Dairy
Dairy Agrowon
यशोगाथा

Dairy : दुग्ध उत्पादनांचा ‘पाटील ब्रॅण्ड’

विकास जाधव 

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका हा दूध उत्पादनात आघाडीवर आहे. येथील अनेक शेतकऱ्यांनी प्रमुख कृषिपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायास पसंती दिली आहे. आसू (ता.फलटण) येथील सुरेश किसन जाधव-पाटील यांचा लॅंडस्केपिंग (Landscaping) हा प्रमुख व्यवसाय आहे. मुंबई येथे काही काळ लॅंडस्केपिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर पुण्यात २३ वर्षे स्वतःचा व्यवसाय केला. त्यानंतर फलटण येथे लॅंडस्केपिंग व्यवसाय सुरु केला. वडील किसनराव खिलार जनावरांचे संगोपन करत होते. त्यामुळे सुरेश यांनाही देशी गायींच्या संगोपनाची (Cow Rearing) आवड होती. सुरेश यांचे ५ भावांचे कुटुंब. त्यातील एका बंधूचे निधन झाले असून दोन बंधू इंदापूर तर एक बंधू आसू येथे वास्तव्यास आहे.

साहिवाल गाईचा मुक्तसंचार गोठा ः

सुरेश यांच्या कुटुंबाची आसू येथे १६ एकर शेतजमीन आहे. फलटणपासून त्यांचे गाव २८ किमी अंतरावर आहे. सुरेश हे लॅंडस्केपिंगची कामे करण्यासाठी फलटण येथे राहतात. त्यामुळे फलटणमध्येच सहा एकर जागा भाडेतत्त्वावर घेत गोठ्याची उभारणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आधीपासूनच देशी गायींचे संगोपन करायचे अशी खूणगाठ बांधली होती. त्यानुसार त्यांनी देशी गायींच्या विविध जातींची माहिती घेण्यास सुरुवात केली. नातेपुते येथील संतोष निकम यांच्या साहिवाल गायींच्या गोठ्याला भेट दिली. साहिवाल गायी अधिक प्रमाणात दर्जेदार दूध उत्पादन आणि स्वभावाने शांत असल्याने संगोपनासाठी यांची निवड केली.

पुढे २०१९ मध्ये भाडेतत्त्वावरील जमिनीत ५ गुंठे क्षेत्रात तारेचे कुंपण बांधून मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली. राजस्थान येथून आठ गायी विकत आणून व्यवसायास सुरुवात केली. गोठ्यावर कामांसाठी २ मजूर ठेवले. आपल्या लॅंडस्केपिंग व्यवसायातून जास्तीतजास्त वेळ काढून सुरेश गोठ्यातील कामांवर लक्षकेंद्रित करायचे. सुरुवातीच्या काळात कमी दूध उत्पादन मिळत होते. त्यावेळी ८० रुपये प्रति लिटर दराने घरोघरी जाऊन दूध विक्री करायचे. गोठ्यातील गाईपासून कालवडी तयार होत गेल्या आणि नंतर ४ गाई खरेदी करत गाईची संख्या २२ वर नेली.

गोठ्याचा विस्तार ः

व्यवसायाचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने सुरेश यांनी मागील २ महिन्यांपूर्वी आसू येथे स्वतःच्या शेतामध्ये गोठ्याची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. शेतात २० गुंठे क्षेत्रात १०० बाय ४० फूट आकाराच्या शेडची उभारणी करत मुक्तसंचार गोठा उभारला. यात चारा व पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. फलटण येथील गोठ्यातील गायी गावातील गोठ्यात आणल्या. सध्या गोठ्यात ४० साहिवाल गायी आणि खिलार जातीच्या २ गायी, १ वळू अशी एकूण ४३ जनावरे आहेत.

वैदिक तूप निर्मिती ः

श्री. जाधव हे साहिवाल गाईच्या दुधापासून वैदिक पद्धतीने तुपाची निर्मिती करतात. आदल्या दिवशी काढलेले दूध गरम करून घेतले जाते. त्यानंतर दुधाला विरजण लावले जाते. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता घाण्यावर लोणी काढले जाते. तूप तयार करताना त्यात खाऊची पाने, तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. संपूर्ण लोण्यापासून तुपाची निर्मिती ही पहाटेच्या वेळी केली जाते. सरासरी २५ ते २७ लिटर दुधापासून एक किलो तुपाची निर्मिती होते. महिन्याकाठी सरासरी ४० ते ४५ किलो तूप तयार होत असल्याचे जाधव सांगतात.

ठळक बाबी ः

- गायींसाठी २० गुंठ्यावर मुक्तसंचार गोठ्याची उभारणी.

- प्रतिदिन दोन वेळचे मिळून ५० ते ५५ लिटर दूध उत्पादन.

- त्यापैकी १५ लिटर दुधाची काचेच्या बाटलीमधून रतीबाने विक्री.

- उर्वरित दुधापासून तूप निर्मिती. महिन्याला ४० ते ५० किलो तुपाची निर्मिती.

- रतिबाच्या दुधाची ९० रुपये प्रति लिटर तर तुपाची प्रतिकिलो ३

हजार रुपये दराने विक्री.

- तूप विक्रीसाठी पाव किलो, अर्धा किलो व एक किलो याप्रमाणे काचेच्या बाटलीमध्ये पॅकिंग केले जाते.

- दूध व तूप विक्रीसाठी ‘पाटील ॲग्रो’ ब्रॅण्डची निर्मिती.

- पुणे, मुंबई, दिल्ली या मोठ्या शहरांत तूप विक्रीसाठी पाठविले जाते.

- गाईच्या चाऱ्यात मुरघास, सुपर नेपिअर, मका, १२ प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची भुकटी, सेंद्रिय गूळ, चार प्रकारची कडधान्ये वापरली जातात.

- स्वतः वर्षाला ४० ते ५० टन मुरघास तयार करतात.

व्यवसायातील अर्थशास्त्र ः

दर महिन्याला ४०० लिटर दुधाच्या विक्रीतून ३६ हजार रुपये तर ४० किलो तुपाच्या विक्रीतून १ लाख २० रुपये असे एकूण एक लाख ५६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. यामध्ये चारा व इतर खर्च साधारणपणे ५० टक्के होत असून ५० टक्के रक्कम शिल्लक राहत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

मागील तीन वर्षांतील सरासरी अर्थशास्त्र ः

वर्ष---दूध उत्पादन (प्रतिमाह)---तूप उत्पादन (प्रतिमाह)

२०१९-२०---दहा लिटर दुधाचे २२ ते २४ हजार----१५ किलो तुपाचे ३० ते ४० हजार रुपये.

२०२०-२१---१२ लिटर दुधाचे २५ ते २६ हजार----२० किलो तुपाचे ५५ ते ६० हजार रुपये.

२०२१-२२---१५ लिटर ४० हजार---४० किलो तुपाचे एक लाख २० हजार रुपये.

कुटुंबाची साथ ः

दूध काढल्यापासून तूप तयार करण्यापर्यंतची सर्व कामे पत्नी आशा करते. सोशल मिडीयावर तसेच इतर ठिकाणी विक्री करण्यासाठी मुलगा अनिकेत, मुलगी अनुष्का यांची मदत होते. विविध कामांमध्ये बंधू अभिमन्यू व पुतण्या संग्राम यांची मदत होते.

दुग्ध व्यवसायाच्या अनुषंगाने दैनिक ‘ॲग्रोवन’ मध्ये वेळोवेळी प्रसिद्ध झालेली माहितीची सर्व कात्रणे काढून संग्रही ठेवली आहेत. त्यातून मिळालेल्या माहितीचा वेळोवेळी वापर होतो. भविष्यात स्वतःच्या शेतामध्ये कृषी पर्यटन, निसर्ग उपचार केंद्र, गुरुकुल शिक्षण सुरू करण्याचा मानस आहे.
सुरेश जाधव-पाटील, ८३२९२४९५२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT