Animal Husbandry  Agrowon
यशोगाथा

Animal Husbandry : राहुरी तालुक्यातील महिलांनी पशुपालनातून मिळवले संसाराला आर्थिक बळ

Success Story : कोल्हार खुर्द (ता. राहुरी, जि. नगर) येथील रोजंदारीवर काम करणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी महिलांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने तेरा वर्षापूर्वी ‘श्रावणी महिला स्‍वयंसाह्यता महिला बचत गट’ सुरू केला.

Suryakant Netke

Animal Husbandry Update : नगर-मनमाड रस्त्यावर प्रवरा नदीकाठचे कोल्हार बुद्रक राहाता तालुक्यात आणि कोल्हार खुर्द राहुरी तालुक्यात येते. कोल्हार खुर्द येथील अल्पभूधारक शेतकरी महिला मिळेल तेथे रोजंदारीवर शेती काम करत होत्या. साधारण २००९-२०१० मध्ये रोजंदारी कामानिमित्ताने एकत्र येणाऱ्या महिलांमध्ये बचत गट तयार करण्याबाबत चर्चा झाली.

बचत गट तयार करण्यासाठी शारदा कारभारी कानडे, अलका दत्तात्रय सिरसाट, पार्वती गोपीनाथ कानडे, शोभा सुरेश कानडे, मंगल विठ्ठल तेलोरे, रंभा चंद्रभान साळुंके, लिलाबाई रखमा कचरे, मंगल अशोक खरात, छाया नितीन चिखले, सुवर्णा विष्णू मंडलिक, दीपाली विलास ब्राह्मणे, स्नेहल राहुल जाधव, कविता विनोद मुळे, जयश्री प्रसाद सिरसाट, आश्‍विनी सुधीर सोनवणे, मीना पावलस गायकवाड या महिला एकत्र आल्या.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्राच्या मदतीने तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत ‘श्रावणी महिला स्‍वयंसाह्यता महिला बचत गट’ सुरू झाला.

शारदा कारभारी कानडे या गटाच्या अध्यक्ष आणि अलका दत्तात्रय सिरसाट यांनी सचीव म्हणून जबाबदारी स्वीकारली. गटातील महिलांना बॅंकेतून कर्ज मिळवून देणे याचबरोबरीने रोजगार उभारण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गर्जे, तालुका समन्वयक महेश आबूज, लोकसंचलित साधन केंद्राच्या सहयोगिनी शबनूर शेख यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले.

शेळीपालनातून सुरुवात

महिला बचत गट सुरू केल्यानंतर दर महिन्याला प्रत्येक महिलेने शंभर रुपयांची बचत सुरू केली. पहिल्या सहा महिन्यांमध्ये बचतीतून अंतर्गत व्यवहार सुरू झाले. गटातील महिलांनी प्रत्येकी एक शेळी खरेदी केली. साधारण चार वर्षे महिलांनी शेळीपालनाचा व्यवसाय केला. एका शेळीपासून चार-पाच शेळ्यांपर्यंत वाढ झाली. यातून चांगले भांडवल तयार झाले.

दुध व्यवसायाकडे कल

शेळीपालन करणाऱ्या महिलांनी पहिल्या टप्प्यात लहान कालवडी खरेदी केल्या. त्यांचे पालनपोषण करून विक्री करण्याचा प्रयत्न केला. मात्र कालवडीला लागणारा चारा, कष्ट आणि त्या तुलनेत अपेक्षित आर्थिक मिळकत नसल्याने महिलांचा कल दुग्ध व्यवसायाकडे वाढला.

कोल्हार खुर्द हे प्रवरा नदीकाठचे गाव. पाण्याची मुबलक उपलब्धता असल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न फारसा निर्माण होत नाही. यातूनच पशुपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

साधारण सात वर्षांपूर्वी सतरापैकी चौदा महिलांनी प्रत्येकी एक, दोन दुभत्या संकरित गाई घेतल्या. दुधातून मिळणारे उत्पन्न आणि बचत गटातून मिळणारा आर्थिक हातभार यातून टप्प्याने दुभत्या गाईंच्या संख्येत प्रत्येक महिलेने वाढ केली. सध्या प्रत्येक महिलेकडे पाच ते दहा दुभत्या संकरित गाई आहेत.

