Banana Export
Banana Export  Agrowon
यशोगाथा

Banana Export : केळी निर्यातीकडे ‘जय स्वामिनारायण’ ची वाटचाल

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यातील तरडी (ता. शिरपूर) गाव अनेर नदीच्या लाभक्षेत्रात आहे. गावामध्ये केळी (Banana), पपई (Papaya), कपाशी (Cotton) व मका आदी पिके अधिक असतात. पूर्वी गाव दर्जेदार कापूस उत्पादनात (Cotton Production) अग्रेसर होते. ही ओळख कायम ठेवत गावाने दर्जेदार केळी उत्पादनातही (Banana Production) नाव कमावले आहे. यासाठी जय स्वामिनारायण बनाना फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे मोलाचे योगदान आहे.

पाच ते सहा वर्षांपूर्वी गावातील मोजकेच शेतकरी केळी पीक घेत होते. गावातील पद्माकर पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केळी पिकाचे अर्थशास्त्र लक्षात घेऊन यासाठी काम करायचे ठरविले. त्यासाठी केळी पिकासाठी काम करणारी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे ठरविले. त्यातूनच १ सप्टेंबर, २०२१ मध्ये ‘जय स्वामिनारायण बनाना फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ स्थापन करण्यात आली.

पद्माकर जगन्नाथ पाटील हे कंपनीचे अध्यक्ष रवींद्र निंबादास पाटील हे सचिव आहेत. बापूसाहेब शिवाजी पाटील, रामेश्‍वर पाटील, कपिल पाटील, ईश्‍वर पाटील, प्रकाश पाटील, हेमंत पाटील, जगन्नाथ काशिराम पाटील, अपर्णाबाई कांतिलाल पाटील, सुनील पाटील, गणेश पाटील तर चोपडा तालुक्यातील गणेश पाटील आणि सुनील पाटील हे संचालक आहेत. कंपनीच्या सर्व कार्यालयीने कामांची जबाबदारी सागर चरित्र हे पाहतात.

लोकसहभागातून सुरुवात

कोविडपूर्वी कंपनी स्थापनेविषयी नियोजन सुरू होते. दरम्यान, कोविडमुळे काही अडचणी आल्या. मात्र त्या वेळी काम सुरूच ठेवले. गावोगावी शेतकऱ्यांच्या घरी जात कंपनीत सहभाग वाढविण्याची मोहीम सुरू केली. काही काळातच कंपनीने ४०० सभासद तयार केले. त्यांच्याकडून ११०० रुपये वर्गणी गोळा करण्यात आली. मात्र फक्त सभासदांच्या केळी पिकासाठी काम करायचे, हा विचार न करता सोबत येईल त्यांच्यासाठी काम सुरू ठेवले.

गावामध्येच खते, कीडनाशके व केळी रोपांच्या विक्रीसाठी कृषी सेवा केंद्र सुरू केले. त्यासाठी भाडेतत्त्वावर एक गोदाम घेतले. कंपनीचे कार्यालय तरडी (जि. धुळे) येथे असले तरी जळगाव जिल्ह्यातही काम आहे. चोपडा तालुक्यातील कुसुंबा, मोहिदे, अजंतीसीम, वढोदा, शिरपुरातील तोंदे, भावेर येथेही कंपनीचे सभासद आहेत. ही गावे एकमेकांजवळ असल्याने सभासदांना खते, कीडनाशके व रोप खरेदीसाठी अधिकचा वाहतूक खर्च किंवा इतर अडचणी येत नाहीत.

उत्पादकता वाढ, दरही चांगले

कंपनीने केळी पिकामध्ये काम सुरू केल्यानंतर लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली. शिवाय गुणवत्ता व उत्पादकताही वाढली. पूर्वी एकरी २० टनांपर्यंतचे उत्पादन मिळायचे. आता ते ३२ टनांवर पोहोचले आहे. काही शेतकरी एकरी ३५ टन केळी उत्पादन घेतात.

दरवर्षी साधारण १५० ते २०० कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात इराण, इराक, दुबईमध्ये होते.

जळगावमधील खरेदीदारांकडून दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, काश्मीर येथे केळी पाठविली जातात. पंजाब, दिल्लीच्या खरेदीदारांकडून मागणी वाढते आहे. खरेदीदार क्विंटलमागे ५०० रुपये अधिक दराने केळी नेतात.

सह्याद्री फार्म्स, देसाई, वीनटेक्स, आयएनआय, एस.के. इत्यादी कंपन्या केळीची खरेदी करून देश-परदेशांत पाठवितात.

मागील तीन वर्षे केळीला किमान १२०० आणि कमाल २२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. यंदा २००० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

नाबार्डसह बँकांची मदत

कंपनीचे काम पाहून नाबार्डने कंपनीला ३३ लाख रुपये निधी दिला आहे. कंपनीचे कामकाज पाहण्यासाठी नाबार्डचे पुणे स्थित महाव्यवस्थापक एस. के. नंदा यांनी तरडी गावाला विशेष भेट दिली होती. या वेळी कंपनीला ३ टन क्षमतेचे मालवाहू वाहन देण्याचा प्रस्तावही मंजूर केला. सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे, केळीतज्ज्ञ के. बी. पाटील, नाबार्डचे विवेक पाटील, नितीनचंद्र सूर्यवंशी, बाएफचे नितीन पाटील, सुधीर वागले, राकेश मोरे, लीलेश चव्हाण यासह धुळे व शिरपूर येथील कृषी यंत्रणांची कंपनीला मदत होते.

वार्षिक उलाढाल

कंपनीची दरवर्षी दोन कोटी रुपयांवर उलाढाल होते आहे. कंपनी नफा तत्त्वावर काम करीत नसल्याने नफा सहा ते सात लाख रुपये वार्षिक एवढा आहे. आगामी काळात कंपनी केळी प्रक्रियेतही उतरणार आहे. फिलिपिन्सच्या धर्तीवर केळीचे पॅकहाउसही उभारले जाणार आहे.

फ्रूट केअर तंत्र, व्यवस्थापनावर भर

सभासदांसह इतर जुळलेले शेतकरी निर्यातक्षम उत्पादनासाठी फ्रूट केअर तंत्रज्ञानाकडे वळले आहेत. त्यासाठी आवश्यक निविष्ठा, सामग्री रास्त दरात कंपनीद्वारे पुरविल्या जातात. कीडनाशके, स्कर्टिंग बॅग आणि रसायन अवशेषमुक्त केळी उत्पादनासाठी सेंद्रिय, जैविक खते उपलब्धता केली जाते.

लागवड मे व जून महिन्यांत होते. या काळात तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. बागेचे संरक्षण करण्यासाठी ताग, धैंचा या पिकांची लागवड, खत व सिंचनावर विशेष भर दिला जातो. योग्य व्यवस्थापनअंती साधारण फेब्रुवारी, मार्चमध्ये काढणी होते. या काळात निर्यात अधिक असते तसेच स्थनिक बाजारातही चांगली मागणी असते. त्यामुळे दरही चांगले मिळतात. कुकुंबर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जागृती.

निर्यातक्षम केळी उत्पादनात ओळख

चोपडा भागात पारंपरिक पद्धतीने केळी उत्पादन घेतले जायचे. मात्र निर्यातक्षम केळी उत्पादन होत नव्हते. दर्जेदार, निर्यातक्षम केळी उत्पादनाचा कंपनीने चंग बांधला. केळी पिकाचा पूर्ण अभ्यास करून बाजार व्यवस्थेविषयी माहिती घेतली. त्यासाठी केळीतज्ज्ञ के. बी. पाटील यांची मोठी मदत झाली. त्यातून निर्यातक्षम केळी उत्पादन सुरू केले. तरडी गावात एक हजार हेक्टर क्षेत्र असून, पूर्वी कमाल क्षेत्रावर कापूस उत्पादन घेतले जायचे. मात्र सध्या दरवर्षी ४५० एकरांपेक्षा अधिक क्षेत्रात केळी लागवड होते. याशिवाय दरवर्षी ५ लाख केळी रोपांची विक्री केली जाते.

पद्माकर पाटील ९३७१७२२१००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT