Goat Farming
Goat Farming Agrowon
यशोगाथा

Goat Farming : शेळीपालनातून आर्थिक प्रगतीची दिशा

माणिक रासवे

लताबाई टेकाळे यांचे माहेर परभणी. त्यांचे वडील दत्तराव मुंढे यांना रोजगारासाठी नांदेड येथे जावे लागले. त्यानंतर काही वर्षांनी ते परभणीमध्ये स्थायिक झाले. १९९४ मध्ये लताबाईंचा विवाह आळंद (ता. परभणी) येथील एकनाथ टेकाळे यांच्याशी झाला. एकनाथ यांचा अनेक वर्षांपासून परभणी शहरात ऑटोरिक्षा व्यवसाय आहे. टेकाळे दांपत्याला नितीन, अविनाश ही दोन मुले, सोनाली ही मुलगी. टेकाळे कुटुंबीय परभणी शहरातील रामेश्‍वर प्लॉट भागात भाडेतत्त्वाच्या जागेत वास्तव्यास असताना तेथील महिला बचत गटांच्या सदस्यांशी ओळख झाली. त्या वेळी महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नयी रोशनी लोकसंचलित साधन केंद्राच्या सहयोगिनी मीरा कऱ्हाळे यांच्याशी लताबाईंची ओळख झाली. कऱ्हाळे यांच्याकडून त्यांना बचत गटांच्या फायद्याबाबत माहिती मिळाली.

दरम्यानच्या काळात टेकाळे कुटुंबीयांनी शहरातील आयेशा कॉलनी भागात स्वतःची जागा खरेदी केली. तेथे घर बांधकाम करून वास्तव्यास गेले. नवीन लोकवस्ती असलेला हा भाग शहराजवळून जाणाऱ्या जायकवाडी कालव्याच्या परिसरात आहे. या भागातील मजुरी, शेती कामे करणाऱ्या अनेक महिलांना कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वयंरोजगार, गृहउद्योग सुरू करण्याची इच्छा होती. परंतु त्यासाठी त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ मिळत नव्हते. हे ओळखून लताबाईंनी २०१४ मध्ये काही महिलांना एकत्र केले. महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत श्री महालक्ष्मी महिला स्वयंसाह्यता गट स्थापन केला. सध्या या गटाच्या अध्यक्षा लता टेकाळे आणि सचिव शबाना शेख रसूल आहेत. बचत गटामध्ये दहा महिला सदस्य आहेत. बचत गटाचे बँक ऑफ बडोदामध्ये खाते आहे. दहा सदस्यांचे प्रत्येकी शंभर रुपये या प्रमाणे दर महिन्याला बचत गटाची एक हजार रुपयांची बचत होते.सहा महिन्यांनंतर बचत गटाला स्वयंरोजगारासाठी आयसीआयसीआय बँकेकडून ८५ हजार रुपये कर्ज मिळाले. कर्ज रकमेत गटाच्या प्रत्येक सदस्यास समान हिस्सा मिळतो. त्यानुसार लताबाईंना ८ हजार ५०० रुपये कर्ज मिळाले.

शेळीपालनास प्रारंभ ः

लताबाई टेकाळे यांनी कर्जाच्या रकमेतून परभणी मधील जनावरांच्या बाजारातून एक शेळी खरेदी केली. घराच्या परिसरातील शेतशिवारातून गवत, झाडपाला तसेच विकतची सरकी पेंड, भरडा यावर शेळीचे पालन पोषण सुरू केले. या शेळीने पहिल्या वर्षी दोन वेतात चार पिले दिली. त्या चारही पाटी होत्या. गेल्या पाच वर्षांत सर्व पाटींचा सांभाळ केल्यामुळे त्यांच्याकडे सध्या लहान मोठ्या मिळून ४५ शेळ्या झाल्या.

चारा, पाणी व्यवस्थापन ः

शेळ्यांची संख्या वाढल्यामुळे लताबाईंना जागा कमी पडू लागली. गरजा भागून शिल्लक बचतीच्या रकमेतून लताबाईंनी घराशेजारी जागा खरेदी केली. त्या ठिकाणी लाकडी फळ्यांच्या भिंती, पत्र्याचे छत असलेला १५ बाय २५ फूट आकाराचा गोठा उभारला. गोठ्यामध्ये शेळ्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा आहे. तसेच चारा ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. पाण्यासाठी महापालिकेची नळजोडणी घेतली आहे. उन्हाळ्यात गोठ्यातील तापमान योग्य राखण्यासाठी पंखे बसविलेले आहेत. गोठ्यामध्ये पिलांसाठी वेगळी व्यवस्था केलेली आहे.

