डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी उत्पादनातून घेतली झेप

२० किलो प्रति दिन उत्पादनापासून सुरू केलेल्या या उद्योगामध्ये हिरेशा यांनी १० ए.सी. खोल्यासह अत्याधुनिक सुविधा, यंत्रे यासह १००० किलो प्रति दिन पर्यंत झेप घेतली आहे. आता त्या संपूर्ण वर्षभर अळिंबी उत्पादन घेतात.
डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी उत्पादनातून घेतली झेप
डेहराडून येथील हिरेशा वर्मा अळिंबी उत्पादनातून घेतली झेप

अळिंबी उत्पादनामुळे उत्तराखंड येथील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शाश्वत उत्पन्नाचा एक स्रोत तयार होत आहे. या नव्या क्षेत्राकडे पारंपरिक शेतकऱ्यांबरोबरच नोकरी पेशा सोडून नव्या उद्योगामध्ये उतरणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. डेहराडून येथील चार्बा गावातील आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कु. हिरेशा वर्मा यांचेच यशस्वी उदाहरण आहे. त्यांच्या अळिंबी उत्पादक कंपनीचे नान ‘हॅनअॅग्रोकेअर’ असे आहे. या क्षेत्रामध्ये पारंपरिक भात, गहू आणि भाजीपाला उत्पादन केले जाते. यातून शिल्लक राहणाऱ्या अवशेष जाळण्याचा पारंपरिक प्रघात आहे. तो पर्यावरणासाठी हानिकारक असल्याने त्याच्या वापरातून नवी उत्पादने विकसनावर भर दिला जात आहे. योग्य वातावरण तयार केल्यास या अवशेषांवर अळिंबीची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. या उद्योगातून चांगला फायदा मिळू शकतो, हे लक्षात आल्यानंतर हिरेशा यांनी आपली चांगली नोकरी सोडून २०१३ मध्ये कृषी क्षेत्रात उडी घेतली. प्रारंभी घरातील शिल्लक खोल्यांमध्ये २५ पिशव्या भरून ओयस्टर अळिंबी उत्पादनाला सुरुवात केली. केवळ दोन हजार रुपये गुंतवून त्यातून पाच हजार रुपये मिळाले. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला. मग आणखी माहिती व मार्गदर्शन घेण्यासाठी डेहराडून येथील कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेतले. पुढे २०१४ मध्ये सोलन येथील अळिंबी संशोधन संचालनालयामध्ये आणखी एक प्रशिक्षण घेतले. डेहराडून (हिमाचल प्रदेश) येथील अळिंबी विभागाकडून अळिंबीचे बीज मिळवले. भांडवलासाठी बॅंक आणि नॅशनल हॉर्टीकल्चर मिशन आणि नॅशनल हॉर्टीकल्चर ब्युरो यांच्याशी संपर्क केला. प्रत्यक्ष उत्पादनासाठी स्वतःच्या चार्बा या गावात बांबूच्या तीन झोपड्या उभारल्या. या प्रत्येक झोपडीमध्ये ५०० या प्रमाणे एकूण १५०० पिशव्या भरल्या. या प्रत्येक टप्प्यात अनेक अडचणी आणि आव्हाने आली तरी हिरेशा यांनी इच्छाशक्ती आणि संयमाने त्यावर मात केली. या झोपड्यातून १५ टक्के उत्पादन मिळाले. त्यानंतर त्यांनी ओयस्टर अळिंबीच्या दोन वेळा उत्पादन घेतले. दोन वर्षामध्ये वातावरण चांगले असल्याच्या स्थितीमध्ये हंगामी उत्पादन घेताना वेगवेगळ्या अळिंबी प्रजाती वाढवून पाहिल्या. सुमारे चार वर्षामध्ये संपूर्ण वर्षभर अळिंबी उत्पादन घेण्याइतका आत्मविश्वास मिळाला. प्रशिक्षण आणि व्यवसायातील वाढ अळिंबी उत्पादन आणि प्रक्रिया विषयातील वेगवेगळी नावीन्यपूर्ण तंत्रे शिकण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतले. त्यातून स्वतःचे कंपोस्ट आणि बीज निर्मितीचे उत्पादनही सुरू केले. आता त्यांच्याकडे अत्याधुनिक यंत्रे व सुविधांसह अळिंबी उत्पादन युनिट तयार आहे. प्रति दिन एक टन इतकी उत्पादनक्षमता असलेल्या या युनिटमध्ये १५ लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे. अलीकडेच कर्करोग विरोधी, विषाणू विरोधी आणि अॅण्टीऑक्सिडण्ड गुणधर्म असलेल्या व वैद्यकीय औषधे निर्मितीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या शिताके आणि गोनोडर्मा सारख्या अळिंबी उत्पादनालाही सुरुवात केली आहे. उत्तराखंड येथील दुर्गम अशा पर्वतीय प्रदेशामधील शेतकऱ्यांनाही कंपोस्ट, बीज आणि मार्गदर्शन सेवा देण्यास सुरुवात केली. आजवर हिरेशा यांनी २००० पेक्षाही अधिक महिला आणि शेतकऱ्यांना अळिंबी उत्पादनाचे प्रशिक्षण दिले आहे. वैशिष्ट्ये -

  • २० किलो प्रति दिन उत्पादनापासून सुरू केलेल्या या उद्योगामध्ये हिरेशा यांनी १० ए.सी. खोल्यासह अत्याधुनिक सुविधा, यंत्रे यासह १००० किलो प्रति दिन पर्यंत झेप घेतली आहे. आता त्या संपूर्ण वर्षभर अळिंबी उत्पादन घेतात.
  • अळिंबीपासून लोणचे, कुकीज, नगेट्स, सूप, प्रोटीन पावडर, चहा, पापड इ. मूल्यवर्धित व प्रक्रिया उत्पादनेही तयार केली आहेत.
  • तहरी, पौरी आणि गरहवाल या पर्वतीय प्रदेशातील शेतकऱ्यांनाही अळिंबी वाढीसाठी हिरेशा मदत व मार्गदर्शन करतात.
  • अळिंबी उत्पादन, वापर आणि विक्री या तिन्ही क्षेत्रामध्ये हिरेशा यांचे कार्य उल्लेखनीय आहे. या कार्यासह उद्योजकतेबद्दल त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक संस्थांकडून पुरस्कार मिळालेले आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com