Forestry campaign on waste land through the organization. 
यशोगाथा

पक्षी,पर्यावरण,शेती संवर्धनाचा उपक्रम...

पाच वर्षापूर्वी औरंगाबाद शहरातील संदीप भाले यांनी “एचटूओ अँड सॉईल, एन्व्हारमेंट रिसर्च फाऊंडेशन”ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. पक्षी संरक्षण आणि संगोपन, पर्यावरण संवर्धन आणि शेती विकासामध्ये ही संस्था कार्यरत आहे. आज जागतिक चिमणी दिनानिमित्त या संस्थेच्या विविध उपक्रमांची ओळख...

उत्तम सहाणे

पाच वर्षापूर्वी औरंगाबाद शहरातील संदीप भाले यांनी “एचटूओ अँड सॉईल, एन्व्हारमेंट रिसर्च फाऊंडेशन”ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. पक्षी संरक्षण आणि संगोपन, पर्यावरण संवर्धन आणि शेती विकासामध्ये ही संस्था कार्यरत आहे. आज जागतिक चिमणी दिनानिमित्त या संस्थेच्या विविध उपक्रमांची ओळख... सृष्टीतील प्रत्येक घटक हा निसर्ग आणि पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक. यात विविध वृक्ष, प्राणी, पक्षी, नदी, नाले, पर्वत या सर्वांचे महत्त्वाचे स्थान अबाधित आहे. परंतु मनुष्याच्या प्रगतीच्या नावाखाली या निसर्गसाखळीला बाधा येत आहे. आपली पूर्वीची जीवनशैली चिमणी आणि पक्षांना पूरक होती. त्यांना सहज अन्न मिळत होते. मात्र २० ते २५ वर्षात हे सगळं बदललं. पूर्वी वाड्यांमध्ये, कौलारू घरांमध्ये राहण्यासाठी मोकळी जागा असायची. आता सिमेंटच्या जंगलात चिमण्यांना राहता येईल एवढीही जागा शिल्लक नसते. किडनाशकांच्या अति वापरामुळे छोट्या किडी, मुंग्या नाहीशा होत आहेत. त्यामुळे चिमण्यांना अन्न मिळणे कठीण झाले आहे. जिथे दाट झाडे आहेत तेथेच चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो. चिमणी वाचवा अभियान  चिमण्यांवर संकटांची वेळ आलेली असताना औरंगाबाद शहरातील ‘स्पॅरोमॅन’ म्हणून ओळख असणाऱ्या संदीप दिनकर भाले यांनी ‘चिमणी वाचवा हे अभियान गेल्या पाच वर्षापासून सुरू केले. पर्यावरणप्रेमी संदीप भाले यांनी पाच वर्षापूर्वी “एचटूओ अँड सॉईल एन्व्हारमेंट रिसर्च फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे शेतकऱ्यांना माफक दरात माती, पाणी परिक्षण, शेती सल्ला, औरंगाबाद परिसरात वृक्षारोपण, शालेय विद्यार्थांसाठी पर्यावरण पूरक उपक्रम राबविले जातात. संदीप भाले हे या संस्थेचे सचिव म्हणून काम पाहत आहेत तर सुमीत भाले हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. अशी झाली सुरवात चिमणी संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी म्हणून २०१० पासून २० मार्च हा जागतिक स्तरावर चिमणी दिवस साजरा केला जातो. यासंदर्भाने संदीप यांनी चिमण्यांच्या घटत्या संख्येबाबत काय उपाय करता येईल याबाबत विविध संकेतस्थळावर माहिती शोधली. यातून लक्षात आले की, चिमण्या भिंतीमधील जागा, पोटमाळा, बाल्कनी, भिंतीचा कोपरा शोधतात. मात्र शहरीकरणात पारंपरिक घरांची जागा फ्लॅट आणि काचेच्या इमारतींनी घेतली आहे. त्यामुळे चिमण्यांना घरटी बांधायला जागा शिल्लक नाही. चिमणीसाठी बनविले घरटे 

