अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील होतकरू शेतकऱ्यांनी उद्योजक होऊन शेतीतील अर्थकारण उंचावण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून ‘सेवार्थ ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी’ची स्थापना केली. बीजोत्पादन, प्रक्रिया, सामूहिक सुविधा, धान्य खरेदी-विक्री, डाळमिल आदी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सदस्यांना फायदे देत कंपनीची आश्वासक वाटचाल सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील अनभोरा (ता. मूर्तिजापूर) तसेच परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगले. त्यादृष्टीने सर्वांना संघटित करून प्रयत्न सुरू झाले. त्यातूनच ऑक्टोबर २०१८ मध्ये सेवार्थ ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली. अनभोर येथेच दोन एकर जमीन ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेत कारभार सुरू केला. कंपनीचे मोठे गोदाम, कार्यालय व प्रक्रिया उद्योग उभारण्यात आला. आज ९३८ भागधारक झाले आहेत. कृषी विभाग, ‘आत्मा’ यांचे पाठबळही मिळाले आहे. गेल्या वर्षी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी कंपनीला भेट देत कौतुकाची थाप दिली. गटशेतीच्या माध्यमातून घेतलेल्या यंत्राची चावी संचालकांच्या हाती दिली. कंपनीचे उद्देश
बीजोत्पादन कंपनीने बीजोत्पादनातून घोडदौड सुरू केली. सन २०२०-२१ मध्ये ७५ हेक्टरवर हरभरा बीजोत्पादन कार्यक्रम राबवला. यात ३९ शेतकरी सहभागी झाले. बियाण्यासाठी ‘पोकरा’ योजनेतून १०० टक्के अनुदान मिळाले. पायाभूत व प्रमाणित बियाणे तयार करण्यात आले. बाजारात हरभऱ्याचा दर ४५०० रुपये प्रति क्विंटल असताना शेतकऱ्यांना ५००० ते ६००० रुपये असा दर बियाण्यासाठी मिळाला. सोयाबीन बीजोत्पादन सन २०२०-२१ मध्ये ७१ शेतकऱ्यांनी ५० हेक्टरवर सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबवला. एमएयूएस १६२, एमएयूएस ६१२. १५८, केडीएस ७२६, फुले संगम आदी अलीकडील वर्षांतील वाणांचा त्यात समावेश होता. सध्या या बियाण्यांवर प्रक्रिया सुरू आहे. संस्थेच्या गोदामात साठवणूक झाली आहे. यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याचा बीजोत्पादन कार्यक्रम ३०८ हेक्टरवर व २२७ शेतकऱ्यांकडे राबवला जात आहे. यात पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रम, राजविजय २०२, राजविजय २०४, फुले विक्रांत, पीडीकेव्ही कनक आदी विविध वाणांचा समावेश आहे. धान्य खरेदी ‘सेवार्थ’ कंपनीने धान्य खरेदीची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी काही कंपन्यांसोबत करार केले आहेत. या माध्यमातून ५०० मे. टन सोयाबीनची विक्री झाली. त्यातून शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा २०० रुपये प्रति क्विंटल दर जास्त मिळाला. काही माल कंपनीने शेतकऱ्यांच्या घरून खरेदी केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात बचत झाली.
प्रक्रिया उद्योगात पदार्पण शेतकरी कंपनीने आपल्या भागात उत्पादित होणाऱ्या मसालेवर्गीय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या भागात कार्यरत गटांकडील हळद व मिरचीवर प्रक्रिया करून बाजारपेठेत कंपनीच्या नावे (सेवार्थ) आपला ‘ब्रँड’ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ही उत्पादने बाजारात येतील. शेतकरी प्रशिक्षण कंपनीतर्फे कृषी विभागाच्या शेतीशाळांमध्येही सहभाग घेतला जातो. प्रक्षेत्रावर जात शेतकऱ्यांना किडी-रोग, मित्र कीटकांची ओळख, फवारणी करताना घ्यावयाची काळजी, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क तयार करणे, माती परीक्षण, पाणी, पर्यावरणाचे संरक्षण, मालाची गुणवत्ता आदी विषयांवर शेतीशाळेत चर्चा केली जाते. भागधारक शेतकऱ्यांसाठी वर्षातून दोन ते तीन वेळा प्रशिक्षण घेतले जाते. यात बीजोत्पादन, शासकीय योजनांची माहिती, स्वयंरोजगार आदींविषयी माहिती दिली जाते. सामूहिक सुविधा केंद्र शेतकऱ्यांकडे साठवणुकीची व्यवस्था नसल्याने मालाची नासाडी होण्याचा धोका असतो. त्यांना साठवणूक सुविधा, साठवलेल्या मालावर तारण सुविधा उपलब्ध करण्याचे काम कंपनीने केले आहे. गोदामातील मालाचे साठवणुकीतील किडींपासून संरक्षणही केले जाते. सन २०२१ मध्ये १५०० क्विंटल सोयाबीन व दोनहजार क्विंटल हरभरा बियाणे साठवणूक केली. डाळमिल युनिट कंपनीने डाळमिल युनिटही उभारले आहे. या सुविधेद्वारे मूग, उडीद, तूर, हरभरा आदींच्या डाळी तयार करून दिल्या जातात. डाळी विकण्यासाठी प्रोत्साहित करण्याबरोबर शेतकऱ्यांना विपणनाचे महत्त्वही पटवून दिले जाते. गेल्या हंगामात १५० क्विंटल तूरडाळ, १०० क्विंटल हरभरा डाळ व यंदा १० क्विंटल मूगडाळ बनवण्यात आली. अडचणीही अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरू केलेल्या या कंपनीसमोर अडचणीही कमी नाहीत. प्रामुख्याने शेतीमाल खरेदी व बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यासाठी भांडवल ही सर्वात मोठी समस्या आहे. बँक त्यासाठी जास्त कर्ज मंजूर करीत नाही. कंपनीसोबत जोडलेले शेतकरी अल्पभूधारक असतात. अनेकांना शेतीमाल उत्पादित झाल्यावर त्वरित पैसे हवे असतात. त्यांचा शेतीमाल साठवण्यासाठी गोदामाची क्षमताही कमी पडते. शेतकऱ्यांनी तयार केलेले बियाणे विक्री करताना मोठ्या अडचणी आहेत. ‘फॉरवर्ड लिंकेज’बाबत शासनाने मदत करावी, जेणे करून शेतीमाल प्रक्रिया करून विक्री करणे सोपे होऊ शकेल अशी अपेक्षा कंपनीचे संचालक व्यक्त करतात. संपर्क जीवन घोरमोडे, संचालक- ९९२१९७९०७६ अतुल गोडसे, संचालक- ८०८७१२२०१३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.