जनावरांतील मायांग बाहेर येण्याची समस्या

 management of milch animals
management of milch animals

म्हशीमधील मायांग बाहेर येण्याचे प्रमाण इतर बाकी जनावरांपेक्षा जास्त प्रमाणात आढळून येते. मायांग बाहेर येण्याच्या समस्येवर त्वरित उपाय करून या समस्येचे कारण अनुवांशिक असेल तर ते शोधून काढणे गरजेचे आहे. अशी समस्या असलेल्या जनावरांचा प्रजननासाठी वापर न करणे फायद्याचे ठरते. प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर असे मायांग बाहेर येण्याचे दोन प्रकार आहेत, याशिवाय काही जनावरांमध्ये माजाच्या वेळेस पण मायांग बाहेर आलेले दिसून येते. प्रसूतीपूर्व मायांग बाहेर येण्याचे प्रमाण ६० टक्के आहे. योनीचे व गर्भाशयाचे मायांग बाहेर येण्याचे प्रमाण अनुक्रमे २९.७२ व ६.६० टक्के आढळून आले आहे. दुधाळ गायींमध्ये प्रसूतीनंतरच्या तुलनेत प्रसूतीपूर्व मायांग बाहेर येण्याचे प्रमाण ५४ टक्के आढळून आले आहे. मायांग गाभण काळात कधीही बाहेर येऊ शकते. या समस्येमध्ये धोक्याचे प्रमाण बऱ्याच बाबींवर अवलंबून आहे. त्याशिवाय मायांग बाहेर आलेल्या जनावरांमध्ये कमी दिवसांत प्रसूती होणे, प्रसूती दरम्यान अडथळा निर्माण होणे, वार अडकणे व गर्भाशयात जंतूचे संक्रमण होणे या समस्या आढळून येतात. मायांग बाहेर आल्यावर गर्भपाताची शक्यता जास्त असते. मायांग बाहेर येण्याची कारणे

  • योनीचे मायांग बाहेर येण्याचे मुख्य कारणाचा अद्याप शोध लागलेला नाही; परंतु यामध्ये बऱ्याच कारणांचा समावेश होतो. अनुवांशिकता हे एक मायांग बाहेर येण्याचे कारण असू शकते.  
  • योनीच्या संक्रमणामुळे व गाभण काळाच्या तिसऱ्या सत्रात पोटातील दाब वाढल्यामुळे किंवा खाद्यातील जीवनसत्त्व व प्रथिने कमी झाल्यामुळे मायांग बाहेर येते. म्हशीमधील प्रसूतीपूर्व योनीचे मायांग लघवीच्या संक्रमणामुळे व योनीच्या गाठीमुळे बाहेर येऊ शकते.  
  • म्हशीमध्ये प्रजननासाठी कॅल्शियम व फॉस्फरसचा उपयोग होतो. कारण या खनिजांच्या प्रमाणावर बाकी खनिजांचा शरीरातील वापर अवलंबून असतो. त्याचा एकंदरीत शरीरातील द्रव्य निर्मितीवर परिणाम होतो. प्रसूतीपूर्व २ महिने आधी निरोगी म्हशींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण (९.०३ - ९.५६ मिलिग्राम प्रति १०० मिली) आढळून आले आहे. त्याच्या तुलनेत मयांग बाहेर आलेल्या म्हशींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी (७.८० - ८.३७ मिलीग्राम प्रति १०० मिली) आढळून आले.  
  • मायांग बाहेर येण्याला काही संप्रेरकाची कमतरताही जबाबदार आहे. सरासरी प्रोजेस्टेरोन संप्रेरकाचे प्रमाण मायांग बाहेर आलेल्या म्हशीत व मायांग बाहेर न आलेल्या म्हशीत जवळपास सारखेच आढळून आले आहे. पण इस्त्रोजन संप्रेरकाचे प्रमाण १० पट जास्त आढळून आले आहे.  
  • इस्त्रोजन संप्रेरकामुळे रक्तातील कॅल्शियमचे कार्य दाबले जाते व म्हशीच्या मागच्या भागाचे लीगामेंट ढिले पडायला लागतात. वाढता पोटातील दाब व म्हशीच्या मागच्या भागाचे लीगामेंट जास्त सैल पडायला लागल्यामुळे योनीचे मायांग बाहेर येण्याचे प्रमाण जास्त दिसून येते.  
  • म्हशीतील मायांग बाहेर येण्याचा सरळ संबंध अनुवांशिकतेशी जोडला आहे. हा संबंध गुणसूत्राची विकृती असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.
  • उपचार

  • प्रसूतीपूर्व मायांग बाहेर येण्याच्या समस्येवर खात्रीशिर उपचारांची कमतरता असल्यामुळे आणखी संशोधनाची गरज आहे. कारण म्हशीमधील मायांग बाहेर येण्याच्या समस्येचे मुख्य करण अद्याप खात्रीपूर्वक कळू शकले नाही.  
  • शस्त्रक्रिया शास्त्रातील काही पद्धती वापरून पाहण्यात आल्या आहे, पण त्याचा प्रभाव जास्त पडू शकला नाही. कृत्रिम संप्रेरक, खनिज मिश्रण, वेदनाशक, ॲंन्टीहीस्टामायीन इंजेकशनचा एकत्रित वापर केल्याने फायदा होतो. पण तुलनात्मक खर्च जास्त होतो.  
  • म्हशी व गायीमध्ये मायांग बाहेर येण्याच्या समस्येवर २० टक्के बोरोग्लुकोनेट नसेतून हळुवारपणे दिल्यास फरक पडतो. काही उपचार संशोधनात ४० मिली २० टक्के बोरोग्लुकोनेट मांडीतील मासांमध्ये दिल्यास व योनीच्या मायांग आलेल्या भागाची मलमपट्टी केल्यास सुधारणा दिसून येते. हा उपचार मायांग किती प्रमाणात बाहेर आले आहे यावर अवलंबून असतो. काही जनावरांमध्ये २ ते ५ दिवसांत सुधारणा दिसून येते.  
  • प्रसूतीपूर्व मायांग बाहेर येण्याच्या समस्येमध्ये जैवनाशक इंजेक्शनचा वापर करताना ते प्रसुतीला सुखरूप आहे की नाही, याचा विचार करणे गरजेचे आहे.
  • टीपः वरिल उपचार तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावेत. संपर्कः डॉ. चेतन लाकडे, ०८०८७१०९८७८ (पशुप्रजननशास्त्र विभाग, बिदर पशुवैद्यक महाविद्यालय, बिदर, कर्नाटक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com