  • संकेतस्थळावरून माहिती आणि पूर्ण अभ्यास करून संदीप यांनी कृत्रिम घरटे बनवायला सुरवात केली. ६ सेंटिमीटरचा मध्यभागी गोल, १२ सेंटिमीटर उंची आणि १४ सेंटिमीटर लांबीच्या आकर्षक आकारामध्ये घरटे तयार केले.
  • पाच लिटर तेलाच्या कॅनपासून चिमणीसाठी घरटे तयार केले आहे.
  • दोन्ही घरट्यामध्ये चिमणीचे कुटुंब आरामात राहू शकते, अशी घरट्याची रचना आहे. घरटे कुठेही अडकवता येते. आकर्षक, सुंदर शो-पीससारखी रचना आहे. चिमणीशिवाय अन्य पक्षी घरट्यात जाऊ शकत नाही.
  • चिमणीच्या घरट्याचे छप्पर उतरते असल्याने कोणत्याही मोठ्या पक्षाला त्यावर बसता येत नाही.
  • औरंगाबादमधील गृहलक्ष्मी महिला बचत गटामार्फत ही घरटी बनविली जातात. एक घरटे बनविण्यासाठी ७० ते ८० रुपये खर्च येतो. दरवर्षी एक हजार घरटी बनविली जातात.
  • ना नफा ना तोटा अशा प्रकारे हे घरटे विविध शाळा व पर्यावरण प्रेमी संस्थांमार्फत दिले जाते.
  • घर तेथे घरटे उपक्रम चिमणीच्या रक्षणासाठी संस्थेने 'घर तिथे घरटे ' हा उपक्रम राबवला आहे.' ना नफा ना तोटा ' तत्त्वावर घरट्यांची विक्री केली जाते. सुमीत भाले, आनंद लंगोटे, नितीन सोनगीरकर, वैशाली कुलकर्णी, गीतांजली भाले, वैशाली पवार, संदीप भाले असे सातजण बचत गटाच्या सहकार्याने चिमणीसाठी घरटी तयार करतात. गेल्या पाच वर्षात औरंगाबाद शहरात त्यांनी १४ हजार घरट्यांचे वाटप केले आहे. औरंगाबाद शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, वसाहती, सरकारी कार्यालयात जाऊन ते जनजागृती करतात. लोकांना घरटी देऊन चिमण्यांचे संरक्षण करण्याचा संदेश देत असतात. शाळेतून रॅली काढून पर्यावरणाची माहिती देत मुलांमध्ये जनजागृतीचे कामही सुरू आहे. आत्तापर्यंत संस्थेसोबत पाच हजार स्वयंसेवक जोडले गेले आहेत. असे बोलवा चिमण्यांना....

  • चिमण्यांना किलबिलाट आपल्या अंगणात असावा, असे जर आपणास वाटत असेल तर अंगणात सुरक्षित जागेवर चिमणीचे घरटे लावावे.
  • यूट्यूबवर ‘कॉल ऑफ अ हाऊस स्परो‘ (Call of a House Sparrow) हा चिमण्यांचा चिवचिवाट असलेला व्हिडिओ डाऊनलोड करावा. या व्हिडिओचा चिवचिवाट रोज सकाळी शांत वेळी साधारण एक मिनीट रोज वाजवावा. साधारण आठ ते दहा दिवस रोज हा चिवचिवाट केल्यास चिमण्यांची वर्दळ सुरू होते. त्यातूनच चिमणी घरट्यामध्ये आपले बस्तान बसवते. असा अनुभव संदीप भाले यांनी सांगितला आहे.
  • टाकाऊपासून टिकावू

  • संस्थेने पाच लिटरच्या तेलाच्या रिकाम्या डब्यापासून आकर्षक घरटे तयार केले आहे. तेलाचा रिकामा झालेला डबा स्वच्छ धुवून मध्यभागी काप दिला देऊन दोन्ही बाजूला वाकवला जातो.
  • त्यातील पसरट भागात आइस्क्रीमचे रिकामे डबे चिकटवलेले आहेत. त्यात धान्य आणि पाणी ठेवता येते. डब्याच्या आत पक्षांना राहण्यासाठी जागा असते. खाण्यासाठी दाणे, पिण्यासाठी पाणी आणि राहण्यासाठी जागा मिळाल्यामुळे पक्षी त्यामध्ये येतात. असे घरटे घरच्या घरी बनविण्यासाठी संदीप भाले विविध ठिकाणी जाऊन मोफत प्रशिक्षण देतात.
  • चिमणी कमी झाल्याचे परिणाम  चीनमध्ये ज्या भागात भाताचे पीक जास्त प्रमाणात घेण्यात येत असे तेथील लोकांनी तक्रार केली की, चिमण्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे आमच्या पीक उत्पन्नात घट होत आहे. यावर इलाज म्हणून या भागातील सर्व चिमण्या मारण्याचे आदेश देण्यात आले. काही पर्यावरण प्रेमींनी याला विरोध केला, पण विरोध न जुमानता आदेशाची अंमलबजावणी झाली. त्यानंतर भरघोस पीक येईल अशी लोकांची अपेक्षा होती. पण ही अपेक्षा फोल ठरली कारण भात पिकावर अळ्या आणि कीटकांचे प्रमाण खूप वाढले. किडीच्या प्रादुर्भावामुळे अर्ध्यापेक्षा अधिक उत्पन्न कमी झाले. यावरून अन्नसाखळीमध्ये चिमणी किती महत्त्वाची आहे हे सिद्ध झाले. शेतीमधील विविध पिकांवर अळ्या आणि किडींचा प्रादुर्भाव होत असतो. या किडींच्या नियंत्रणासाठी चिमणी, साळुंखी, कोतवाल, बगळे, कावळे असे कितीतरी पक्षी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीतीने किडींना आपले भक्ष्य बनवून शेतकऱ्याचे पीक वाचविण्यासाठी मदत करतात. यावर कृषी संशोधन केंद्रात प्रयोग झाले आहेत. म्हणूनच शेतात पक्षी थांबा लावण्याची शिफारस आहे. यावर पक्षी बसून किडींना सहज पकडू शकतो. संपर्क  -संदीप भाले,९७६४२८८७१२ (औरंगाबाद) -उत्तम सहाणे, ७०२८९००२८९ (डहाणू, पालघर) ( लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, ता. डहाणू,जि.पालघर येथे कार्यरत आहेत)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

    Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

    Maharashtra Assembly Election Result 2024 : वऱ्हाडामध्येही महायुतीचा बोलबाला

    Maharashtra Election Result : ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद महायुतीला!

    Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

    SCROLL FOR NEXT