बाजार समितीमधील हरभऱ्याची आवक.
बाजार समितीमधील हरभऱ्याची आवक.  
यशोगाथा

काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण

Chandrakant Jadhav

चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांनी आपले अर्थकारण काबुली हरभरा शेतीतून उंचावले आहे. हरभऱ्याच्या अन्य वाणांच्या तुलनेत त्याला किमान एकहजार ते तेराशे रुपयांनी दर अधिक मिळतात. शिरपूर (जि. धुळे), अमळनेर, चोपडा (जि. जळगाव) येथील बाजारांत त्याला मोठा उठाव आहे. त्याची खरेदीदेखील व्यापारी थेट शेतातून करतात.  जळगाव जिल्ह्यातील तापी व अनेर नदीकाठील भागात काबुली हरभऱ्याखालील क्षेत्र वाढू लागले आहे. आठ-१० वर्षांपूर्वी हे पीक मोठ्या शेतकऱ्यांचे म्हणून ओळखले जायचे. केळीसाठी बेवड म्हणून त्याचे महत्त्व होते. रावेर, यावल भागांत लागवड व्हायची. मग चोपडा भागात हे पीक पोचले.  काबुली वाण व जळगाव जिल्हा 

  • जिल्ह्यात हरभरा पिकाखाली सुमारे ६० ते ७० हजार हेक्‍टर क्षेत्र. यात विजय, दिग्विजय व अन्य वाण. 
  • काबुली वाणाची पेरणी सुमारे सात ते आठ हजार हेक्‍टर. 
  • सर्वाधिक तीन ते साडेतीन हजार हेक्‍टर काबुली वाणांचे क्षेत्र चोपडा तालुक्‍यात. 
  • चोपड्यातील अनेर व तापी नदीकाठी मुबलक पाणी असलेल्या वाळकी, विटनेर, अजंती, मोहिदा, वढोदा, दगडी, वेळोदा आदी १२ ते १३ गावांमध्ये अधिक क्षेत्र. 
  • हा भाग जळगाव जिल्ह्यात, मात्र धुळे जिल्ह्यातील शिरपूरपासून २५ किलोमीटरवर. चोपडा बाजार समिती या गावांपासून सुमारे २६ किलोमीटरवर आहे. 
  • शिरपूरच्या बाजारात अधिक मागणी  चोपडा तालुक्यातील काबुली हरभऱ्याखाली गावांतील शेतकऱ्यांचा शेती, शिक्षण, बाजार या निमित्त अधिक संपर्क शिरपूरशी आहे. अनेक जण शिरपुरात वास्तव्यासही गेले आहेत. अर्थातच शिरपूरच्या बाजारात काबुली हरभऱ्यास मोठी मागणी असते. अमळनेर बाजार समितीही या भागापासून जवळ आहे. पण शिरपुरात अधिक विक्री शेतकरी करतात. मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील सुरतलाही शिरपूर हे ठिकाण सोयीचे आहे. साहजिकच सुरत, इंदूरचे व्यापारी शिरपुरमधील अडतदारांकडून काबुली हरभऱ्याची खरेदी करतात.  काबुली हरभऱ्याला अधिक दर  खरेदी थेट शेतातून होते. यात तोलाई, वराई, वाहतूक खर्च आणि शेतकऱ्यांचे श्रम, मजुरी वाचते. क्विंटलमागे ५० ते ६० रुपये दर खरेदीदार देतात. मागील हंगामात सुरवातीला ५१०० रुपये प्रतिक्विंटलचे दर शेतकऱ्यांना मिळाले. यंदाच्या हंगामात हेच दर ५८०० रुपये आहेत. अन्य हरभरा वाणांचे दर ३७०० ते ४१०० रुपये आहेत. त्यांच्या तुलनेत काबुलीस अधिक उठाव आहे. कारण त्याचा उपयोग हाॅटेल्स, लग्नसमारंभातील मेन्यू, बेसन पीठ आणि उपपदार्थ तयार करण्यासाठी महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. डाळ उद्योगातही त्याला मोठी मागणी आहे.  काबुलीचे मार्केट- ठळक बाबी 

  • काबुलीचा रंग फिकट तपकिरी. आकार अन्य हरभऱ्यापेक्षा मोठा. 
  • शिरपूरच्या बाजारात मार्चच्या सुरवातीला प्रतिदिन २०० क्विंटलपर्यंत आवक. मार्चअखेरीस ती 
  • ५०० क्विंटलवर पोचते. एप्रिलपर्यंत कायम. 
  • चोपडा, अमळनेरच्या बाजारातही मार्चमध्ये आवक वाढते. एप्रिलच्या मध्यापर्यंत बंद. 
  • मळणीचा हंगाम फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू. 
  • व्यापाऱ्यांशी घरोब्याचे संबंध  शिरपुरात १० अडतदार किंवा व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांशी वर्षभर संपर्क असतो. काही मोठ्या शेतकऱ्यांना आगाऊ रक्कमही काही अडतदार बिनव्याजी शेतीसंबंधी अर्थपुरवठा म्हणून करतात. त्याची परतफेड काबुली हरभऱ्याच्या माध्यमातून होते. अनेक शेतकरी व व्यापारी यांचे घरोब्याचे संबंध या काबुली हरभरा पिकामुळे निर्माण झाले आहेत.  मळणीतून रोजगार  वढोदा येथे सुमारे १२०, अजंतीसीम येथे ३२, तर विटनेर येथे ५० शेतकरी काबुली हरभरा उत्पादनात अग्रेसर आहेत. चोपडा तालुक्‍यात १२ गावांतील प्रत्येक गावात तीन-चार हरभरा मळणी यंत्रचालक आहेत. मार्च- एप्रिलच्या सुरवातीपर्यंत मळणीचा हंगाम जोमात असतो. त्यातून आमच्यासह गावातील तीन-चार जणांना चांगला रोजगार मिळतो. शेतकऱ्यांकडून मजुरांना हरभराही मिळतो असे शेतकरी व ट्रॅक्टरचलित मळणीयंत्र चालक रवींद्र पाटील (आजंतीसीम, ता. चोपडा) म्हणाले.  शेतकरी अनुभव  अजंतीसीम (ता. चोपडा) येथील आधार भाऊलाल पाटील व काका गोपाल मुळा पाटील यांची चार हेक्‍टर काळी कसदार, मध्यम प्रकारची शेती आहे. केळी प्रमुख पीक. त्याची काढणी ऑक्‍टोबरमध्ये संपल्यानंतर दरवर्षी पाच ते सहा एकरांत काबुली हरभरा लावला जातो. फसगत होऊ नये यासाठी विश्‍वासातील व्यापाऱ्याकडून ७० रुपये प्रतिकिलो दरात बियाणे खरेदी केले जाते. दोन ओळींमधील अंतर सुमारे दोन फूट तर दोन सऱ्यांमधील अंतर पाच फूट असते. यंदाच्या हंगामात एकरी १२ क्विंटल उत्पादनाची पाटील यांना अपेक्षा आहे. अन्य शेतकऱ्यांकडेही मळणी सुरू आहे. त्यांना एकरी ११ ते १२ क्विंटल उत्पादन साध्य होत आहे. पीक मळणीवर आल्यावर कापणी ते मळणी या प्रक्रियेसाठी एकरी ८०० रुपये मजुरी द्यावी लागते. मळणीसाठी प्रतिक्विंटल २०० रुपये दर द्यावा लागतो. मागील हंगामात पाटील यांना एकरी १४ क्विंटल उत्पादन मिळाले होते. हरभऱ्यानंतर मशागत करून खरिपात मूग घेतला जातो. दरवर्षी तीन-चार एकरांत उतिसंवर्धित केळी तर १० एकरांत आंबेमोहोर व वसई या वाणांच्या केळीची लागवड सप्टेंबर-ऑक्‍टोबर पाटील करतात. 

    संपर्क- रवींद्र पाटील-९५४५७८३७९२  आधार पाटील-९५४५७८३७९६ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

    Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

    International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

    Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

    Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

    SCROLL FOR NEXT