बाळासाहेब सोनवणे यांची आंबा बाग
बाळासाहेब सोनवणे यांची आंबा बाग  
यशोगाथा

दुष्काळाशी झुंजत साधला एकात्मिक शेतीचा सुरेख मेळ 

Suryakant Netke

नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे यांनी फळबाग, वनशेती, जोडीला शेळी, कुक्कुट, खिलार गोपालन, गांडूळखत प्रकल्प या माध्यमातून एकात्मिक शेतीचा सुरेख मेळ साधत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर शेती केली आहे. गंभीर दुष्काळी स्थितीतही पाण्याचे नियोजन करून बागा फुलवल्या, वाचवल्या. ऑईलमिल सुरू करून उत्पन्नाला समर्थ जोड दिली आहे.  नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब बाजीराव सोनवणे यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कष्टातूनच वाट काढणे गरजेचे होते. नगरला महाविद्यालयीन जीवनातच व्यावसायिकाकडे चालक म्हणून तीन वर्षे काम केले. त्यानंतर चार चाकी- दुचाकी खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.  शेतीवर लक्ष केले केंद्रित  बाळासाहेब अन्य व्यवसायात गुंतले असले तरी मूळ पिंड शेतीचाच होता. त्यातूनच शेतीवर अधिक लक्ष केंद्रित केले. गावरान कुक्‍कुटपालन सुरू केले. उत्पन्नातून योग्य बचत करीत वीस एकर जमीन खरेदी केली. ही साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. जमिनीचे सपाटीकरण करून भगव्या डाळिंबाची लागवड केली. पुढचा टप्पा म्हणून पंधरा वर्षांपूर्वी दोन एकर क्षेत्रासह तीन एकर बांध क्षेत्रावर केशर आंब्याच्या १२ हजार झाडांची इस्त्राईल तंत्रानुसार लागवड केली. ती एका जागी तिहेरी झाडे पध्दतीची होती. टप्प्याटप्प्याने शेतीतील विविधता वाढत गेली.  बाळासाहेबांची शेती दृष्टिक्षेपात 

  • एकूण शेती ७० ते ८० एकर. 
  • सुमारे १५ वर्षांपूर्वी डाळिंबाच्या १४ हजार झाडांची लागवड. प्रतिझाड ४० किलो तर एकरी सुमारे १४ ते १६ टनांपर्यंत उत्पादन. दर प्रतिकिलो ३५ ते १२० रुपयांपर्यंत. चार वर्षांपूर्वी ११० रुपये प्रतिकिलो दरानुसार डाळिंबाची व्यापाऱ्याला विक्री केली. मात्र त्याने ६० रुपये दराप्रमाणे पैसे देत फसवणूक केली. या घटनेनंतर बागेतच रोखीने विक्री होते. शेवग्याचा देखील वाशी (मुंबई) येथे रोखीनेच विक्रीचा प्रयत्न. 
  • आंब्याची १४ हजार झाडे. त्यात नवी सहाहजार झाडे. आंब्याचे प्रतिझाड ४ क्रेट (प्रतिक्रेट २० किलो) व त्यापुढे उत्पादन. सेंद्रिय पध्दतीचा केशर आंबा असल्याचे अनेक वर्षांपासून लोकांना माहिती आहे. त्यामुळे मागणी चांगली असते. यंदा एकूण पाच टन आंबा मिळाला. शंभर रुपये प्रतिकिलो दराने त्याची घरीच थेट विक्री. 
  • तीन वर्षांपूर्वी शेवग्याची लागवड. उत्पादन प्रतिझाड २० किलो ते ४० किलो उत्पादन. दर ५० ते ६० रुपये प्रतिकिलो (सध्या) 
  • सर्व क्षेत्राला संरक्षक कुंपण. चोहोबाजूंनी चिंच, आवळा, बांबू, आवळा, हिरडा, बेहडा, चिंच, बिबा, करंज, निलगिरी आदींची लागवड 
  • भारत सरकारच्या गाझीयाबाद येथील सेंद्रिय शेती केंद्राने विकसित केलेल्या वेस्ट डीकंपोजर या सेंद्रिय घटकाचा वापर. गुळाच्या वापरातून तयार केलेली स्लरी पिकांना देण्यात येते. 
  • घरचा गांडूळखत प्रकल्प. उन्हाळ्यात निंबोळ्या खरेदी करून त्याची पेंडनिर्मिती. 
  • फळांच्या काढणीनंतर प्रतिझाड अर्धा किलो, कोंबडी खत पाच किलो व शेण खत पाच किलो दरवर्षी वापर. 
  • दुष्काळाशी झुंज  शेवगाव तालुक्यात सातत्याने दुष्काळाच्या झळा बसत आहेत. यंदा आखतवाडे परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी जळाल्या. बाळासाहेबांनी दुष्काळाशी झुंजत शेती फुलवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. पाण्याचा संतुलित वापर करण्यासाठी ४४ एकरांला ठिबक सिंचन केले आहे. एक एकरात शेततळे व चार विहिरी आहेत. त्यातून दरवर्षी तळे भरतात. जानेवारीपर्यंत विहिरीतील आणि उन्हाळ्यात तळ्यातील पाण्याचा वापर होतो. यंदा डिसेंबरपासूनच पाणीटंचाई होती. दर तासाला सोळा लिटर पाणी देण्याची क्षमता असलेले ड्रिपर आहेत. टंचाईच्या काळात ते अर्धा तासच चालवले. ओलावा टिकून राहण्यासाठी उसाचे पाचट व रिकाम्या पोत्यांचा मल्चिंग म्हणून वापर केला.  गेल्यावर्षी गळती लागल्याने शेततळ्यातील पाणी वाया गेले. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उन्हाळ्यात फळबाग वाचवणे आव्हानाचे झाले. वीस एकराला त्याचा फटका बसला.  कुक्‍कुटपालन  बाळासाहेब तीस वर्षांपासून कुक्कुटपालनाशी जोडले आहेत. सुरवातीला ते गावरान कोंबडीपालन करीत. प्रत्येकी सहा हजार क्षमतेची दोन शेडस पंचवीस लाख रुपये खर्चून बांधली. तिसऱ्या शेडचे काम सुरू आहे. शेडमध्ये सुरवातीला सहाशे शेळ्यांचे पालन केले होते. सध्या २० शेळ्या आहेत. गावरान व कडकनाथ कोंबडीपालन स्वतःपुरते सुरू आहे. यंदा बारा हजार ब्रॉयलर कोंबड्यांचे पालन सुरू आहे. कंपनीसोबत प्रतिकिलो साडेसहा रुपये किलोनुसार करार केला आहे.  देशी गोपालन  सध्याच्या ४४ एकरांवरील फळपिकांना ७५ टक्के सेंद्रिय खतांचा वापर होतो. त्यासाठी खिलार गोपालन उपयोगी पडले आहे. मध्यंतरीच्या काळात परिसरातील अनेकांनी येथे गाई आणून ठेवल्या. त्यांची संख्या पन्नास झाली. दुष्काळाचा फटका बसल्याने आता सहाच गायी आहेत. त्यांनाही छावणीचा आधार आहे.  राजकारणापेक्षा शेतीला प्राधान्य  बाळासाहेबांच्या पत्नी सौ. वर्षा आखतवाडेच्या विद्यमान सरपंच आहेत. ते वरुर (ता. शेवगाव) गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य होते. मात्र राजकारणापेक्षा शेतीतील प्रगतीलाच अधिक वेळ देणे बाळासाहेबांना जास्त आवडते. सकाळ माध्यम समूहाच्या ‘एसआयआयएलसी’ प्रशिक्षण केंद्रातून शेळीपालन, कुक्कुटपालन, संस्था नोंदणी, शेतकरी उत्पादक कंपनी आदींचे प्रशिक्षण घेत त्यांनी शेतीत त्याचा वापर केला आहे.  ऑईलमिलमधून उत्पन्नाचा स्रोत  शेवगाव तालुक्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यातील वाव लक्षात घेता  बाळासाहेबांनी २०१४ साली शेवगाव येथे जिनिंग प्रेसिंग व २०१६ मध्ये सरकीपासून तेल आणि पेंड काढण्यासाठी ऑईलमिल सुरू केली. अक्षय व आकाश ही मुले त्याची या उद्योगाची जबाबदारी पाहतात.  संपर्क- बाळासाहेब सोनवणे- ९९२२६६३३५७ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

    Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

    Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

    Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

    Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

    SCROLL FOR NEXT