Goat Farming Agrowon
यशोगाथा

Goat Farming : सिन्नरच्या ७५ वर्षीय आजोबांचा तरुणांना लाजवणारा शेळीपालनाचा व्यवसाय

घोरवड (ता.सिन्नर) येथील ७५ वर्षीय एकनाथ हगवणे यांनी ५० वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय मोठ्या उमेदीने व चिकाटीने सुरू ठेवला आहे. काळानुसार जातींमध्ये बदल, व्यवस्थापनात सुधारणा व शास्त्रीय पध्दतीचा अवलंब याद्वारे शंभर पर्यंत शेळ्यांचे संगोपन होते.

मुकूंद पिंगळे

Nashik Story : नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्याच्या पश्चिमेला मुंबई-शिर्डी रस्त्यावर घोरवड आहे. येथील एकनाथ हगवणे यांची सहा एकर शेती आहे. ती कोरडवाहू असल्याने केवळ जनावरे चरायची.

पन्नास वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीत रोजगाराचा सक्षम पर्याय नसल्याने मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करायचे. कामावर जायला उशीर झाल्यास मालकांचा त्रागा सहन करावा लागे.

कुणाची चाकरी नको, शेतीतच स्वावलंबी व्हावे असे खूप वाटायचे. अशावेळी १९७३ मध्ये ५५ रुपयांना शेळी विकत घेत वयाच्या २५ व्या वर्षी शेळीपालन व्यवसाय सुरू केला. गावानजीक पडीक माळरानावर, डोंगर परिसरात शेळ्या चरण्यासाठी नेण्याचा दिनक्रम होता.

आजवर दोन अपघात झाले. पण सुदैवाने एकनाथ त्यातून वाचले. सुरवातीच्या अवघ्या शेळीपासून आज एकेक करीत ते १०० शेळ्यांपर्यंत पोचले आहेत. गायी-म्हशींचे पालनही ते करतात.

७५ वर्षांचे असूनही या व्यवसायात तरुणांना लाजवेल या उत्साहाने व उमेदीने एकनाथ कार्यरत असतात. कष्ट आणि सातत्य ठेवल्यानेच कुटुंबाचे अर्थकारण उंचावणे व परिवर्तन घडवणे त्यांना शक्य झाले.

याच व्यवसायाच्या जोरावर कुटुंबाने मुरमाड जमीन विकसित केली. त्यावर विविध पिकांसह चारापिके आहेत. विहीर खोदली. ट्रॅक्टरसह यांत्रिकीकरण केले. दोन मुलांचे तर तीन मुलींचे लग्नकार्य केले. पक्के घर बांधले. आता पूर्वीचे हलाखीचे दिवस जाऊन आज कुटुंब सुखाचे दिवस अनुभवत आहे.

शेळी हेच आमचं पीक

सुरवातीला संगमनेरी शेळ्या होत्या. चार वर्षांपासून काठेवाडी, उस्मानाबादी, सिरोही जातीच्या शेळ्यांचे संगोपन केले जाते. अधिक दूध देणारी, करडांच्या पैदाशीसाठी , मांस व्यवसायासाठी अशा विविध कारणांसाठी जातींची निवड केली जाते. त्यानुसार वार्षिक कामकाज आखले आहे.

एकनाथ यांच्या कन्या वनिता संगोपन, खरेदी विक्री व्यवस्था आदी जबाबदाऱ्या पाहतात. शेळी हेच आमचे पीक आणि तेच एटीएम असे त्या आवर्जून सांगतात.

पहाटे पाच वाजता शेडमधून शेळ्या बाहेर सोडल्या जातात. शेडची स्वच्छता, दूध काढणी, पशू खाद्य देणे ही कामे झाल्यानंतर ११ वाजता शेळ्यांना मुक्त चराईसाठी एकनाथ घेऊन जातात

व्यवसायातील ठळक बाबी

शेळ्या- १४५ (सिरोही-१५, काठेवाडी-७५, उस्मानाबादी-७, करडे -४८)

-व्यायलेल्या शेळ्या, करडे यांची स्वतंत्र व्यवस्था.

-वार्षिक एक किंवा शेळीच्या सुदृढतेनुसार दोन वेत घेण्याकडे कल

-दिवाळीला व्यायल्यानंतर नोव्हेंबर ते जूनदरम्यान दूधविक्री.

-वर्षाला ५० हून अधिक करडांची पैदास.

-अर्धबंधिस्तसह मुक्त पद्धतीने चरत असल्याने चाऱ्यावरील खर्च कमी.

-योग्य व्यवस्थापन, काटेकोर आहारामुळे शेळ्यांची चांगली वाढ. प्रजनन क्षमता चांगली. क्षार मिश्रणांची वीट टांगून ठेवली जाते. करडांना कडुनिंब पाला.

-हिरव्या चाऱ्यात लसूण घास, दशरथ घास, मका, शाळू, गिन्नी गवत. उंबर, आपटा, सुबाभूळ, हादगा, चिंच यांचा पाला. सोयाबीनचे कोरडे भूस. घरगुती मुरघास निर्मिती.

-वेळेवर लसीकरण, जंतनिर्मूलन. पशुवैद्यक व तज्ज्ञांसोबत वेळोवेळी चर्चा. त्यातून

मरतुकीवर नियंत्रण व व्यवसायात सातत्याने सुधारणा.

-दरवर्षी शेळ्यांचा विमा

-करडांची पैदास, विक्री, दूध विक्री आदी सर्व लेखी नोंदी.

उत्पन्न व विक्री व्यवस्था

पूर्वी घोटी, सिन्नर, सायखेडा, वावी येथे बाजारात विक्रीसाठी एकनाथ जायचे. नगावर अंदाजे विक्री व्हायची. आता ३१०, ३३० ते ३५० रुपये प्रति किलोप्रमाणे वर्षाला सुमारे ३० बोकडांची विक्री होते. वर्षाला १० ते १५ पाटींची विक्री ३१० रुपये प्रति किलोप्रमाणे होते.

१५ किलो ते २५ किलो वजनापर्यंतच्या करडांची विक्री होते. चालू वर्षी २७ पाटी व २३ बोकड आहेत. पाटी पालन करणाऱ्यांनाच करडू देण्याला प्राधान्य असते. मटण विक्रेत्यांना किरकोळ विक्री होते.

दूध

दैनंदिन १० ते १५ लिटर तर वार्षिक तीनहजार लिटरपर्यंत दूध विक्री (नोव्हेंबर ते जून) होते. सावित्रीबाई फुले महिला शेळी उत्पादक कंपनीला शेळ्या तसेच दुधाचा पुरवठा होतो. यात युवा मित्र संस्थेचीही मदत होते. ४२ रुपये प्रति लिटर दर दुधाला मिळतो.

लेंडीखत

घरच्या शेतावर वापर झाल्यानंतर उर्वरित लेंडीखताची विक्री प्रति क्विंटल चार हजार रुपये दराने होते. लेंडीखतावर आधारित गांडूळखत प्रकल्प अलीकडेच सुरू केला असून दोन ट्रॉली उत्पादन घेतले आहे.

कुटुंबाची प्रेरणादायी वाटचाल

एकनाथ यांना पत्नी राहीबाई, मुलगा मच्छिंद्र, सूनबाई ज्योती यांची समर्थ साथ आहे. वनिता दरवर्षी युवामित्र संस्थेतून तीन दिवसीय शेळीपालन व्यवस्थापन प्रशिक्षण घेतात. त्या सावित्रीबाई फुले महिला शेळी उत्पादक कंपनीसोबत जोडल्या आहेत.

ट'आदर्श शेळीपालक' म्हणून आता कुटुंबाचा नावलौकिक झाला आहे. युवा मित्र संस्थेचे मार्गदर्शन व पशुसंवर्धन विभागाची साथ मिळते.

महिला उपजीविका विकास कार्यक्रम अंतर्गत स्पर्धेत 'उत्कृष्ट शेळी पुरस्कार', पशुसंवर्धन विभागावतीने कामधेनू दत्तक ग्राम योजनेंतर्गत दुग्ध स्पर्धेतही कुटुंबाचा सन्मान झाला आहे.

संपर्क- वनिता बारे- ८८३०७१२२६९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT