घटकांचे निरीक्षण करावे. 
  • ताज्या चांगल्या प्रतीच्या अंड्यातील घटकांची रचना खालीलप्रमाणे दिसून येईल.  

  • अंड्याच्या रुंद भागातील हवेची पोकळी १/२ सेंटिमीटर दिसेल. 
  • अंड्यातील पिवळा बलक आणि पांढरा बलक एकमेकात मिसळलेला दिसणार नाही. 
  • अंड्यातील पांढऱ्या बलकाचे आणि पिवळ्या बलकाचे स्वतंत्र अस्तित्व स्पष्ट दिसते. अशा प्रकारची अंड्यातील घटकांची रचना असल्यास ते अंडे ताजे असते. 
  • जर अंडे शिळे असेल तर 

  • अंड्यातील रुंद भागातील हवेची पोकळी १/२ सेंटिमीटरपेक्षा जास्त दिसून येईल. 
  • अंड्यातील पिवळा बलक अंड्याच्या मध्यभागी नसतो. 
  • अंड्यातील पिवळा बलक भोवतालचा पडदा फाटून तो पांढऱ्या बलकमध्ये मिसळलेला दिसून येईल. 
  • संपूर्ण अंड्यातील बलक पिवळसर दिसून येईल. 
  • पिवळ्या बलकामध्ये तांबड्या रंगाचे ठिबके दिसून येतील. अशा प्रकारे अंड्यातील घटकाची रचना दिसल्यास असे अंडे शिळे असते. 
  • सफल अंड्याच्या आतील भागाची रचना 

    अंड्याचे कवच. अंड्याच्या रुंद भागातील हवेची पोकळी. पिवळा बलक आणि त्याचा ताण. पिवळा बलकाभोवती पांढरा बलक. पिवळा बलकावर स्त्रीबीज आणि स्त्रीबीज फलित झाल्यास नवीन जिवाची निर्मिती. त्या नवीन जिवासअन्नपुरवठा करण्यासाठी पिवळ्या बलकामध्ये रक्तवाहिनीच दिसून येतात. या रक्तवाहिनीतूनच पिलास अन्नपुरवठाहोतो आणि पिले वाढू लागतात. 

    संपर्क ः श्रीकांत सरदेशपांडे, ९६५७२५७८०४  (सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com