चांगली नोकरी सोडून शेतीत हिरवी स्वप्नं रुजविणारे अनुप व प्रणोती हे पाटील दांपत्य.
चांगली नोकरी सोडून शेतीत हिरवी स्वप्नं रुजविणारे अनुप व प्रणोती हे पाटील दांपत्य.  
यशोगाथा

आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या स्वप्नांनी दिली साद

शामराव गावडे 

शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी, व्यवसायांकडे वळताहेत. त्याचवेळी नागराळे (जि. सांगली) येथील अनुप पाटील या तरुणाने पुण्यातील ‘आयटी’ क्षेत्रातील कंपनीची चांगली नोकरी सोडली. शेतीतच खरे भवितव्य आहे, त्यातच काही घडविण्याची ताकद आहे ही बाब उराशी बाळगून तो गावी आला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुधारीत पीकपद्धती यांचा मिलाफ घडवत शेतीतील विविध प्रयोग तो घडवत आहे. त्याचे उदाहरण शेतीतील उमेद जागवणारेच म्हटले पाहिजे.  सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्‍यातील नागराळे हे कृष्णा नदीकाठावरील गाव आहे. गावात सुनील व स्नेहल हे पाटील दांपत्य पेशाने शिक्षक आहेत. मात्र नोकरी सांभाळत त्यांनी शेतीकडेही लक्ष दिले. त्यांचा मुलगा अनुप याने ‘कॉम्प्युटर सायन्स’ विषयातील पदव्युत्तर पदवी घेतली. शिक्षणाच्या निमित्ताने त्याचे पुणे येथे राहणे झाले. पुण्यातच ‘आयटी’ क्षेत्रातील नामवंत कंपनीत नोकरीही मिळाली. त्या निमित्ताने २००८ ते २०१६ अशी आठ वर्षे त्याने पुण्यात व्यतीत केली.  शेतीत जीवनाचा अर्थ उमगला  घर, ऑफिस, शनिवार, रविवार सुटी, ‘एन्जॉयमेंट’ असा दिनक्रम सुरू होता. भविष्यात लग्न करून पुण्यातच स्थायिक व्हायचे असा विचार त्याच्याबरोबर आई-वडिलांच्या मनातही सुरू होता. परंतू या साचेबंद जीवनाला अनुप कंटाळला होता. या नोकरीतून फार तर आपण फ्लॅट घेऊ शकू, भविष्यात मुलांना चांगले शिक्षण देऊ शकू. पण घरच्या शेतीत लक्ष घातले तर माती समृद्ध करता येईल, पुढच्या पिढीसाठी चांगले अन्न तयार करता येईल, ॲसेट तयार करता येईल असे त्याला वाटले.  नोकरी सोडून शेतीत प्रवेश  अखेर घुसमटीतून नोकरी सोडली. अनुप गावाकडे परतला. शेती करण्याचा विचार कुटुंबापुढे मांडला.  घरच्यांचाही काही प्रमाणात विरोध झाला. पण अखेर आपले उद्दिष्ट समजावून सांगण्यात अनुप यशस्वी झाला. वडिलोपार्जित तीन एकर व वडिलांनी घेतलेली सात एकर अशी एकूण १० एकर जमिनीची जबाबदारी आता सांभाळायची होती.  शेतीत केला बदल  एकदा निश्‍चय केल्यानंतर अनुप यांनी शेतीत व्यावसायिकता आणण्यास सुरवात केली. सुधारीत तंत्र वापरायचे ठरवले. शेतजमिनीच्या ठिकाणी रस्त्याची मोठी समस्या होती. अनुप यांचे कुटुंब पलूस या तालुक्‍याच्या ठिकाणी राहावयास होते. तेथून शेताचे अंतर सुमारे १० किलोमीटर आहे. पण मागे हटायचे नाही, तर मार्ग काढायचा असे मनोमन ठरवले होते. पारंपरिक ऊसशेतीत बदल करताना २० गुंठ्यांत पॉलिहाउस उभारले. त्यासाठी २० लाख रुपयांपर्यंत खर्च केला. बॅंकेकडू कर्ज काढले. पुढे कृषी विभागाचे काही अनुदान मिळाले.  शेती तुमचे काम नव्हे...   या भागात पॉलिहाउसमध्ये रंगीत ढोबळी मिरची फारशी कोणी घेत नव्हते. नोकरीच्या वेळी गुजरातमधील दौऱ्यात हा प्रयोग, त्याचे अर्थशास्त्र पाहण्यात आले होते. रोपांची लागवड केली. शेतीतील खरी कसोटी येथूनच सुरू झाली. ‘व्हायरस’ला एक हजारहून अधिक झाडे बळी पडली. ज्यांचा तांत्रिक सल्ला घेतला होता त्यांनी प्लॉट सोडून द्या, तो गेला आहे. शेती करणे तुमचे काम नव्हे, पुण्याला परत जा, नोकरी करा, कशाला यात पडताय असे बोलणे ऐकवले. अनुप अस्वस्थ झाले.  निराशा झटकली  माघारी फिरून नोकरी करायची तर पराभव होता. खूप विचार केला. निराशा झटकली. जाणकार शेतकऱ्यांच्या प्लॉटसना भेटी दिल्या. पिकाचा बारकाईने अभ्यास केला. ‘व्हायरस’ ग्रस्त झाडे काढून टाकली. नव्याने ‘प्लॅन्टेशन’ केले. व्यवस्थापन सुधारले. रासायनिक खतांच्या जोडीला जीवामृताचा काही प्रमाणात वापर केला. कष्टाला फळ आले. वीस गुंठ्यात १८ टन उत्पादन मिळाले. मुंबईला किलोला ९० रुपयांपर्यंत दर मिळाला. आत्मविश्‍वास दुणावला.  शेवंतीला फटका  मिरचीनंतर शेवंती घेतली. पीक बहरून आले. परंतू बाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. दरांचा अंदाज आला नाही. या पिकातून काहीच हाती लागले नाही. पण अनुप खचले नाहीत. एकेक अनुभव त्यांना शेतीत पुढे घेऊन जात होता. मग खुल्या शेतात चार एकरांवर झेंडू लावला. पहिला तोडा झाला आहे. प्रति किलो ५० ते ६० रुपये दर मिळाला आहे. स्वीट कॉर्नही घेतला आहे.  नापीक जमिनीचा वापर  सुमारे एकरभर जमीन पाणथळ आहे. त्यात पानकणसे उगवायची. या जमिनीचा वापर खुबीने मत्स्यपालनासाठी केला. ७० बाय ६५ मीटर आकाराचे व तीन मीटर खोलीचा तलाव बांधून त्यात मत्स्यपालन सुरू आहे.  अनुप यांच्या व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये 

  • शेतीतील जोखीम टाळण्यासाठी बहुविध पीकपद्धती. 
  • शिक्षणाचा पुरेपूर वापर शेतीत. नव्या पिकांच्या लागवडीसंदर्भात रोग, किडी, उपाययोजना, 
  • नवे तंत्र यांचा बारकाईने अभ्यास 
  • इंटरनेट’चा प्रभावी वापर 
  • संपूर्ण क्षेत्रावर माती परीक्षण 
  • साडेतीन किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन 
  • ‘सेमी ॲटोमेशन’  
  • घरच्यांची समर्थ साथ  अनुप यांना पत्नी सौ. प्रणोती यांची समर्थ साथ आहे. या सध्या एमकॉमचे शिक्षण घेत आहेत. वडील सुनील यांचीही सुटीच्या वेळेत शेतीत मदत मिळते. 

    संपर्क- अनुप पाटील- ९१४५६५७००७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

    Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

    Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

    SCROLL FOR NEXT