फिल्टर तंत्राचा वापर करून कडधान्य स्लरी पिकांना दिली जाते.
फिल्टर तंत्राचा वापर करून कडधान्य स्लरी पिकांना दिली जाते.  
यशोगाथा

रसायन अंशमुक्त, दर्जेदार डाळिंब उत्पादनाचा प्रयत्न

Vinod Ingole

किडी-रोगांचा प्रादुर्भाव, दरातील घसरण, हवामान आदी विविध कारणांमुळे शेतकरी डाळिंब बागा काढून टाकण्याची उदाहरणे आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर कुऱ्हा (तिवसा, जि. अमरावती) येथील सचिन देशमुख यांनी ‘रेसीड्यू फ्री’ (रसायन अंशमुक्त) डाळिंब शेती करताना थेट विक्रीचाही पर्याय निवडला आहे. सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर देताना गुणवत्ताप्राप्त फळांना अधिक दर मिळविण्यात प्रयत्न ते करताना दिसत आहेत. कुऱ्हा (तिवसा, जि. अमरावती) येथील सचिन देशमुख ‘टेक्‍सटाईल इंजिनिअर’ आहेत. त्यांनी आपल्याच विषयातील कंपन्यांमध्ये नोकरीच्या माध्यमातून ‘करियर’ला सुरवात केली. परंतू शेतीतच काहीतरी करण्याचे त्यांचे उद्दिष्ट त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. सुमारे १४ वर्षे मध्य प्रदेशात तर ११ वर्षे दिल्ली येथील कंपनीत नोकरी केल्यानंतर ते गावी परतले. त्यांची सुमारे ४० एकर शेती आहे. त्यात हळद, डाळिंब, संत्रा, सोयाबीन, कापूस यासारखी पिके घेतली जातात. डाळिंब पिकाचा प्रयोग देशमुख यांची संत्रा बाग होती. मात्र पाण्याचे स्राेत कमी झाल्याने बाग वाळून चालली. परिणामी या क्षेत्रात कोणते पीक घ्यावे या विचारात असताना त्यांनी डाळिंबाचा पर्याय निवडला. त्या वेळी डाळिंबाला दरही चांगले होते. त्या लाटेवर मी स्वार झालो आणि डाळिंब लावण्याचा निर्णय घेतला, असे सचिन सांगतात. सचिन यांच्या शेतालगत त्यांच्या मित्राचीही पाच एकरांत डाळिंब बाग आहे. त्याचे व्यवस्थापनही सचिनच करतात. अवशेषमुक्त शेतीचा अंगीकार रेसीड्यू फ्री अर्थात रासायनिक अवशेषमुक्त डाळिंबाचे उत्पादन घेतल्यास त्याला मागणी राहते हे त्यांना समजले होते. युरोपमध्ये रसायनांच्या चाचण्या करून मगच गुणवत्तापूर्ण फळे स्वीकारली जातात याचे ज्ञान त्यांनी घेतले. त्यानुसार ‘रेसीड्यू फ्री’ उत्पादनावर भर दिला. मालाचे थेट ‘मार्केटिंग’ गेल्या वर्षी पुणे येथील स्टोअर्समध्ये केलेल्या डाळिंब विक्रीला ५२ रुपये प्रति किलो दर मिळाला.यंदा दुसऱ्या वर्षीचा माल तोडणीस आला असून दीड टन मालाची आजवर तोड झाली आहे. अमरावती, नागपूर येथे कमाल १२० रुपये दर मिळवण्यातही ते यशस्वी झाले आहेत. व्हॉटसअॅप, फेसबुक यांसारख्या सोशल मीडियाचा वापर त्यांनी विक्रीसाठी प्रभावीपणे केला आहे. नागपूर व पुण्यात दोन ‘स्टोअर्स’सोबत करार करून त्या ठिकाणी माल पुरवठा केला जातो. पॅकिंगसाठी दोन, पाच आणि दहा किलोचे बॉक्‍सेस तयार करण्यात आले आहेत. नागपूर आणि पुणे येथील ग्राहकांसाठी ‘ट्रॅव्हल्स बस’ने डाळिंबे पाठविली जातात. दिल्लीलादेखील रेल्वेद्वारे माल पाठवून तेथे ‘होम डिलिव्हरी’ची सोय करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने बहाराचे नियोजन चार एकरांत बागेचे प्रत्येकी एक एकरचे भाग करून बाग टप्प्याटप्प्याने बहारावर आणण्यावर भर दिला. त्यामुळे बाजारात माल अधिक काळ उपलब्ध करणे शक्य झाले. साहजिकच त्याचा फायदा दर चांगले मिळवण्यात झाला. सेंद्रिय पद्धतीवर भर जीवामृत, कडधान्य स्लरी, ‘वेस्ट डिकंपोजर’, जीवाणूजन्य खते, शेणखत, निंबोळी पेंड यांच्या वापरावर अधिक भर दिला जातो. या माध्यमातून फळांची प्रत राखण्यास मदत होते असे सचिन सांगतात. सोलर ट्रॅपचा वापर कीड नियंत्रणासाठी ‘सोलर ट्रॅप’चा उपयोग केला आहे. त्याची ३० हजार रुपये किंमत आहे. एका फवारणीसाठी सरासरी दोन हजार रुपयांहून अधिक खर्च होतो. ट्रॅपच्या वापराने त्यात बचत झाल्याचे सचिन सांगतात. याव्यतिरिक्त व्हर्टीसिलीयम, मेटॅरायझियम, बिव्हेरीया आदी जैविक कीटकनाशकांचा तर बॅसीलस, ट्रायकोडर्मा, स्युडोमोनास या बुरशीनाशकांचा वापर केला जातो. हा उपचार मित्रकिटकांच्या संवर्धनासाठी पोषक ठरतो, असे सचिन सांगतात. प्रयोगशाळेत तपासणी नागपूर येथील प्रयोगशाळेत रासायनिक अवशेषांची चाचणी करून दिली जाते. त्यासाठी सुमारे नऊ हजार रुपयांचा खर्च होतो. फळ परिपक्‍व झाल्यानंतर त्याची तोडणी करून ती प्रयोगशाळेकडे पाठवली जातात. चार ते पाच दिवसांत प्रयोगशाळेचा अहवाल मिळतो. अन्य व्यवस्थापन अडीच एकरात सेलम जातीच्या हळद लागवडीचा प्रयोग यावर्षी पहिल्यांदाच केला आहे. सेलम जातीच्या हळदीच्या लागवडीचा प्रयोग त्यांच्याद्वारे केला आहे. पाण्यासाठी तीन विहिरी आणि त्यात बोअरवेल्स घेतले आहेत. आठ एकरांवर ठिबक सिंचनाचा पर्याय अंगीकारला आहे. त्या माध्यमातून विद्राव्य खते दिली जातात. जीवामृत, कडधान्य स्लरी देण्यासाठीही ठिबकचा उपयोग होतो. सचिन यांचे वडील रमेश देशमुख यांनी सात एकरांवर १५ वर्षांपूर्वी संत्रा लागवड केली होती. सध्या दीडशे झाडे शिल्लक आहेत. विक्री थेट व्यापाऱ्याला होते. मृग बहार घेण्यावर भर राहतो. संपर्क- सचिन देशमुख- ९८७३७२४०५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT