उसात घेतलेले सोयाबीन.
उसात घेतलेले सोयाबीन.  
यशोगाथा

उसातील सोयाबीनचे एकरी १८ क्विंटल उत्पादन

गणेश कोरे

पुणे जिल्ह्यात कोऱ्हाळे बु. थोपटेवाडी (ता. बारामती) येथील सूरज व सागर या युवा मोरे बंधूंनी पाच एकरांत उसात टोकण पद्धतीने सोयाबीनचे आंतरपीक घेण्याचा प्रयोग केला. यात एकूण ८८ ते ९० क्विंटल म्हणजेच एकरी साडे १७ ते १८ क्विंटल उत्पादनापर्यंत मजल मारणे शक्य झाले आहे. अभ्यास, बारकावे जाणून घेणे, शास्त्रीय व्यवस्थापन याद्वारे शेतीत चांगली उत्पादकता मिळवण्यात मोरे बंधू यशस्वी होत आहेत.   पुणे जिल्ह्यात कोऱ्हाळे बुद्रुक थोटपेवाडी (ता. बारामती) येथील रवींद्र एकनाथ मोरे यांची १३ एकर शेती आहे. सूरज आणि सागर ही त्यांची तरुण मुले सध्या शेतीची जबाबदारी सांभाळत आहेत. ऊस, त्यात सोयाबीनचे आंतरपीक, डांगर (लालभोपळा) कोथिंबीर आदी पिके ते घेतात. अभ्यासूवृत्ती, अधिक उत्पादनक्षम वाणाचा वापर, व्यवस्थापनात सुधारणा करून सोयाबीनचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न मोरे बंधूंनी केला आहे. त्यात चांगले यश आले आहे. उसातील सोयाबीनचा प्रयोग यंदाच्या वर्षाचे प्रातिनिधिक व्यवस्थापन सांगायचे, तर एक जुलैच्या दरम्यान उसाची लागवड साडेचार फुटी सरी पद्धतीने केली. वाण को ८६०३२ वापरले. त्यानंतर २५ जुलैच्या दरम्यान सोयाबीनची टोकण पद्धतीने लागवड मधल्या साडेचार फुटीत केली. यात सोयाबीनच्या दोन ओळी येतात. प्रत्येक ओळीत नऊ इंचावर बियाणे लावले. प्रत्येकी सव्वा फूट अंतरावर ठिबकचा ड्रीपर होता. त्याच्या डाव्या व उजव्या बाजूला सोयाबीन लावले. पुणे येथील आघारकर संशोधन केंद्राच्या ११८८ हे वाण वापरले. पाच एकरांत सुमारे १७ किलो एवढेच बियाणे लागले. निविष्ठांचा वापर

  • लागवडीनंतर १५ दिवसांनी एकरी तीन किलो १९-१९-१९, २० दिवसांनी वाढीच्या अवस्थेत एकरी ३ किलो १२-६१-०, फुलकळी अवस्थेत १३-४०-१३ आणि १३-०-४५ प्रत्येकी ४ किलो,
  • ४५ दिवसांनी ०-५२-३४ हे ४ किलो व शेंगा भरायच्या अवस्थेत ०-०-५० असा विद्राव्य खतांचा वापर.
  • मधल्या साडेचार फुटीत प्रत्येक रोपाला हवा, सूर्यप्रकाश व पाणी योग्य प्रमाणात मिळाले. पिकाची वाढ चांगली होऊन किडी-रोगांचा प्रादुर्भावही तुलनेने कमी राहिला.
  • एकूण पीक कालावधीत केवळ तीन फवारण्या.
  • बारामती नजीक होळ गावालगत (आठ फाटा) येथे आघारकर संशोधन केंद्राचे युनिट आहे. येथील तंत्रज्ञ दत्तात्रेय साळुंखे आणि श्रीकांत गायकवाड यांचे मार्गदर्शन.
  • उत्पादन सुमारे ९५ दिवसांनी काढणी झाली. सागर म्हणाले, की प्रति झाड सुमारे १८० ते २०० शेंगा लगडल्या होत्या. पाच एकरांत सुमारे ८९ ते ९० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. एकरी हे उत्पादन साडेसतरा क्विंटल ते १८ क्विंटल होते. यातील ५० क्विंटल मालाची विक्री बांधावरच व्यापाऱ्यांना केली. त्याला क्विंटलला ५७०० रुपये दर मिळाला. उर्वरित मालाची अपेक्षित दर आल्यानंतर विक्री होणार आहे. यापूर्वीही उसातील सोयाबीनचे १६ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. एकरी उत्पादन घरची मजुरी धरून २० हजार रुपयांपर्यंत होतो. कोथिंबीर लागवड सोयाबीन काढणी झाल्यानंतर याच पाच एकरांत कोथिंबिरीची, तसेच तीन एकरांत सलग पद्धतीनेही लावण केली. सन २००५ पासून कोथिंबीर उत्पादनात मोरे बंधू पारंगत आहेत. सागर सांगतात, की सलग पद्धतीत एकरी सुमारे २२ हजार जुड्यांचे उत्पादन घेण्यापर्यंत यश मिळविले आहे. प्रति जुडी सरासरी १२ रुपये दर मिळतो. कोथिंबिरीची खरेदीही बांधावरच होते. कराड, सांगली, चिपळूण, पुणे, मुंबई येथील व्यापारी येतात. काशीफळ उत्पादनातही आघाडी २०१४ मध्ये नऊ एकरांत काशीफळ (डांगर) उत्पादन घेतले होते. सन २०१८ नंतर दरवर्षी बाजारभावाचा अंदाज घेत साधारण पाच एकर क्षेत्र त्यासाठी दिले आहे. पाच एकरांत सुमारे ११५ ते १२० टन यानुसार उत्पादन घेतले आहे. नवी मुंबई येथील बाजार समितीत विक्री होते. किलोला ५ ते १८ रुपये दर मिळतो.   मोरे यांच्या शेतीतील ठळक बाबी

  • सुरुवातीला १९-१९-१९ सोबत व फुलोऱ्यानंतर गंधकाचा दोनवेळा वापर. एकरी एक किलो.
  • ऊस पाचट कुजवून जमिनीची सुपीकता वाढवली. शेणखत वापरल्यास एकरी तीन- चार ट्रॉली असे प्रमाण.
  • १९-१९-१९ सोबत ह्युमिक ॲसिडचाही वापर. ८० टक्के विद्राव्य खतांचा वापर.
  • उसाचे उत्पादन एकरी ७० टनांपर्यंत.
  • सोयाबीन बेवड म्हणून उपयुक्त
  • प्रतिक्रिया आमचे चुलत्यांचे मिळून १२ सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. माझ्या वडिलांनी प्रामाणिकपणे व अत्यंत झोकून देऊन शेती केली. त्यातील उत्पन्नातूनच २२ एकर खरेदी केली. कोणतीही गोष्ट तहानभूक हरवून किंवा झोकून देऊन केल्यास त्यात १०० टक्के यश मिळतेच हीच शिकवण वडिलांनी दिली. त्यावरून पुढे वाटचाल करतो आहे. -सागर मोरे मोरे बंधूंनी सोयाबीनच्या प्रत्येक रोपाची चांगली जोपासना केली. त्यास हवा, ठिबकद्वारे पाणी, अन्न, सूर्यप्रकाश हे सर्व नैसर्गिक स्रोत पुरेपूर मिळतील अशी व्यवस्था केली. प्रति झाड उत्पादकता (पर प्लॅंट पोटॅंशियल) जपली. त्यामुळेच विक्रमी उत्पादन मिळाले. प्रत्येक पिकात असा काटेकोरपणा आणल्यास क्रांती घडेल. डॉ. दत्तात्रेय वने प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी, मानोरी, जि. नगर संपर्क- सूरज मोरे, ९८२३९४९४९३ सागर मोरे, ९७००९४९५००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT