राजेंद्र चौधरी यांचा ज्वारी पिकात हातखंडा आहे.
राजेंद्र चौधरी यांचा ज्वारी पिकात हातखंडा आहे.  
यशोगाथा

कमी पाणी, अल्प खर्चातील ज्वारी ठरतेय आश्‍वासक 

Chandrakant Jadhav

जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा नदीच्या काठावरील शेतकरी ज्वारी अधिक संख्येने घेतात. खेडी खुर्द येथील राजेंद्र प्रल्हाद चौधरी व घाडवेल येथील खेमराज व देवेंद्र पाटील हे पितापुत्र ज्वारी पिकातील प्रयोगशील व मास्टर शेतकरी आहेत. कमी पाणी, अल्प खर्चात चांगले धान्य, पशुधनासाठी सकस चारा व बऱ्यापैकी पैसा देणारे पीक म्हणून त्यांनी हे पीक दुष्काळातही चांगल्या प्रकारे यशस्वी केले आहे.    सुयोग्य नियोजनातील चौधरी  खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) हे गिरणा नदीकाठी गाव आहे. येथील राजेंद्र चौधरी यांच्याकडे सुमारे चार एकर शेती आहे. सुमारे पंधरा वर्षांपासून ते दादर ज्वारीचे उत्पादन घेतात. एक कूपनलिका सिंचनासाठी आहे, मात्र उन्हाळ्यात पाण्याची समस्या असते. दरवर्षी दीड ते दोन एकरांत दादरची पेरणी होते. यंदा उडीद व मुगाखालील रिकाम्या झालेल्या दोन एकर मध्यम जमिनीत त्यांनी ऑक्‍टोबरमध्ये पेरणी केली. उडीद, मुगाचे अवशेष जमिनीत गाडले. ट्रॅक्‍टरने पूर्व मशागत केली. रोटाव्हेटरने जमीन भुसभुशीत केली. यासाठी एकरी १५०० रुपये खर्च आला. बैलजोडीने पेरणी केली. बियाणे घरचेच वापरले.  बीज अंकुरल्यानंतर महिनाभरात विरळणी केली. त्यास ५०० रुपये खर्च आला. मग सिंचन केले. वाफसा मिळाल्यानंतर बैलजोडीने आंतरमशागत केली. तणनियंत्रणासाठी कुठलाही खर्च आला नाही. रासायनिक खते, कीडनाशके वापरली नाहीत. पीक निसवणीत पुन्हा सिंचन केले. त्यानंतर कोणतेही सिंचन केले नाही.  चांगल्या उत्पादनाची अपेक्षा  पक्ष्यांपासून संरक्षणासाठी एक क्विंटल दादर देण्याच्या तयारीवर गावातील मजुराची नियुक्ती केली आहे. कापणी, कणसे गोळा करणे, कडब्याच्या पेंढ्या संकलित करण्यासाठी एकरी २५०० रुपये खर्च लागेल. सध्या पीक जोमात असून एकरी ९ ते १० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे. दोन एकरांत सुमारे कडब्याच्या ३५० पेंढ्या मिळतील. कडब्याला शेकडा पाच हजार रुपये दर आहे. किमान२५० पेंढ्यांच्या विक्रीचे नियोजन केले आहे. मागील दोन वर्षे दादरला प्रतिक्विंटल सरासरी २४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मळणीच्या वेळेस जी कणसे जोमात, टपोऱ्या दाण्यांची निघतील त्यांचे दाणे पुढील हंगामासाठी तागाच्या पोत्यात साठविले जातील. साहजिकच बियाण्यांवर फारसा खर्च येत नाही.

  संपर्क - राजेंद्र चौधरी - ९३७०८२००४८  पाटील यांचा ज्वारीत हातखंडा  घाडवेल (ता. चोपडा) येथे खेमराज व मुलगा देवेंद्र हे पाटील पितापुत्र तापीकाठावरील आपल्या ७० एकर शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. पैकी ३० एकर कोरडवाहू असून तीन सालगडी आहेत. देवेंद्र कृषी पदवीधर असल्याने शेतीतील तांत्रिक ज्ञानाचा ते पुरेपूर उपयोग करतात. दरवर्षी १५ ते २० एकर त्यांचे दादर ज्वारीचे क्षेत्र असते. सिंचनासाठी चार कूपनलिका आहेत. मात्र पाणी क्षारयुक्त आहे. जमीन क्षारपड झाल्याने पाण्याचा अल्प वापर अनिवार्य असतो. काळी कसदार जमीन आहे. मूग घेतल्यानंतर मशागत करून मागील २८ ऑक्‍टोबरला त्यांनी पेरणी केली.  विविध संशोधीत वाणांचा वापर  दहा वर्षांपासून देवेंद्र विविध क्षेत्रांत ज्वारीच्या विविध संशोधीत वाणांचे प्रयोग घेत आहेत. दोन वर्षांपूर्वी महात्मा फुले कृषी विद्यापीच्या (राहुरी) फुले वसुधा वाणाची पेरणी केली. मागील वर्षी परभणी मोती व या हंगामात नऊ एकरात फुले रेवती व सुमारे सहा एकरात परभणी मोती वाणाची पेरणी केली. 

त्यांचे व्यवस्थापन - (यंदासह) ठळक बाबी 

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे प्रति किलो ११० रुपये या दरात बियाणे घेतले. 
  • एकरी चार ते पाच किलो बियाण्याचा वापर. 
  • प्रत्येक वाणाची उगवणक्षमता तपासून व जमिनीचा प्रकार पाहून बियाणे वापरतात. 
  • अमेरिकी लष्करी अळी व खोडकिड्यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी 
  • सुमारे चार महिने कालावधीच्या पिकात ओलीतावरील पेरणीनंतर दीड महिन्यानी एकच सिंचन. 
  • त्यानंतर सिंचन नाही. 
  • रासायनिक खतांचा अजिबात वापर नाही. केवळ सेंद्रिय खते वापरतात. 
  • यंदा कणसे जोमात. पक्ष्यांपासून संरक्षणासाठी कुठलाही खर्च केला नाही. नऊ ते १० फुटांपर्यंत ताट्यांची वाढ. 
  • पूर्वी पारंपरिक पद्धतीत एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन मिळायचे. सुधारित तंत्रानुसार अलीकडे 
  • १० ते १२ क्विंटल पर्यंत मिळते. यंदाही तेवढे अपेक्षित. 
  • अलीकडील काळातील दर - क्विंटलला १२०० ते १५०० रु. 
  • कडब्यातून उत्पादन खर्च मिळतो  अलीकडे दुष्काळामुळे कडब्याला मागणी वाढली आहे. दरवर्षी एकरी १५० ते २०० पेंढ्या कडबा मिळतो. त्यास पाच हजार रुपये प्रति शेकडा दर मिळतो. कडबा उत्पन्नातून ज्वारीचा उत्पादन खर्च मिळतो. मग एकूण उत्पन्न म्हणजे नेट नफाच असतो. यंदा १००० पेंढ्या विक्रीचे नियोजन आहे.  ज्वारीचे बीजोत्पादन  यंदा फुले रेवती वाणाचा बिजोत्पादन प्लॉट देवेंद्र यांनी घेतला आहे. त्यांनी जय गुरूदेव बहुउद्देशीय शेतकरी गट स्थापन केला असून त्याचे ३०० सभासद आहेत. त्यांनाच बियाण्याची माफक दरात विक्री करण्यात येईल. ज्वारी व्यतिरिक्त खरिपात ३० एकर कापूस, १५ एकर गहू व अन्य पिकांचे व्यवस्थापन असते. दोन बैलजोड्या, तीन गायी, दोन म्हशी व एक ट्रॅक्‍टर त्यांच्याकडे आहे.  संपर्क-   देवेंद्र पाटील - ७३५०९९४८१५   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

    Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

    Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

    Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

    Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

    SCROLL FOR NEXT