Farmer Producer Company
Farmer Producer Company Agrowon
यशोगाथा

दुर्गम भागातील चौरास कंपनीची यशस्वी घोडदौड

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

भंडारा हा दुर्गम व भात उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पवनी, लाखांदूर, लाखनी तालुक्‍यात जमीन सपाट आणि समांतर असल्यामुळे त्यास चौरास असे म्हटले जाते. त्यावरूनच हा भाग चौरास म्हणून ओळखला जातो. याच भागातील अनिल नौकरकर व सहकाऱ्यांनी चौरास शेतकरी गटाची (Chauras Farmers Group) २०१३ मध्ये ‘आत्मा’अंतर्गत (ATMA Project) स्थापना केली. गटाला विविध उपक्रम राबविण्याची इच्छा होती. पण गट म्हणून आर्थिक मर्यादा होत्या. बॅंकांकडून मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी कर्जही उपलब्ध करून देताना हात आखडता घेतला जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे २०१७-१८ च्या दरम्यान पुढील पाऊल म्हणून चौरास शेतकरी उत्पादक कंपनी (Chauras farmer Producer Company) उदयास आली. अध्यक्ष म्हणून किशोर काटेखाये, नौकरकर सचीव व अमर भेंडारकर, मधुसूदन डोये, आशा कठाणे आदी संचालक झाले. कंपनीचे सुमारे ३५०० सदस्य तर पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे ‘नेटवर्क’ आहे.

यांत्रिकीकरणाला चालना

कंपनीने भातपट्ट्यात यांत्रिकीकरणाला चालना दिली. तीस लाख रुपये निधीतून यंत्रांची खरेदी करताना १० लाख रुपये शासकीय अनुदान मिळाले. भात रोवणी यंत्राचा पुरवठा कंपनीने आपल्या सदस्यांसाठी एकरी पाच हजार रुपये दराने सुरू केला. यातून कंपनीला दोन हजार रुपये शिल्लक राहायचे. शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने अजून एक यंत्र आपल्या स्तरावर खरेदी केले. प्रति हंगामात २५० ते ३०० एकरांपर्यंत रोवणी या यंत्रांच्या माध्यमातून होते.

भात बीजोत्पादन व प्रमाणीकरण

भंडारा हा भाताचा जिल्हा असल्याने भात बीजोत्पादन तयार करण्याचे कंपनीने ठरविले. सध्या कंपनी अंतर्गत शंभर शेतकरी त्यात कार्यरत असून सहा ते सात वाणांचे बीजोत्पादन ते करतात. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून एचएमटी, पीकेव्ही तिलक या वाणांचे ‘ब्रदडर सीड’ घेतले जाते. तेलंगणातील कृषी विद्यापीठांकडील वाणांचेही प्रमाणित बियाणे तयार केले जाते. त्यासाठी बीज प्रक्रिया केंद्र उभारले असून त्यासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च केला आहे. रोवणी यंत्र भाडेतत्त्वावर देण्यातून मिळणारे उत्पन्न, कंपनीचे भांडवल व कृषी विभागाचे साडेबारा लाख रुपयांचे अनुदान अशा प्रकारे त्यासाठी आर्थिक जुळवाजुळव केली. प्रति तासाला दोन टन प्रक्रिया अशी यंत्राची क्षमता आहे.

बियाणे विक्री व्यवस्था

पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तेलंगण, आंध्र प्रदेश या भागातून ७० ते ८० रुपये प्रति किलो दराने भात बियाण्याची विक्री होते. आता चौरास सीड या ब्रॅण्डने शेतकरी कंपनीने आपले बियाणे उपलब्ध केले असून त्याचा दर ४५ रुपये प्रति किलो एवढा कमी आहे. कंपनीचे पाच हजारांवर सभासद आहेत. त्यांच्यासह संपर्कातील शेतकऱ्यांना विक्री होते. मध्य प्रदेशातील घाऊक विक्रेत्यांनाही बियाणे पुरवठा होतो. त्यासाठी संबंधित राज्याचा परवाना काढला आहे. यंदाच्या हंगामात २५० टन बियाणे पुरवठ्याचा करार केला आहे.

दोन गोदामांची सोय

कंपनीची प्रत्येकी २५० टन क्षमतेची दोन गोदामे आहेत. त्याचा वापर बियाणे साठवणुकीसाठी होतो. यातील एक गोदाम ‘लीज’वर घेण्यात आले आहे. दुसऱ्या गोदामासाठी प्रकल्प किंमत २५ लाख रुपयांपैकी सुमारे साडेबारा लाख रुपयांचे अनुदान अन्नसुरक्षा अभियानातून मिळाले आहे.

तांदळाला दिली बाजारपेठ

कंपनीतर्फे लाल, चिन्नोर तांदूळ आदींची विक्री केली जातेच. शिवाय तेलंगण राज्यातील एका कृषी विद्यापीठाने आरएनआर-१५०४८ हे तांदळाचे वाण विकसित केले आहे. त्याचा ‘ग्लायसेमिक इंडेक्‍स’ गव्हापेक्षा कमी आहे. त्यामुळे आरोग्यासाठी हा तांदूळ चांगला आहे. एकरी उत्पादकता २० ते २५ क्‍विंटलपर्यंत मिळते. या तांदळाचे ब्रॅण्डिंग व विक्री कंपनीने ‘टाटा सीसेफ’ प्रकल्पाच्या सहकार्यातून केली आहे. टाटा कंपनीची सुपरमार्केटस व नागपूर येथील एका मॉलला तांदूळ पुरवण्यात येतो. बाजारातील मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांकडून तांदूळ खरेदी होते. महिन्याला पाच टन याप्रमाणे सरासरी मागणी राहते. एक किलो पॅकिंगमधील तांदळाचा ठोक दर ९० रुपये असून, पुढे अन्य कंपन्या १३० रुपये दराने त्याची विक्री करतात. वर्षभरापूर्वी ऑफर म्हणून ९९ रुपये दराने मॉलमधून विक्री करण्यात आली होती.

ऑनलाइन विक्री

ॲमॅझॉन व अन्य कंपन्यांमार्फत ऑनलाइन पद्धतीनेही तांदळाची विक्री होते. तांदूळ विक्रीसाठी अन्नग्रहम असे ब्रॅण्डनेम देण्यात आले आहे.

आश्‍वासक उलाढाल व वाटचाल

कंपनीकडून नाफेडसाठी हमीभावाने पहिल्यावर्षी १६ हजार, तर दुसऱ्या वर्षी आठ हजार क्‍विंटल हरभरा खरेदी झाली. दुसऱ्या वर्षी बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड खरेदीकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे कंपनीच्या केंद्रावरील आवकही मंदावली. गेल्या तीन वर्षांच्या काळात सव्वापाच कोटी, त्यापुढे सव्वासहा कोटी व यंदा जुलैपर्यंत उलाढालीचा सहा कोटींचा टप्पा कंपनीने गाठला आहे. या वर्षअखेर एकूण दहा कोटींचे उद्दिष्ट गाठण्याची अपेक्षा कंपनीने ठेवली आहे. कंपनीच्या बियाणे क्षेत्रातील कार्याची दखल घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी कंपनीचा विशेष प्रमाणपत्र देत गौरव केला आहे.

अनिल नौकरकर, ९४२३३७०६३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT