नवीन प्राणिजन्य आजार ः क्रिमियन काँगो हिमोरेजिक फीवर

क्रिमियन काँगो हिमोरेजिक फीवर या आजाराचा प्रसार प्रामुख्याने हायलोमा जातीच्या गोचिडाद्वारे एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होतो.गाय, म्हैस, शेळी व मेंढीमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. आजाराची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात.
cow shed
cow shed
Published on
Updated on

क्रिमियन काँगो हिमोरेजिक फीवर या आजाराचा प्रसार प्रामुख्याने हायलोमा जातीच्या गोचिडाद्वारे एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होतो.गाय, म्हैस, शेळी व मेंढीमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. आजाराची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. 

जगात प्रथम १९४४ मध्ये क्रिमिया द्विकल्पात हिमोरेजिक फीवर हा आजार दिसून आला. त्यामुळे या आजाराला क्रिमियन हिमोरेजिक फिवर असे नाव पडले. हा रोग  १९५६ मध्ये काँगोमध्ये आढळून आला. सन १९६९ मध्ये  या आजाराच्या विषाणूचा शोध लागला. त्यामुळे यास क्रिमियन काँगो हिमोरेजिक  फीवर असे म्हणतात. हा आजार मुख्यत्वे आशिया, आफ्रिका, मध्यपूर्व व दक्षिण पूर्व युरोप खंडात विशेषतः दक्षिण आफ्रिका, झिंबाबे, टांझानिया, युगांडा, कोसोव्ह, केनिया, सुदान, ग्रीस, हंगेरी, इथिओपिया, इजिप्त, इराण, इराक, सौदी अरेबिया, ओमन, बोस्निया, बल्गेरिया, अल्बानिया, युक्रेन, टर्की, रशिया, अझरबैजान, उजबेकिस्तान, कझागिस्तान, अफगाणिस्तान, चीन, पाकिस्तान या देशांत आढळून आला आहे .  

भारतातील प्रसार 

  • भारतात याची नोंद प्रथमतः जानेवारी २०११ मध्ये गुजरातमधील सानंद येथे झाली. त्यामध्ये चार लोकांना प्रादुर्भाव होऊन एका स्त्री रोग्यासह तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सचा मृत्यू झाला. त्यानंतर २०१३ मध्ये तुरळक प्रमाणात हा आजार अमरेली जिल्ह्यात आढळून आला. त्यामध्ये कारियाना गावामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला. तसेच २०१४ मध्ये उत्तर गुजरातमध्ये या आजारामुळे ३ लोकांचा मृत्यू झाला. 
  • २०१५ मध्ये अमरेली जिल्ह्यातील भुज येथे काही रोगी आढळून आले. २०१९ मध्ये गुजरातमध्ये ३५ लोकांना आजाराची बाधा झाली. त्यामध्ये १७ लोक मृत्यू पावले. तर बोताड जिल्ह्यात २०२० मध्ये ४ लोकांना बाधा झाली. एकाचा मृत्यू झाला. राजस्थानमधील जोधपूरमध्ये सप्टेंबर २०१९ मध्ये चौघांना सीसीएचएफ झाल्याचा व त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे. 
  • गुजरात लगतच्या पालघर, नाशिक, नंदुरबार व धुळे या जिल्ह्यांमध्ये हा आजार पसरण्याचा धोका संभवतो. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे 
  • जनावरांमध्ये दिसतो प्रादुर्भाव 

  • गाय, म्हैस, शेळी व मेंढी या पाळीव प्राण्याबरोबर आफ्रिकेत शहामृग तसेच हरिण व ससा या जंगली प्राण्यांत विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. मात्र कोंबड्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही.  
  • जनावरांतील लक्षणे 

  • जनावरांत रोगाची कुठलीही लक्षणे आढळत नाहीत. बाधित जनावरे विषाणू वाहक म्हणून कार्य करतात.
  • बाधा झालेल्या जनावरांच्या शरीरात, रक्तात, शरीर स्रावात हा विषाणू साधारणतः एक आठवडा राहतो. या कालावधीत आजाराचा प्रसार एका जनावरापासून दुसऱ्यास किंवा मनुष्यात होतो.
  • मनुष्यातील लक्षणे 

  • गोचीड चावल्यानंतर  सर्वसाधारणतः १ ते ३ दिवस, तर रक्त मांसपेशींचा संपर्क झाल्यास ५ ते ६ दिवसांत लक्षणे दिसतात.
  • सर्वसाधारणपणे बाधित मनुष्यामध्ये तीन अवस्था दिसून येतात.
  • प्रथम अवस्था (रक्तस्रावापूर्वीचा टप्पा)

  •  सुरुवातीस  पाच ते सात दिवस भरपूर ताप येणे,  डोके दुखणे, मानदुखी, अंगदुखी, पोटदुखी घसादुखी, चक्कर येणे, उलटी होणे, मळमळणे, हगवण लागणे, डोळे लाल होणे, डोळे जळजळ करणे, डोळ्यांस प्रकाश सहन न होणे अशी लक्षणे दिसतात. सुरुवातीस वर्तणुकीत लहरीपणा येणे, गोधळल्यासारखे वाटते.  ३-४ दिवसांनी सुस्तपणा येतो. जास्तीची  झोप येते, अशी लक्षणे दिसतात.
  • द्वितीय  अवस्था (रक्तस्रावाचा टप्पा) 

  • श्लेषमल आवरणावर विशेषतः घशात व तोंडात वरच्या भागात लाल ठिपके दिसतात. चेहरा लाल होणे, नाकातून व लघवीतून तसेच कातडीच्या खाली रक्तस्राव होतो. शौचास व उलटी रक्तमिश्रित होणे, हृदयाचे ठोके कमी होणे. या रोगात मरतुकीचे प्रमाण अधिक असून, ते सर्व सामान्यपणे १० ते ३० टक्के  (५- ८० टक्के) आढळून आले आहे. यकृत व मूत्रपिंडावर सूज येऊन रोगी व्यक्ती साधारणतः दोन आठवड्यांत दगावते. 
  • तिसरी अवस्था ( दुरुस्त होण्याचा कालावधी )

  •  बऱ्या होणाऱ्या व्यक्तीमध्ये ९-१० व्या दिवसांपासून सुधारण्याची  लक्षणे दिसून येतात. अशक्तपणा व थकवा जाणवतो. हृदयाचे ठोके वाढून पूर्ववत होतात. पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच कालावधी लागतो. 
  • निदान  रोगी व्यक्तीचे रक्त वापरून ः आरटी पीसीआर (RT PCR) या चाचणीच्या साह्याने आजाराचे निदान पक्के केले जाते. 

     उपचार   विषाणूजन्य आजार असल्याने खात्रीशीर उपचार नाही. मात्र लक्षणावर आधारित विषाणूरोधक रीबाव्हिरीनसारखी औषध, ऑक्सिजन, सलाईन, प्रतिजैविक याचा वापर करून मरतूक नियंत्रणात ठेवता येते.

    आजार नियंत्रणासाठी उपाययोजना   आजाराच्या नियंत्रणासाठी तीन स्तरांवर प्रयत्न करावे लागतात. अ) गोचिडापासून मनुष्यास होणारे संक्रमण

  • याचा सर्वाधिक धोका पशुपालकांना व पशुधन प्रक्षेत्रावर कार्यरत कामगारांना तर काही प्रमाणात पशुवैद्यकांना संभावतो.
  • पशुपालकांनी अंगभर कपडे म्हणजे लांब बाह्याचे शर्ट व पूर्ण पँट/ पायजमा  घालावा. 
  • गोठा आणि जनावरांच्या शरीरावरील गोचीड नियंत्रण करावे. 
  • जेथे गोचीड जास्त आहेत तेथील संपर्क कमी करावा. म्हणजे त्या ठिकाणी बसणे, झोपणे टाळावे. 
  • गोचीड बोटाने ओढून काढू नये.
  • ब) जनावरांपासून मनुष्यास होणारे संक्रमण  

  • या प्रकारचा धोका  पोस्ट मार्ट्‌म करणारे पशुवैद्यक/कर्मचारी  व कत्तलखान्यातील कामगारांना संभवतो.
  • पशुवैद्यकांनी शवचिकित्सा  करताना आणि कत्तल खान्यातील कामगारांनी जनावरांची कत्तल करताना सुरक्षारक्षक उपकरणे म्हणजे हातमोजे, गॉगल, पीपीई किट वापरावे.
  • ज्या जनावराची कत्तल करावयाची आहे, त्या जनावरांच्या अंगावर  गोचीडनाशकाची फवारणी करावी. चौदा दिवस विलगीकरण करून  ठेवावे म्हणजे ते जनावर कत्तल करतेवेळी रोगजंतूबाधित असणार नाही.
  • मांस शिजवून खावे. दूध उकळून प्यावे.
  • क) मनुष्यापासून मनुष्यास होणारे संक्रमण 

  • आजारी व्यक्तीचा प्रत्यक्ष संपर्क टाळावा. 
  • हातमोजे व सुरक्षा उपकरणे वापरावीत.
  • रोगी व्यक्तीची देखभाल करणाऱ्यांनी वारंवार हात स्वच्छ धुवावेत.
  • दवाखान्यातील सीरींज, सुया निर्जंतुक करून वापराव्यात. 
  • गोचीड नियंत्रण 

  • जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यात गोचीडनाशकाची फवारणी करावी.
  • गोठ्यातील खाच खळगे बुजवून घ्यावेत.
  • गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा.
  • गोठ्यातील गोचीड नियंत्रणासाठी फ्लेमगनचा वापर करावा.
  • जैविक नियंत्रणासाठी कोंबड्यांचा वापर करावा. 
  • आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून शक्यतो जनावरे आणू नयेत. आणलीच तर त्यांच्यावर तेथेच गोचीडनाशकाची फवारणी करून आणावीत. गोठ्यात आणल्यानंतर किमान १४ दिवस विलगीकरण करून ठेवावे.
  • विषाणूजन्य आजाराचा प्रसार 

  • आजाराचा विषाणू नैरो व्हायरस बुन्याव्हीरीडी कुटुंबातील आरएन ए गटात मोडतो.
  • हा विषाणू सर्व साधारण तापमानास काही दिवस जिवंत राहतो, ५५-६० अंश सेल्सिअस तापमानास १५ मिनिटे उकळल्यानंतर नष्ट होतो. थंड वातावरणात ४ अंश सेल्सिअस  तापमानात तीन आठवडे जगतो.
  • सूर्याच्या अतिनील किरणांमुळे तसेच सामू कमी म्हणजे आम्लयुक्त झाल्यास विषाणू नष्ट होतो. 
  • विषाणू १ टक्का सोडिअम हायपोक्लाेराइड, ७० टक्के अल्कोहोल, हायड्रोजन पॅराऑक्साइड,फॉर्मालीन द्रावणात जिवंत राहत नाही.
  • गोचिडापासून प्रसार 

  • प्रसार प्रामुख्याने हायलोमा जातीच्या गोचीडाद्वारे एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होतो.
  • तसेच एका गोचिडापासून दुसऱ्या गोचिडास आणि एका पिढीपासून दुसऱ्या पिढीत प्रसार होतो.
  • मनुष्यामध्ये प्रादुर्भाव 

  • गोचीड चावल्यामुळे बाधित जनावरांपासून मनुष्यामध्ये विशेषतः जनावरांचे मालक जनावरांच्या संपर्कातील व्यक्ती, खाटीक, पशुवैद्यक व कर्मचारी यांना आजार होतो. 
  • बाधित जनावरांच्या रक्त व मांस पेशीशी संपर्कात आल्याने पशुवैद्यक, कर्मचारी व खाटीक यांना आजार होतो. 
  • आजारी व्यक्तीच्या संपर्कात विशेषतः रक्त, शरीरातील स्राव व मांसपेशींच्या संपर्कात आल्याने एका मनुष्यापासून दुसऱ्या मनुष्यामध्ये प्रसार होतो. 
  •     पशुपालकांना गोचिड चावल्याने किंवा गोचीड हाताने काढताना हातात फुटल्याने त्वचा किंवा श्लेषमल आवरणातून विषाणूचा प्रसार होतो.
  •  दवाखान्यातील साहित्य  जसे की सीरींज- सुया यांचे निर्जंतुकीकरण  योग्य प्रकारे न केल्यानेही आजार होते.
  • बाधित जनावरांचे कच्चे दूध प्यायल्याने, रोगी जनावरांचे कच्चे मांस खाल्याने  प्रसार होतो. 
  • ज्या व्यक्तींचा व्यावसायिक कारणाने जनावरांशी संपर्क येतो अशा व्यक्ती म्हणजेच शेतकरी / पशुपालक, पशुधन प्रक्षेत्रावर कार्यरत पशुवैद्यक, पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी, कत्तलखान्यातील कामगार (खाटीक), आरोग्य क्षेत्रात कार्यरत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्णाची देखभाल करणारे नातेवाइकांना आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.
  • -  डॉ. अनिल भिकाने, ९४२०२१४४५३ (सहयोगी अधिष्ठाता, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com