Quality guava production of Suryakantrao Deshmukh
Quality guava production of Suryakantrao Deshmukh  
यशोगाथा

देशमुखांची फळबागकेंद्रित प्रयोगशील शेती

माणिक रासवे

झरी (ता. जि. परभणी) येथील कृषिभूषण सूर्यकांतराव देशमुख-झरीकर यांनी फळबागकेंद्रित शेती पद्धत विकसित केली आहे. मोसंबी व पेरू या दोन मुख्य पिकांवर त्यांनी सध्याची शेती केंद्रित केली आहे. वयाच्या पासष्टीतही त्यांची प्रयोगशीलता व शेतीतील जिगर तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. जलसंधारण, ग्रामविकास कार्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. झरी (ता. जि. परभणी) येथील सूर्यकांतराव देशमुख यांनी परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात  कला शाखेतून शिक्षण घेतले. कुटुंबाची झरी शिवारात सुमारे ८० एकर जमीन आहे. पूर्वी जिरायती बहुल क्षेत्रात मूग, गावरान कापूस, तूर, ज्वारी, हरभरा, लाख, जवस आदी पिके घेतली जात असत. परंतु त्यातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्या वेळी देशमुख यांनी सिंचन सुविधांची निर्मिती केली. फळबाग लागवडीचा निर्णय धेतला. फळबागांचा प्रदीर्घ अनुभव  सन १९८० मध्ये सिंचनासाठी तीन विहिरींची सुविधा होती. परंतु पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नव्हते. अशा वेळी पावणेचार एकरांत न्यूसेलर मोसंबीची लागवड केली. पाण्याच्या कमतरतेमुळे आंबे बहराचे उत्पादन घेता येत नव्हते. मृग बहरात उत्पादन घेत असत. टप्प्याटप्याने सिंचन स्रोतांचे बळकटीकरण केले. तसा मोसंबीखालील क्षेत्राचा विस्तार ५० एकरांपर्यंत वाढविला. जुन्या बागा काढून नवी लागवड असे चक्र सुरू  ठेवले. सर्वांत आधी लागवड केलेल्या मोसंबीचे २९ वर्षे उत्पादन घेतले. नागपूर, मुंबई, अहमदाबाद, अमृतसर, बंगळूर, दिल्ली आदी मोठ्या शहरांतील बाजारापेठेत ट्रकद्वारे मोसंबी नेऊन विक्री केली. त्या ठिकाणी चांगले दर मिळाले. सन २०१९ च्या एप्रिलमध्ये आठ एकरांत स्वीट ऑरेंज जातीच्या सीडलेस मोसंबी, तर यंदा १४ एकरांत न्यूसेलर व काटोल गोल्ड या जातींची लागवड केली आहे. एकरी १२ टनांपर्यंत उत्पादन मिळते. कोरोनानंतर मोसंबीला मागणी वाढल्याने १० हजार ते १५ हजारांपर्यंत असलेले प्रति टन दर दिल्ली मार्केटला ५० हजार रुपयांपर्यंत गेल्याचे देशमुख म्हणाले.   दुष्काळी स्थितीत पेरू  सततच्या दुष्काळामुळे पाण्याची जास्त गरज असलेल्या फळपिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरू लागले. त्यामुळे तुलनेने कमी पाण्यात येणाऱ्या पेरूची १० बाय १० फूट अंतरावर सुमारे पाच एकरांत लागवड केली आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातून ललित जातीची रोपे आणली आहेत. झाडे लहान आकाराची असताना सुरुवातीची काही वर्षे आंतरपिके घेतली. ललित पेरूचा गर गुलाबी आहे. फळे चवदार, टिकाऊ आहेत. त्यामुळे ग्राहकांची अधिक पसंती असते. मृग बहराचे उत्पादन 

  • दरवर्षी मृग बहराचे उत्पादन घेतात. हंगाम नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत चालतो. एप्रिलपासून पाण्याची उपलब्धता कमी होते. त्या वेळी छाटणी केली जाते. मेमध्ये पाण्याचा ताण दिला जातो. जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर फुले लागून फळधारणा होते. छाटणी केल्याने झाडांची उंची दहा फुटांपर्यंत राहते. फळफांद्याची संख्या वाढते.  
  • दरवर्षी उत्पादनात वाढ होते. सध्या बागेला पाच वर्षे झाली असून, एकरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळत आहे. व्यापारी थेट बाग खरेदी करतात. कोरोनानंतर पसरलेल्या अफवेमुळे पेरूच्या दरावर परिणाम झाला असून, किलोला असलेले ३० रुपयांपर्यंतचे दर सध्या १० रुपयांपर्यंत खाली आल्याचे देशमुख म्हणाले.
  • पेरूचा प्रसार  अन्य व्यावसायिक फळांच्या तुलनेत पेरूवर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. झाडावर पिकण्याआधी फळे तोडल्यास फळमाशी येत नाही. तिच्या नियंत्रणासाठी गंध सापळेही लावले जातात. देशमुख यांचे अनुभव तसेच प्रेरणेतून झरी परिसरातील शेतकरी पेरू लागवडीकडे वळले आहेत. चांगले उत्पादन घेत आहेत. जमिनीची सुपीकता जपली  शेणखत, गांडूळ खत, जिवामृत आदी निविष्ठांची निर्मिती शेतातच होते. फळबागांत धैंचा पीक हिरवळीचे खत म्हणून घेण्यात येते. सेंद्रिय निविष्ठांमुळे जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी मदत होत आहे. फळांचा दर्जा चांगला राहत आहे. परिणामी, चांगला बाजारभाव मिळत आहे. सिंचन व्यवस्था  टप्प्याटप्प्याने सिंचन स्रोत निर्माण करत सुमारे ६० एकर जमीन सिंचनाखाली आणली आहे. दहा विहिरी, चार विंधन विहिरी आणि जिल्ह्यातील पहिल्या शेततळ्यांपैकी खोदलेले एक शेततळे आहे. प्रवाही पद्धत बंद करून ठिबकद्वारे पाणी दिले जाते. ग्रामविकास कार्यात कामगिरी  देशमुख सन १९७८ ते २००२ या काळात झरी गावचे सरपंच होते. स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रदीर्घ कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियान, नाम फाउंडेशनच्या माध्यमातून गावशिवारात जलसंधारणाची कामे करण्यात आली. त्यामुळे गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला. शेती बागायती होण्यास मदत झाली. त्यांनी झरी येथे राबविलेला एक गाव एक स्वच्छ स्मशानभूमी उपक्रमामध्ये जिल्हाभरातील १० ते १२ गावे सहभागी झाली आहेत. या निमित्त स्पर्धेचे आयोजनदेखील त्यांनी केले आहे. विविध पुरस्कारांनी सन्मान  

  • सन १९७९- शेतीनिष्ठ शेतकरी, सन २०१२- कृषिभूषण
  • गुजरात- नवसारी येथील विद्यापीठाकडून २००८ मध्ये उद्यानरत्न 
  • मराठवाडा भूषण पुरस्कारासह अनेक संस्थांकडून शेती तसेच ग्रामविकास कार्याचा गौरव 
  • देशमुख यांचे वय सध्या ६५ वर्षे आहे. दररोज सकाळी पाच ते सायंकाळी सातपर्यंत त्यांचे वास्तव्य शेतावरच असते. विविध ग्रामविकास कार्यक्रमांना उपस्थित राहून जनजागृतीचे कार्य देखील ते करतात.
  • संपर्कः सूर्यकांतराव देशमुख- ९४२३७७६६००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

    Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

    Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

    Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

    Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

    SCROLL FOR NEXT