Feed the chickens with quality food and water.
Feed the chickens with quality food and water.

कोंबड्यांना द्या योग्य गुणवत्तेचे पाणी

कोंबड्यांना पाणी देण्यापूर्वी शुद्धीकरण करावे. वेळोवेळी तपासणी करून पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करावी. योग्य गुणवत्तेचे पाणी कोंबड्यांना दिल्यामुळे त्यांचे आरोग्य आणि उत्पादन सुधारते.

कोंबड्यांना पाणी देण्यापूर्वी शुद्धीकरण करावे. वेळोवेळी तपासणी करून पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करावी. योग्य गुणवत्तेचे पाणी कोंबड्यांना दिल्यामुळे त्यांचे आरोग्य आणि उत्पादन सुधारते. कुक्कुटपालनामध्ये बहुसंख्य आजार हे पाण्याद्वारेच पसरतात. त्यामुळे कोंबड्या आजारी पडून मरतुक येण्याची शक्यता असते.  कोंबड्यांमध्ये पाणी पिण्याचे प्रमाण हे खाद्य खाण्याच्या प्रमाणापेक्षा दुप्पट (१ः२) असते. यावर तापमानातील बदलाचा परिणाम होत असतो. तापमानात वाढ झाल्यास पाणी पिण्याचे प्रमाण वाढून १ः४ किंवा त्यापेक्षाही अधिक होऊ शकते. 

  •  पिण्यासाठी ताजे आणि थंड पाणी उपलब्ध करावे. पाण्याचे तापमान नेहमीच कमी असावे. स्वयंचलित पाण्याच्या उपकरणांची सोय असेल तर आवश्यक असल्यास उन्हाळ्यात पाण्याच्या टाकीमध्ये बर्फ टाकावा. 
  •  तीव्र उन्हाळ्यात पाण्याद्वारे औषध देताना काळजी घ्यावी. या काळात कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त असते. त्यामुळे कोंबड्यांना औषधांची जास्त मात्रा जाण्याची शक्यता असते. म्हणून शिफारशीपेक्षा कमी मात्रेमध्ये औषधांचा वापर करावा.
  •  पाण्याचा उगम हा विविध स्रोतांद्वारे होतो. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रानुसार पाण्याची गुणवत्ता वारंवार हंगामानुसार बदलते. कोंबड्यांपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत ते विविध माध्यमांतून जाते. त्यामुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. म्हणून पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. 
  •  शरीराचे तापमान नियंत्रित करणे, विष्ठा बाहेर टाकणे, पोषक द्रव्ये आणि अन्न वाहून नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरातील पाण्याचा उपयोग अंडी आणि मांसनिर्मितीसाठी होतो. सामान्यपणे कोंबड्यांच्या शरिरात पाण्याचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत असते. पाण्याच्या प्रमाणात १० ते १२ टक्के तुटवडा निर्माण झाल्यास शारीरिक क्रियांमध्ये अडथळा निर्माण होऊन कोंबड्या दगावण्याची शक्यता असते. 
  •  कोंबड्यांना दिले जाणारे पाणी स्वच्छ, चव नसलेले, गंधहीन आणि रंगहीन असावे. पाण्यामध्ये कोणतेही विषाणू किंवा सूक्ष्मजंतू, खनिजांची पातळी, पाण्याचा सामू, इतर रासायनिक आणि भौतिक घटक यांचा समावेश प्रमाणापेक्षा जास्त नसावा. खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याची गुणवत्ता वेळोवेळी तपासावी. 
  •  किमान ३ महिन्यांतून एकदा पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करावी. त्यानुसार पाण्याच्या व्यवस्थापनात योग्य ते बदल करावेत. 
  • पाण्याचा सामू 

  • पाण्याच्या रासायनिक गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी सामू (पीएच) मोजणे फार महत्त्वाचे आहे. कोंबड्यांसाठी पाण्याचा सरासरी ६.० ते ७.५ इतका सामू उत्तम समजला जातो. 
  •  कोंबड्या ५ ते ८ पर्यंत सामू असलेले पाणी सहन करू शकतात. सामू ६ पेक्षा कमी झाल्यास त्याचा कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. सामू ८ पेक्षा जास्त झाल्यास, कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी, कोंबड्या कमी खाद्य खातात. 
  •  पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढल्यास, पाण्याद्वारे देण्यात येणाऱ्या लसी आणि औषधांची प्रभावशीलता कमी होते. पाण्याच्या उपकरणांमध्ये क्षारांचे प्रमाण वाढून पाण्याचा प्रवाह बंद होऊ शकतो. 
  • खनिज पदार्थ 

  •  पाण्यामध्ये नैसर्गिकरीत्या विविध प्रकारची खनिजे आढळतात. त्यांचे पाण्यातील प्रमाण कमी असल्यामुळे ते कोंबड्यांना हानी पोहोचवू शकत नाही. परंतु पाण्यातील खनिजांच्या प्रमाणात बदल झाल्यास कोंबड्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. 
  •  लोहाची उच्च पातळी जीवाणूंच्या वाढीस उत्तेजन देऊ शकते.  त्यामुळे अतिसार होऊ शकतो. 
  •  पाण्यामधील नायट्रोजन हे सहसा नायट्रेट्स आणि नायट्राइट्सच्या स्वरूपात दूषित होते. पिण्याच्या पाण्यात नायट्रेट्स आणि नायट्राइट्सची उपस्थिती रक्तामध्ये ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी करते. याचा कोंबड्यांच्या वाढीवर तसेच खाद्य खाण्यावर परिणाम होतो. 
  • मॅग्नेशिअमचे पाण्यातील प्रमाण वाढल्यास पातळ विष्ठा होते.
  • पाण्यामध्ये सोडिअमचे प्रमाण अधिक झाल्यास, कोंबड्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढून लघवीचे प्रमाण वाढते. ज्यामुळे लिटर ओले होण्याचे प्रमाण वाढते. याचा शेडमधील हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
  • सल्फेटचे प्रमाण जास्त झाल्यास शरीरातील इतर खनिजांच्या शोषणात व्यत्यय येऊ शकतो.
  • पाण्यात क्लोराइडचे प्रमाण वाढल्यास चयापचयवर विपरीत परिणाम करतात. 
  • पाणी दूषित होण्यासाठी कीटकनाशके, औषधी वनस्पती, औद्योगिक अवशेष, पेट्रोलियम उत्पादने आणि जड धातू जसे शिसे किंवा कॅडमिअम इत्यादी घटक कारणीभूत ठरतात. अशा दूषित घटकांचा शोध घेणे अधिक कठीण आहे. त्यामुळे पाण्याची वेळोवेळी तपासणी करावी.
  • पाण्याचा जडपणा  पाण्याचा जडपणा हा बायकार्बोनेट किंवा सल्फेट स्वरूपात कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमसारख्या विरघळलेल्या खनिजांच्या पाण्यातील उपस्थितीला कारणीभूत आहे. विशिष्ट आयन विषारी प्रमाणात उपस्थित असल्याशिवाय पाण्याचा जडपणा सामान्यतः कोंबड्यांसाठी हानिकारक नसतो. मॅग्नेशिअम सल्फेटच्या जास्त प्रमाणामुळे कोंबड्यांमध्ये पातळ विष्ठा आणि अंडी उत्पादनात घट येऊ शकते. पाण्याच्या अत्यंत जडपणामुळे त्यामध्ये मिसळलेले औषध, जंतुनाशक आणि स्वच्छतेसाठी वापरलेल्या घटकांचा प्रभाव कमी होऊ शकतो.

    - डॉ. अंकितकुमार राठोड, ७२१८८४२८३३  डॉ. एम. आर. वडे, ८६००६२६४०० (कुक्कुटपालन शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com