गटाच्या माध्यमातून दररोज सुमारे तीनशे लिटर दूध संकलन होत आहे. यातून दर दिवसाला गटातील महिलांना दहा हजार रुपये मिळतात. बहुतांश महिलांनी सुधारित गोठा तसेच अन्य सुविधा तयार केल्या. दूध काढणीपासून चारा उपलब्धता आणि अन्य कामे महिलाच करतात.

गटातील महिलांकडे अर्ध्या एकरापासून तीन एकरांपर्यंत जमीन आहे. अल्प क्षेत्र असलेल्या महिला चारा उत्पादनाला प्राधान्य देतात. याशिवाय अन्य पिकांची लागवड करतात. शारदा कानडे यांनी प्रवरेकाठी विहिरीसाठी जागा खरेदी करून तेथून शेतीसाठी पाइपलाइन आणली. यासाठी बचत गटातून मिळालेल्या पैशाचा मोठा आधार मिळाला.

बॅंकेची मिळाली साथ

महिला गटाने दोन वर्षांत चांगल्या प्रकारे आर्थिक व्यवहार केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने गट सुरू केल्यानंतर चार वर्षांनी तीन लाख रुपये कर्ज मिळाले. त्याची वेळीत परतफेड केल्यानंतर पुन्हा दोन वेळा सात लाख रुपये आणि अलीकडे नऊ लाखांचे कर्ज बॅंकेने दिले आहे.

साधारण नऊ ते दहा वर्षांत एकही हप्ता टळला नाही. वेळेत कर्जफेड केल्याने या गटाला बॅंकेकडून प्राधान्य दिले जाते. वेळेत कर्जफेड केल्यामुळे एकदा व्याजाचा परतावाही बॅंकेने दिला, असे गटातील सदस्या सुवर्णा मंडलिक यांनी सांगितले.

एकमेकींना सहकार्य...

तेरा वर्षांपूर्वी महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या महिलांचा एकोपा कामय आहे. गट तयार केला तेव्हा शंभर रुपये दर महिन्याला बचत केली जात होती. आर्थिक बळ वाढत गेल्यावर सात वर्षांपासून दोनशे रुपये बचत केली जात आहे.

आतापर्यंत गटाकडे चार लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक बचत आहे. गटातील सदस्या अडचणी असेल तर तिला आर्थिक मदत केली जाते. बचतीनुसार दहा महिना पन्नास ते साठ हजारांपर्यंत एका महिलेला कर्ज मिळते. वेळेत कर्ज फेड केल्यावर पुन्हा नव्याने कर्ज दिले जाते.

पशुपालन, मुलांचे शिक्षण, आरोग्य, शेती विकास, विहिरीचे खोदकाम, घराचे बांधकाम यासाठी बॅंक कर्ज, वैयक्तिक बचतीतील कर्ज गटातील सदस्याला मिळते. पशुपालनातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून सुवर्णा मंडलिक यांच्या दोन मुली वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.

शोभा कानडे, पार्वती कानडे यांना घर बांधणी, मीना गायकवाड यांना मुलीचे लग्न आणि आश्‍विनी सोनवणे यांना शेतात विंधन विहिरीसाठी आर्थिक आधार मिळाला. जयश्री सिरसाट यांना कांदा लागवड, काढणीसाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्यावर गटाने कर्ज दिले होते.

गटातर्फे मिनी अवजारे बॅंक

महिला बचत गटाला महिला आर्थिक विकास महामंडळाकडून रोजगार वाढीसाठी शंभर किलो क्षमतेचा वजन काटा, कांडप यंत्र, पीठ गिरणी आणि पॉकिंग यंत्र असलेली मिनी अवजारे बॅंक मंजूर झाली आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या प्रयत्नांतून तांबेरे रोडवर गटासाठी उत्पादन विक्रीसाठी स्टॉल मंजूर झाला असल्याचे महामंडळाचे तालुका समन्वयक महेश आबुज यांनी सांगितले.

संपर्क : शारदा कानडे, ९९२२२८८१०३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT