तानाजी मुळे यांची मोगरा शेती
तानाजी मुळे यांची मोगरा शेती  
यशोगाथा

मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...

Abhijeet Dake

ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथील तानाजी मुळे यांनी थेट संबंधित शेतकऱ्याचे शेत गाठले. ही शेती समजावून घेत ती सुरूही केली. वडिलांनी विकलेली शेती, विकत घेतलेल्या शेतीतही वाटण्या अशा पार्श्‍वभूमीवर या मोगरा पिकातून मात्र त्यांच्या आयुष्यात सुगंध दरवळला. पाच-सहा वर्षांपासून सातत्य ठेवत या शेतीतून त्यांनी चांगली प्रगती साधली आहे.    कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथील तानाजी मुळे यांच मूळ गाव कंठी बागेवाडी (ता. जत) येथे आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांच्या वडिलांना ही शेती विकावी लागली. गावोगावी फिरत ते केस कर्तनालयाचा (सलून) व्यवसाय करायचे. या धावपळीत तानाजी यांना मात्र दहावीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे हाच व्यवसाय तानाजी यांनी पुढे चालवला. गाव सोडल्यानंतर ते कवठेमहांकाळ येथे आले. सलून दुकान सुरू केले.  शेतीचा लागला नाद  दरम्यान तानाजी यांनी अनेक मित्र जोडले. त्या वेळी सरपंच तसेच कारखान्याचे संचालक असलेले स्व. मारुती खोत यांच्याशी गट्टी जमली. त्यातून बारामती, पंढरपूर, राहुरी येथील कृषी विद्यापीठ आदी ठिकाणी प्रयोगशील शेती पाहण्यासाठी भटकंती झाली. आपणही प्रयोगशील शेती करावी असे त्यांना वाटू लागले. त्यातूनच भावांच्या मदतीने पावणेसात एकर शेती विकत घेतली. कवठेमहांकाळ हा दुष्काळी तालुका. त्यामुळे ज्वारी, गहू, शाळू, मका ही पिके घेण्यात येऊ लागली. पुढे शेतीची पुन्हा वाटणी झाली. तानाजी यांच्या वाटणीला दोन एकरच शेती आली. पिकासाठी कर्ज घ्यायचे. पण पाण्याअभावी पीक वाया जायचे अशी परिस्थिती होती. दोन कूपनलिका, एक विहीर, शेजारील म्हैसाळ योजनेचा पोटकालवा आहे. मात्र पाण्याचा लाभ होत नाही.  पूरक व्यवसायही तोट्यात  पाण्याअभावी शेती साधत नसल्याने तानाजी यांनी पोल्ट्री व्यवसाय निवडला. त्यासाठी सहा लाख रुपयांचे कर्ज झाले. हळूहळू व्यवसायाचा जम बसू लागला. परंतू मनुष्यबळ कमी पडू लागले. रोगामुळे कोंबड्या दगावू लागल्या. व्यापारी कमी दरात खरेदी करू लागले. तानाजी आर्थिक अडचणीत आले. कर्ज कसे फेडायचे असा प्रश्‍न निर्माण झाला.  ॲग्रोवनने दाखवला मार्ग  एके दिवशी आपल्या सलूनमध्ये तानाजी बसे असताना मित्र सचिन पवार आले. त्यांच्या हातात ॲग्रोवन होता. त्यांनी येळवी (ता. जत) येथील रविकिरण पवार यांची प्रसिद्ध झालेली यशकथा तानाजी यांना वाचण्यास दिली. अनेक दिवसांपासून शेतीतील अडचणींचा सामना करीत असलेल्या तानाजी यांना ही यशकथा आवडली. त्यांच्यात उत्साह संचारला. त्यांनी पवार यांच्याशी संपर्क साधला. पाठोपाठ त्यांनी पवार यांचे शेतही गाठले. मोगरा शेती, हंगाम, व्यवस्थापन, अर्थकारण व बाजारपेठ या बाबी समजावून घेतल्या.  मोगरा शेतीतील वाटचाल  सन २०१३ मध्ये १४ गुंठ्यापासून मोगरा शेतीला सुरवात केली, तेव्हापासून म्हणजे पाच-सहा वर्षांत या शेतीत सातत्य ठेवले आहे. आजमितीला हे क्षेत्र एक एकर आहे. तानाजी यांना शेतीत पत्नी सौ. नंदा, मुलगा अर्जुन, अजय आणि सून सौ. प्रतीक्षा अशी सर्व सदस्यांची मदत मिळते. गरजेनुसार मजुरांची मदत घेण्यात येते. ग्राहकांची मागणी असलेल्या वाणांविषयी व्यापारी माहिती देतात. त्यानुसार तानाजी यांनी बटमोगरा व पुणेरी मोगरा या प्रकारांची निवड केली आहे. व्यापाऱ्याने पुणेरी मोगऱ्याची रोपेही आणून दिली.  यंदा दुष्काळजन्य स्थिती  चालू वर्षात पाण्याची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. अशा वेळी टॅंकरने पाणी आणून मोगरा शेतीचा सुगंध जपण्याचा प्रयत्न तानाजी यांनी केला आहे. वास्तविक पाहता टॅंकरवर खूप खर्च करावा लागला. यंदा फार काही उत्पन्न हाती लागेल याची हमी नाही. तरीही लढण्याची जिद्द कायम आहे. पाचशे रुपयांना पाच हजार लिटर पाणी अशी टॅंकरची किंमत आहे. यंदाचा पूर्ण हंगाम त्याच पाण्यावर सुरू आहे.  मोगरा शेतीची वैशिष्ट्ये 

  • लागवडीपासून सुमारे आठ महिन्यांत होतो फुले येण्यास प्रारंभ. 
  • नर्सरीतून ३००० रोपांची १२ रुपये प्रति नगाप्रमाणे खरेदी. 
  • दोन रोपांतील अंतर सव्वा फूट. झिगझॅक पद्धतीने लागवड. 
  • सुमारे १४ गुंठ्यात बट जातीचा, नव्या १३ गुंठ्यात पुणेरी जातीचा मोगरा. 
  • दुष्काळी स्थिती असूनही सकारात्मक दृष्टिकोन व मनोधैर्य. 
  • मागणीनुसार पॅकिंगमधून पुरवठा. 
  • मिरज येथील व्यापारी निश्‍चित केला आहे. त्यालाच विक्री होते. 
  • हिवाळ्यात फुलांचे उत्पादन मंदावते. डिसेंबरमध्ये होते छाटणी. 
  • प्रति झाड १० किलो शेणखत. 
  • आठवड्यातून चार किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये. 
  • फेब्रुवारी १५ पासून बहार येण्यास सुरुवात. 
  • जूनपर्यंत अधिक बहर. या काळात प्रति दिन १० किलो फुले. 
  • पुढे चार महिने बहर राहतो. मात्र प्रति दिन ३ ते ४ किलोच फुले मिळतात. 
  • उत्पादन, दर व खर्च (प्रति १५ गुंठे)  वर्षभराच्या कालावधीत ९००, ९५० ते १००० किलोपर्यंत फुले मिळाली आहेत. यंदा दुष्काळामुळे उत्पादन ४२५ किलोपर्यंतच मिळाले आहे. प्रति किलो दर हा २०० ते २३०, २३० रुपयांपर्यंत मिळाला आहे. उत्पादन खर्च प्रति १५ गुंठ्याला ६० ते ६५ हजार रुपयांपर्यंत येतो.  संपर्क- तानाजी बापू मुळे- ९५०३०७१८४० 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT