दूध व्यवसाय व एकत्रित कुटुंब पध्दतीतून फोलाने कुटुंबाने प्रगती केली आहे.
दूध व्यवसाय व एकत्रित कुटुंब पध्दतीतून फोलाने कुटुंबाने प्रगती केली आहे. 
यशोगाथा

दुग्धव्यवसायातून संयुक्त फोलाने कुटुंबाची प्रगती

Suryakant Netke

नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने परिवाराने पाच म्हशीपासून दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. दुधाची गुणवत्ता जोपासत ग्राहकांचा विश्वास बळकट करीत म्हशीच्या संख्येत व दुग्धउत्पादनात वाढ केली. आज ‘जय किसान दूध’ ब्रॅन्ड तयार केला असून या व्यवसायातून कुटुंबाने लक्षणीय प्रगती साधली आहे.   नगर जिल्ह्यात कुकाणे (ता. नेवासा) येथे माजी उपसरपंच व आदर्श शेतकरी भाऊसाहेब किसन फोलाने यांचा एकत्रित परिवार नांदतो. बाळासाहेब, अरुण, संदीप असे त्यांना बंधू आहेत. वडिलोपार्जित त्यांची ३५ एकर एकत्रित शेती आहे. ऊस, केळी, आणि जनावरांसाठी चारा पीके अश पीक पद्धती आहे. सध्या साधारण वीस एकर ऊस, चार एकर केळी आणि पाच एकरांवर चारापिके आहेत. अलिकडे एकत्रित कुटुंबपद्धतीचा अभाव पहायला मिळतो. मात्र फोलाने परिवारातील सतरा सदस्याचा गोतावळा निश्‍चित अनुकरणीय आहे. परिवारला एकसंध ठेवण्यामध्ये ज्येष्ठ सदस्य आई चंद्रभागा व मालनबाई यांचे बहुमोल योगदान आहे. पाच म्हशींपासून सुरवात परिवारातील ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेबांनी १९९८ मध्ये शेतीला जोड म्हणून भाकड म्हशी घेत व्यवसाय सुरू केला. वेताला जवळ आल्यावर परिसरात, बाजारात विक्री ते करीत. हरियाणा व अन्य भागातून म्हशी आणत. मात्र त्यात तोटा अधिक होत असल्याचे लक्षात आले. हरियाणा येथून आणलेल्या व वेतासाठी जवळ आलेल्या मुऱ्हा, म्हैसाण जातीच्या पाच म्हशी न विकता त्यांच्याच आधारे २००० मध्ये दुग्धव्यवसायाला सुरवात केली. सुरूवातीला पन्नास लिटर दूध संकलन व्हायचे. कुकाण्यात हाॅटेलला विक्री तसेच ग्राहकांनाही दर्जेदार दुध देण्यावर भर दिला. दुधाचा बनविला ब्रॅंड हळूहूळ दुधाला मागणी वाढू लागली. टप्प्याटप्प्याने म्हशींच्या संख्येत वाढ केली. सध्या ८० पर्यंत म्हशी असून ५० दुभत्या आहेत. दररोज कुकाणे येथे सुमारे २०० लिटर दूध हाॅटेलला तर २०० लिटर दुधाची थेट ग्राहकांना विक्री होते. कुकाणे ग्रामपंचायतीसमोर थेट विक्री केंद्रातून सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजता दुधाची ६० रुपये प्रती लिटर दराने विक्री होते. अवघ्या तासातच संपूर्ण दूध विकले जाते. जय किसान दुध हा ब्रॅण्ड त्यासाठी विकसीत केला आहे. कोजागिरी अथवा अन्य सणांच्या काळात लोक आगाऊ मागणी नोंदवतात. मागणी जास्त व पुरवठा कमी अशी अवस्था होऊन जाते. कोरोना काळातही थेट ग्राहकांसाठी विक्री थांबवली नाही. मात्र हॉटेलला पुरवठा होणाऱ्या दुधात आर्थिक तोटा सोसावा लागला. दूध संकलन केंद्र दुग्धव्यवसायावर भरभरुन प्रेम करणाऱ्या फोलाने परिवाराने तीन वर्षांपासून एचएफ संकरीत गायींचेही पालन सुरु केले आहे. सध्या १५ गायी आहेत. दररोज शंभर लिटरपर्यंत दूध संकलन होते. फोलाने यांनी गावात दूध संकलन केंद्रही सुरु केले आहे. घरच्या दुधासह अन्य शेतकऱ्यांचे मिळून ६०० ते ७०० लिटर दूध संकलन होते. गायींसाठी ५० हजार रुपये खर्च करुन मुक्त गोठा व शेड उभारले आहे. व्यवस्थापनातील बाबी

  • गोठा व्यवस्थापनाला पहाटे चार वाजता सुरवात. दोन मजुरांसह घरातील अरुण व संदीप बंधू यांच्यावर व्यवस्थापन जबाबदारी. दूध हाॅटेलला पोच करण्यासह थेट विक्रीपर्यंत हे कामकाज.
  • पहाटे चार चे पाच वाजता दूध काढणीनंतर गोठ्याची साफसफाई. त्यानंतर प्रति गायी- म्हशीला १० किलो चारा. दुभत्या जनावरांसाठी दोन वेळा अडीच किलो तर भाकड, गाभण जनावरांसाठी एक किलो दोन वेळा भिजलेली सरकी पेंड, वालीस भुसा.
  • दररोज एकदा म्हशी-गाई धुतल्या जातात. दुपारी चार वाजता पुन्हा चारा व खुराक मिश्रण व त्यानंतर दूध काढणी.
  • वर्षातून चार वेळा लसीकरण.
  • वासरांना दररोज सकाळी सकाळी व संध्याकाळी प्रति दोन किलो चारा.
  • नख्यांची झीज होऊ नये म्हणून सुरवातीपासून रबरी मॅटचा वापर.
  • गोठ्यात गोचिड व अन्य त्रासदायक बाबी होऊ नयेत यासाठी पन्नास कोंबड्याचे अंतर्गत पालन.
  • शेणखताने उत्पादनात वाढ दुध व्यवसायाने परिवाराला आर्थिक बळकटी दिलीच. पण वर्षभरात सुमारे ४०० ते पाचशे टन शेणखत उपलब्ध होते. स्वतःकडील ऊस, केळी, चारापिकांत त्याचा वापर होतो. वर्षभरातील सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक रक्कमेच्या रासायनिक खतांवरील खर्चात त्यातून बचत होते. कुकाणे परिसर पाणी उपलब्धतेचा आहे. चार किलोमीटरवर साखर कारखाना असल्याने बहुतांश ऊसशेतीच आहे. फोलाने यांनी शेणखताच्या वापरातून जमिनीचा पोत सुधारला आहे. चाळीस वर्षांपासून ते ऊस घेतात. पूर्वी एकरी पन्नास ते ५५ टन मिळणारे उत्पादन आता ८० टनांपर्यत पोचले आहे. केळी उत्पादनातही एकरी १० टनाने वाढ झाली आहे. म्हशी धुतल्यानंतर तसेच गोठ्याची स्वच्छता केलेले पाणीही शेतीला देण्याची व्यवस्था केली आहे.   संपर्क- भाऊसाहेब फोलाने, ९४२०९४७०७१, बाळासाहेब फोलाने, ९४२०९४७०८२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

    Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

    Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

    Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

    Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

    SCROLL FOR NEXT