Pravin Bari Agrowon
यशोगाथा

Integrated Farming : डहाणूतील प्रवीण बारी यांनी प्रयोगशील वृत्तीतून साधला एकात्मिक शेतीचा विकास

Team Agrowon

उत्तम सहाणे, डॉ. विलास जाधव

Success Story : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुका चिकू व भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील कंक्राडी गावातील प्रवीण वासुदेव बारी यांची प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी अशी ओळख आहे.त्यांची १९ एकर बागायती शेती आहे. सन १९७९ मध्ये ते बारावी उत्तीर्ण झाले. त्या वेळी घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वडिलांसोबत शेती सुरू केली.

सन १९८६ मध्ये वडिलांचे निधन झाले. पण हिंमत एकवटून वडिलांच्या शेतीच्या संस्कारातून पुढे वाटचाल सुरू केली. सन १९८७ मध्ये बँक ऑफ बडोदामधून कर्ज काढले. त्यातून १० एकर जिरायती गवती शेतात सिमेंट खांब व तारेचे कुंपण घालून भाजीपाला शेती सुरू केली.

हळूहळू शेतीत स्थैर्य येऊ लागले. शेतीतील उत्पन्नातूनच १९८८ मध्ये आपल्या विवाहासाठी पैसे उभे केले. सन १९९२ च्या सुमारास ठिबक सिंचन तीन एकरांवर केले. ढोबळी मिरची, टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी आदींचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.

शेतीतील प्रयोग

पारंपरिक पिकांमध्ये अडकून न राहाता शेतीतील नवे तंत्रज्ञान मिळविण्याची प्रवीण यांच्यात जिज्ञासा असते. त्यामुळेच कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राशी (केव्हीके) त्यांचा कायम संपर्क असून, तेथील विविध प्रशिक्षणांत ते आवर्जून भाग घेतात.

त्यातूनच बीजप्रक्रिया, सेंद्रिय शेती, मधमाशीपालन, चिकू शेती पुनरुज्जीवन, भाजीपाला यातील सुधारित तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात केले. सन २०१९ मध्ये इस्राईल येथे अभ्यास दौऱ्यासाठी त्यांची निवड झाली.

चिकूची शेती

-सन १९८८ मध्ये दोन एकरांपासून सुरू केलेली कालीपती वाणाची चिकू लागवड आज बारा एकरांत.

-आठ देशी गायी, दोन म्हशी. शेण व गोमूत्रापासून जीवामृत निर्मिती.

-जुन्या दोन एकर बागेची शास्त्रीय पद्धतीने छाटणी. त्यामुळे उत्पादनात वाढ. सध्या प्रति झाड १६० ते १८० किलो व त्याहून अधिक उत्पादन मिळते.

-झेल्याने काढणी. स्वच्छ पाण्याने धुऊन गोणी किंवा खोक्याद्वारे डहाणूतील चिकू मार्केटमध्ये चिकूची पाठवणी, हंगामात कमाल दर प्रति किलो ४० ते ५० रुपये, सरासरी दर २० ते २२ रु व किमान दर १० रुपयांपर्यंत.

-चिकू बागेत व बांधावर २० केसर, १० हापूस आंबा, १२ सफेद जाम, २० नारळ, १० पेरूची झाडे. गेल्या वर्षी तैवान ७८६ आणि आइसबेरी जातीची एक एकरात पपई. तूर, खपली गहू व मिरची

-सन २०१९ मध्ये तीन एकरांत तूर. त्यात भेंडीचे आंतरपीक. तुरीच्या काही हिरव्या शेंगांची मुंबई मार्केटला व उर्वरित तुरीची वाळवून

विक्री

-सन २०२० मध्ये दोन एकरांत खपली गहू घेतला. या भागात तसा हा प्रयत्न नवा होता.

-मागील वर्षी एक- दोन एकरांत मिरची. विविध सापळे, जैविक, वनस्पतीजन्य आणि रासायनिक कीडनाशकांचा वापर केला. पण ‘ब्लॅक थ्रीप्स’मुळे नुकसान झाले.

भात लागवड

-दरवर्षी दोन- तीन एकर क्षेत्र. या वर्षी वाडा कोलम आणि कर्जत-३ या जातींची लागवड. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा वापर. लागवडीवेळी गिरिपुष्प पाला तर खोडकिडीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे यांचा वापर. तांदूळ घरीच वापरला जातो.

सूर्यफूल आणि परागीभवनासाठी मधमाशीपालन

यंदा एक एकरात संकरित सूर्यफुलाचे चार फुटी सरी वरंब्यावर ठिबकद्वारे लागवड केली. कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ उत्तम सहाणे यांच्या मार्गदर्शनातून परागीभवनासाठी सहा मधपेट्या शेतात ठेवल्या आहेत. दोन फुलोरी माशीची नैसर्गिक मोहोळे तयार झाली आहेत. फुलांवर

मधमाशांची संख्या चांगल्या प्रमाणात दिसते आहे. हे मनमोहक दृश्य अनुभवण्यासाठी परिसरातील शेतकरी आणि पर्यटक येथे भेट देत आहेत. सूर्यफुलाचे भरघोस उत्पादन मिळेल अशी प्रवीण यांना खात्री आहे.

चिकू, आंब्यावर प्रक्रिया

फळांचे मूल्यवर्धन केल्यास फायदा अधिक होतो. फळांची नासाडी कमी होते. या उद्देशाने घरातील महिला वर्गाकडून चिकू चिप्स आणि काही प्रमाणात पावडर बनविली जाते. त्यासाठी सौर वाळवणी यंत्राचा (सोलर ड्रायर) वापर केला आहे.

दोन वर्षांपूर्वी आंबा बागेत वादळ, पावसामुळे आंबा उत्पादकांचे नुकसान झाले. अशा वेळी सोलर ड्रायरचा वापर करून कैऱ्यांपासून चिप्स बनविले. काही ग्राहक घरून खरेदी करतात. स्थानिक बाजार, प्रदर्शने आदी ठिकाणी बचत गटांमार्फतही विक्री होते.

सेंद्रिय शेती प्रसार

कृषी विभागाच्या संजीवनी सेंद्रिय शेती गटाचे प्रवीण सदस्य आहेत. सात वर्षांपासून ते सेंद्रिय शेतीत कार्यरत आहेत. ओम साई चिकू उत्पादक शेतकरी गटाचेही प्रवीण सचिव असून, त्यामार्फत प्रशिक्षणे, चर्चासत्रांचे आयोजन होते.

प्रवीण यांना पत्नी सौ. प्रतीक्षा यांची मोठी मदत होते. त्यांची मुलगी आर्किटेक्ट, तर लहान बंधू दिनेश वास्तुशास्त्र तज्ज्ञ आहेत. दोघा बंधूंनी मिळून शेतात सुंदर बंगला बांधला आहे.

संपर्क - प्रवीण बारी, ७८७५३४६९८९, ९८६०३६४२२८ (लेखक डॉ. जाधव केव्हीके, कोसबाडचे कार्यक्रम समन्वयक, तर श्री. सहाणे पीक संरक्षण तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

Weather Update : नक्षत्र बदलले; वातावरणात वाढला उन्हाचा चटका

SCROLL FOR NEXT