शेळ्या बाहेर चारण्यासाठी नेण्यासाठी एक मजूर ठेवला होता. परंतु लताबाईंचे वडील दत्ताराव मुंडे हेच शेळ्यांना चरावयास नेतात. पाऊस नसेल त्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत शेळ्या परिसरातील शिवारात चरावयास सोडल्या जातात. त्यांनी काही शेजारच्यांच्या शेळ्यादेखील सांभाळण्यास घेतलेल्या आहेत. शहरातील पशुवैद्यकाकडून दर पंधरा दिवसांनी शेळ्यांची आरोग्य तपासणी करून उपचार केले जातात. नियमितपणे जंतनाशके दिली जातात. वर्षातून एकदा लसीकरण केले जाते.

लताबाई शेळ्यांच्या गोठ्याची स्वच्छता, चारा, पाणी आदी कामे करतात. तसेच परिसरातील महिलासोबत जाऊन परिसरातील शेतातून बोरीचा पाला, विविध झाडांची पाने, गवत आदी चारा गोळा करून आणतात. शेळ्यांच्या खाद्यामध्ये सरकी पेंड आणि भरडा यांचा समावेश असतो. सध्या महिन्याला सव्वा क्विंटल सरकी पेंड आणि सव्वा क्विंटल भरडा लागतो. दूध कमी पडते त्या वेळी पिलांना वरचे दूध दिले जाते.

कुटुंबाची प्रगती ः

शेळीपालन व्यवसायामुळे टेकाळे कुटुंबाची आर्थिक बाजू सावरली आहे.जागा विकत घेऊन घर बांधले. व्यवसायाचा विस्तार केला. मुलांच्या चांगल्या शिक्षणाची सोय झाली आहे. मोठा मुलगा नितीन सध्या औरंगाबाद येथे सीएचे शिक्षण घेत आहे. मुलगी सोनाली ही नोकरी करते. छोटा मुलगा अविनाश स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.

बोकड, शेळी, चारा विक्रीतून उत्पन्न ः

लताबाईंनी २०१५ पासून बोकडांची विक्री सुरू केली आहे. दरवर्षी ५ ते ६ बोकडांची विक्री होते. स्थानिक बाजारात एक वर्ष वयाच्या २० ते २५ किलो वजनाच्या बोकडास सरासरी १० ते १२ हजार रुपये दर मिळतो. वयस्कर शेळ्यांची विक्री करतात. या शेळ्यांना १२ ते १५ हजार रुपये दर मिळतो. बोकड आणि शेळ्यांच्या विक्रीतून वर्षाकाठी सत्तर हजारांची उलाढाल होते. या भागातील अन्य शेळीपालक लताबाईंकडून हिरव्या झाडपाल्याच्या चाऱ्याची खरेदी करतात. चारा विक्रीतून दररोज १०० ते १५० रुपये उत्पन्न मिळते. लताताईंनी इतर शेळीपालकांच्या दहा शेळ्या सांभाळण्यासाठी घेतल्या आहेत. प्रत्येक शेळीसाठी ६०० रुपये महिना राखोळी मजुरी मिळते.

बचत गटांची नियमित परतफेड ः

बचत गटातील सदस्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी बाळासाहेब झिंझार्डे, नयी रोशनी लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा शाहिन बेगम शेख, व्यवस्थापिका जयश्री टेहरे, सहयोगिनी मीरा कऱ्हाळे, कविता देवस्थळी, सत्यशिला उघडे, वेणू बलखंडे यांचे विविध उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन मिळते. लता टेकाळे यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला. तसेच अन्य सदस्यांनी शिवणकाम, कापड व्यवसाय सुरू केले आहे. दोन महिला शेती करतात, तर काही महिला मजुरीची कामे करतात.

श्री महालक्ष्मी बचत गटाच्या सदस्यांच्या संख्या आता १३ झाली आहे. दर महिन्याला प्रति सदस्य २०० रुपये बचत केली जाते. याशिवाय घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड केली जात आहे. आयसीआयसीआय बँकेने या बचत गटाला पहिले कर्ज ८५ हजार रुपये दिले होते. या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यामुळे आजवर त्यानंतर चार वेळा कर्जपुरवठा करण्यात आला. गटाला एकूण १४ लाख ५८ हजार रुपये कर्ज देण्यात आले. या कर्जाची परतफेड नियमित सुरू आहे, असे नयी रोशनी लोकसंचलित केद्रांच्या व्यवस्थापिका जयश्री टेहरे यांनी सांगितले.

संपर्क ः लता टेकाळे ः ८६०५४७६०११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : तुरीचा बाजार तेजीतच; कापूस, सोयाबीन, कांदा, हिरवी मिरचीचे दर काय आहेत?

Women Farmer : '२०२६ जागतिक शेतकरी महिला वर्ष' ; संयुक्त राष्ट्र संघाने केली घोषणा

Water Shortage : दहा लघू तलाव आटले; ८ तलावांतील साठा जोत्याखाली

Poultry Management : कोंबड्यांतील वाढत्या उष्णतेचा ताण कसा कमी करायचा?

Nitrogen Fertilizer : जमिनीतील नत्राच्या ऱ्हासाची कारणे

SCROLL FOR NEXT