पिंपळद (ता. जि. नाशिक) येथील आपल्या शिवारात नैसर्गिक शेतीचे प्रयोग करण्यात डॉ. सावजी वामनराव गोराडे यांनी झोकून दिले आहे. आंब्याच्या सुमारे १६० झाडांची आणि त्यात विविध आंतरपिकांची जोपासना तिथं होते आहे. इथे पिकणारे उत्पादन आरोग्यदायी आहेच. शिवाय आपले आरोग्य, चित्तवृत्तीदेखील या शेती पद्धतीतून समाधानी, उत्साही असल्याची भावना सतत वाटत राहते असे गोराडे सांगतात.
जमीन श्रीमंत करणारे त्यांचे हे नैसर्गिक शेतीचे मॉडेल शेतकऱ्यांसाठी आदर्शदायीच आहे. नाशिक जिल्ह्यात घोटी, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या गावांच्या मधोमध डोंगरांनी वेढलेल्या पिंपळद या निसर्गरम्य परिसरात (ता. नाशिक) डॉ. सावजी वामनराव गोराडे यांची शेती आहे.
नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू असलेले शिवार म्हणून इथली अोळख असंख्य शेतकऱ्यांना झाली आहे. खरं तर जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बाणगाव हे डॉ. गोराडेे यांचे गाव. दुष्काळी तालुक्यातील या गावात त्यांचं बालपण गेलं. शालेय जीवनापासूनच त्यांना शेतीची आवड. घरच्या शेतीत सर्व कामे त्यांनी केली आहेत. मजबूत शैक्षणिक पाया
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून एमएस्सी (कृषी- ऍग्रोनॉमी) पदवी फार पूर्वीच्या काळात म्हणजे १९७५ मध्ये घेतली. या परीक्षेत विद्यापीठात पहिले आल्याबद्दल विद्यापीठाने डॉ. गोराडे यांना सुवर्णपदक देऊन गौरविले.
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून सेंद्रिय शेती विषयात संशोधन करीत "पीएचडी' पदवी मिळवली.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर बॅंक ऑफ इंडियात नोकरीचा योग गोराडे यांना चालून आला. या काळातही सुटी व फावल्या वेळेत ते आपल्या शेतीत विविध प्रयोग करायचे. सन २००१ या काळात ग्रामीण बॅंकेचे ते अध्यक्ष होते. याच काळात त्यांनी शेतीला पूर्ण वेळ देण्याच्या हेतूने स्वेच्छानिवृत्ती घेतली. शेतकऱ्यांचे स्वयंसहाय्यता गट तयार करणे, त्यांच्यात शेतीविषयक शास्त्रीय दृष्टीकोन रुजविणे यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांचा भर नेहमी सेंद्रिय पद्धतीवर असे. संस्थेची स्थापना सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी गोराडे यांनी बॅंक क्षेत्रातील सहकारी डॉ. साहेबराव क्षीरसागर, प्रकाश आवटे, डॉ. अशोक घुगे यांच्यासोबत "ग्लोबल रिसर्च फाऊंडेशन' संस्थेची स्थापना केली.
दरम्यान देशातील विविध भागांत सुरू असलेल्या सेंद्रिय शेतीच्या मॉडेल्सना भेटी देणे सुरु होते. याच प्रवासात नैसर्गिक शेतीचे अभ्यासक सुभाष पाळेकर यांची भेट झाली. त्यानंतर शिबिराच्या माध्यमातून ते नैसर्गिक शेतीच्या अधिक जवळ आले. पुस्तकांनी दिशा दिली पुस्तकांच्या सहवासातच गोराडेे यांची शेती अधिक फुलली. त्यातूनच नैसर्गिक शेतीतीलं चिंतन सुरू राहिलं. सर अल्बर्ट हॉवर्ड यांचं "ऍन अग्रिकल्चर टेस्टामेंट', रॅचेल कार्सन यांचं "द सायलेंट स्प्रिंग', फॅटल हार्वेस्ट या पुस्तकांनी अस्वस्थ करताना नैसर्गिक शेतीतील प्रयोगांसाठी ऊर्जा दिली.
रसायनांच्या दुष्परिणामातून नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होत असल्याची पुस्तकातील मांडणी, त्या मागचे विश्लेषण त्यांना भिडले. नैसर्गिक शेतीची खुली प्रयोगशाळा नैसर्गिक शेतीतले गोराडे यांचे आंबा हेच मुख्य पीक आहे. काळ्या खोल मातीत जुलै २०११ मध्ये १५ बाय १५ फुटांवर आंब्याच्या १६० झाडांची लागवड केली आहे. त्यात केशरची १४० तर उर्वरित हापूस व राजापुरी वाण आहे. नाशिक येथील मुक्त विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या रोपवाटिकेतून रोपे आणली आहेत. शेणखत, जीवामृत यांचा त्यात वापर सुरु केला.
आंब्याच्या प्रत्येक झाडाजवळ चवळीच्या चार ते पाच बिया टाकल्या. चवळीच्चया झुडुपांचा आच्छादन म्हणून वापर केला. चवळीच्या मुळांशी असलेल्या गाठींमुळे आंब्याच्या मुळांच्या कक्षेत नत्राचे स्थिरीकरण होण्यास मदत झाली. बागेतील तण, गवत कापून घेऊन ते बोदावरच कुजविले. या बाबींचा आजही वापर सुरू आहे.
निविष्ठांचा वापर
नैसर्गिक पर्यावरण व जीवसृष्टीच्या चक्राला कुठेही बाधा न आणता त्याला पूरक असेच नियोजन
अन्नद्रव्य व्यवस्थापनात शेत परिसरातच तयार केलेले सेंद्रिय, कंपोष्ट, लेंडीखत आणि गांडूळ खत यांचा वापर. (गरजेनुसार वर्षातून दोन ते तीन वेळा)
जीवामृत, पंचगव्य यांचा वापर, पीक संरक्षणासाठी कडुनिंबाचा पाला, दशपर्णी अर्क यांचा वापर
चवळी सारख्या पिकांची नियमित लागवड होते. चवळीचा जैवभार मुळाजवळ कुजवला जातो. त्यातून पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होते.
गोमुत्राची (पाच टक्के प्रमाणात) फवारणी बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणात उपयुक्त ठरली आहे.
प्रत्येकी पाच लिटर गोमूत्र व गांडूळ पाणी अधिक १०० लिटर पाणी या द्रावणाचीही फवारणी
पंचगव्य निर्मितीत देशी गाईच्या दुधाचा वापर होतो. पीकपोषणासाठी त्याचा उपयोग होतो असे दिसून आले आहे. याचा वापर फुलोऱ्यानंतर एकदा होतो.
पाणी व्यवस्थापन ठिबक न वापरता फ्लड पद्धतीने दिले जाते. झाडे पाच वर्षांची होतात त्या वेळी त्यांच्या मुळ्या दूरवर पसरलेल्या असतात. त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पाणी पोचते. मुळी सक्षम होते. त्यामुळे खोडही जाड व मजबूत होते असा अनुभव आला आहे. मागील पाच वर्षांत एकही झाड खाली वाकले नाही किंवा त्याची मरतूक झाली नाही.
आंतरपिकांपासून अतिरिक्त उत्पन्न आंब्याच्या नव्या बागेत भुईमूग, सोयाबीन, तूर, मूग, कांदा, मेथी, लसूण, तूर, गहू आदी पिके घेतली जातात. गव्हाचे एकरी ६ क्विंटल, भुईमुगाचे ५ क्विंटल, सोयाबीनचे ४ क्विंटल तर कांद्याचे सहा गुंठ्यात १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यात पाण्याचा ताण दिला जातो. डिसेंबरपासून फुलोऱ्यास सुरवात होते. -- डॉ. गोराडे यांच्या नैसर्गिक शेतीतील महत्त्वाचे मुद्दे -
जमिनीत मुबलक प्रमाणात सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता ठेवणे.
सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण दीड टक्क्यापेक्षा जास्त राहील याकडे लक्ष
जमीन रिकामी न ठेवता नियमित आंतरपिकांचा वापर
आंतरपिकांत कडधान्ये पिकांचा अंतर्भाव ठेवणे
देशी गोमूत्र कायम उपलब्ध करणे
नैसर्गिक आंब्याची गुणवत्ता
वजन सरासरी २५० ग्रॅम
एकसमान आकर्षक रंग
रस भरपूर
चव, स्वाद सरस
नैसर्गिक पद्धतीने आढी लावून पिकविले जातात. ग्राहक घरी येऊन खरेदी करतात.
डॉ. सावजी गोराडे : ९८८१७३५६५१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.