रायपनिंग चेंबरमध्ये येण्यापूर्वी केळी स्वच्छ धुण्यात येतात.
रायपनिंग चेंबरमध्ये येण्यापूर्वी केळी स्वच्छ धुण्यात येतात. 
यशोगाथा

केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला व्यवसाय

Raj Chougule

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी रायपनिंग चेंबर उभारून मजले येथील अविनाश पाटील यांनी केळीच्या व्यावसायिक शेतीचा आदर्श उभारला आहे. दहा टन क्षमतेच्या या चेंबरद्वारे स्वतःसह अन्य शेतकऱ्यांच्या केळीविक्रीचा प्रश्‍न सोडवला आहे. एकहजार शेतकऱ्यांचे नेटवर्क त्या माध्यमातून उभारले. कोल्हापूर जिल्ह्यातील मजले (ता. हातकणंगले) गावाला उन्हाळ्यात कायम पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागतो. अविनाश पाटील हे गावातील प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. त्यांच्याकडे ऊस, ज्वारी, हळद व पाच- सहा एकरांत केळी असते. व्यापारी अनेकवेळा अत्यंत कमी दरात केळी घेत असल्याने नुकसानीचा अनुभव त्यांनी अनेकदा घेतला. यावर ते पर्याय शोधू लागले. ॲॅग्रोवनने दिली दिशा ॲग्रोवनचे नियमित वाचक असलेले पाटील यांच्या वाचनात केळी रायपनिंग चेंबर उभारलेल्या एका शेतकऱ्याची यशकथा आली. त्यांनी या व्यवसायाची कल्पना मिळाली. सविस्तर अभ्यास, अर्थशास्त्र जाणून त्यात उतरण्याचे निश्‍चित केले. त्यानुसार पाच वर्षांपूर्वी रायपनिंग चेंबरची उभारणी केली. त्यासाठी ४० लाख रुपयांची गुंतवणूक अपेक्षित होती. सिंडीकेट बॅंकेचे २८ लाख रुपयांचे कर्ज घेतले. स्वतःकडील केळ्यांसह अन्य शेतकऱ्यांकडून खरेदीस सुरुवात केली.   पाटील यांचा व्‍यवसाय दृष्टिक्षेपात

  • चेंबरचे चार कक्ष
  • प्रति कक्षाची दहा टन याप्रकारे एकूण ४० टन रायपनिंगची क्षमता
  • चेंबरमध्ये केळींचे शीतकरण
  • त्यानंतर निकषांनुसार ९५ टक्के नत्र व पाच टक्के इथिलीनचा वापर चोवीस तासांत ठरावीक ‘सायकल्स’ द्वारे.
  • सुमारे ९० तास केळी चेंबरमध्ये ठेवण्यात येतात. त्यानंतर व्यापाऱ्यांकडे पाठवणी.
  • खरेदीची पद्धत

  • सुरुवातीला शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन केला. चांगला दर देत खरेदी केली.
  • आजमितीला अकलूज, टेंभूर्णी, पंढरपूर सांगलीसह कोल्हापूर परिसरातील सुमारे एक हजार केळी उत्पादक जोडले.
  • काही लागवडीपूर्वी करार करतात. तर काही काढणी वेळी संपर्क साधतात.
  • शेतकऱ्यांना काढणी शक्‍य नसेल तर पाटील यांचा कर्मचारीवर्ग वाहन व वजनकाटे घेऊन बागेत जातो.
  • त्या- त्या वेळच्या बाजारभावांचा अंदाज घेऊन दर ठरविला जातो. अनेकदा बाजारभावापेक्षा किलोला एक ते दोन रुपये जादा दर देण्यात येतो. त्यामुळे शेतकरी पाटील यांना चांगला प्रतिसाद देतात. - खरेदीनंतर चौथ्या दिवशी शेतकऱ्यांना ऑनलाईन पेमेंट होते.
  • विक्रीसाठी केलेले प्रयत्न रायपनिंग चेंबर सुरू केले त्या वेळी मोठ्या प्रमाणात केळी विकण्याचे आव्हान होते. व्यापारी फारसे सकारात्मक प्रतिसाद देत नव्हते. जादा पिकणारी केळी कशी विकायची हा मोठा प्रश्‍न होता. मात्र पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मेहनत घेतली. जवळच्या शहरातील बाजारपेठात स्टॉल उभे करून किरकोळ व्यापाऱ्यांच्या तुलनेत स्वस्त दरात विक्री केली. त्याचा मोठा विरोध सहन करावा लागला. मात्र हिंमत न हारता विक्री सुरू ठेवली. प्रत्येक ग्राहकाला केळीसोबत व्हिजिटींग कार्डही दिले व आपल्या केळीची गुणवत्ता पटवून दिली. त्याचा फायदा पुढील एक- दोन वर्षांत दिसून आला. त्यातून व्यापाऱ्यांचे संपर्क जाळे तयार झाले.   मागणी ओळखून विक्रीचे नियोजन गोवा, कोकण भागातून केळीला मागणी वाढत आहे. पाटील यांनी या बाजारपेठांचा अभ्यास करून तेथील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून दररोज लागणाऱ्या केळीची गरज लक्षात घेतली. त्यानुसार केळी पिकविण्याचे वेळापत्रक तयार केले. आज वर्षभर येथील व्यापाऱ्यांना केळी पुरवण्यात येतात. खासगी शिक्षण संस्थांनाही पोषण आहार व उपहारगृहासाठी विक्री होते. व्यवसायातील सेटअप

  • पार्श्‍व ॲग्रो असे फर्मचे नाव
  • शेतकऱ्यांच्या बागेतून केळी काढण्यापासून ते व्यापाऱ्यांना देण्यापर्यंत कामकाजासाठी आठ कर्मचारी
  • दोन वाहने
  • केळी भरण्यासाठी चार हजार क्रेटस
  • पैशांची गुंतवणूक करून औद्योगिक वसाहतीमधून विद्युत जोडणी. सवलतीत वीज मिळत असल्याचाही फायदा होतो.
  • व्यवसायातून मिळवलेले यश

  • प्रतिकूल परिस्थितीचा अडथळा वगळता वर्षभर केळीची खरेदी विक्री सुरू असते.
  • जून ते ऑक्‍टोंबरमध्ये अनेक सण येत असल्याने या काळात केळीची मागणी वाढते.
  • वर्षाला सुमारे १८०० ते २००० टन प्रमाणात खरेदी- विक्री होते. एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल होते. महिन्याला चांगला नफा होतो. गेल्या पाच वर्षांत घेतलेल्या कर्जाच्या ऐंशी टक्के परतफेड केल्याचे पाटील यांना समाधान आहे. त्यामुळे व्यवसाय विस्ताराचा मोठा आत्मविश्‍वास आला आहे.
  • कृषी विभागाचे सहकार्य ठिबक सिंचन, कोल्ड स्टोरेज, मागेल त्याला शेततळे, अस्तरीकरण, पॅक हाऊस व रायपनिंग चेंबर आदी बाबींसाठी कृषी विभागाचे अनुदान व मोठी मदत मिळाली आहे. ॲग्रोवन ठरला मार्गदर्शन पाटील ॲग्रोवनचे नियमित वाचक आहेत. पाच वर्षांपूर्वी केळी रायपनिंग चेंबर उभारलेल्या शेतकऱ्याची यशकथा वाचूनच त्यांना या व्यवसायाची प्रेरणा मिळाली. त्याचा पाठपुरावा व अभ्यास करून मगच या व्यवसायात त्यांनी पाऊल टाकले. शेती व व्यवसायाच्या उभारणीत ॲग्रोवनचा मोठा वाटा असल्याचे ते सांगतात. प्रतिक्रिया रायपनिंह चेंबर उभारण्याचा विचार बोलून दाखविला तेव्हा अनेकांनी शंका उपस्थित केल्या. विरोध दर्शवला. ज्या व्यापाऱ्यांनी त्यावेळी माझी खिल्ली उडविली होती तेच व्यापारी आज माझ्याकडून खरेदी करतात. कर्ज नाकारणाऱ्या बॅंका मागे लागल्या आहेत. भविष्यात रेफर व्हॅन व सेंद्रिय केळीपासून जीवाणू खत तयार करण्याचा विचार आहे. अविनाश पाटील - ९८५०५५७७५३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT