Cold Weather Update : महाराष्ट्रावर आज (ता. २४) रोजी १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. उद्या सोमवारपासून (ता. २५) आठवडा अखेरपर्यंत १०१० हेप्टापास्कल हवेचा दाब राहील. परिणामी, थंडीत चढ- उतार जाणवेल.
हवेच्या दाबात वाढ होताच किमान व कमाल तापमानात घट होऊन थंडीची तीव्रता वाढते. राज्याच्या बहुतांश भागात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. ईशान्येकडून येणारे थंड वारे थंडीची तीव्रता वाढवतील. त्याच वेळी राज्याच्या सर्व भागांत दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल.
हवामान कोरडे व थंड राहील. ज्या भागात सकाळची सापेक्ष आर्द्रता अधिक असेल, तिथे पहाटेपासून सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात धुके जाणवेल. पिकांवर दवबिंदू दिसून येतील. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. मध्य व पूर्व विदर्भात किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल; तर काही भागांत ते आणखी घसरेल.
थंडी सकाळी अधिक व दुपारी मध्यम स्वरूपात जाणवेल. कोकणातही किमान तापमानात घसरण होऊन त्याचा फायदा आंब्याला मोहर येण्यात येईल. अन्य ठिकाणी गहू, हरभरा पिकांच्या वाढीस थंडी पोषक ठरेल. उसामध्ये साखर वाढण्यास अनुकूल ठरेल.
सोमवारी (ता. २५) श्रीलंकेपासून पूर्वेस हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. मंगळवारी (ता.२६) ते पश्चिम दिशेस सरकून त्याचा केंद्रबिंदू श्रीलंकेवर असेल. बुधवार (ता. २७) हे लहानसे चक्रिय वादळ विरून जाणार असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. प्रशांत महासागराचे विषुववृत्तीय भागात पेरूजवळ पाण्याचे तापमान १६ अंश सेल्सिअस, तर इक्वेडोरजवळ २४ अंश सेल्सिअस राहण्यामुळे ‘ला निना’चा प्रभाव सध्या तरी नाही. हिंदी महासागराचे पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश से. राहील.
कोकण ः
या आठवड्यात आकाश निरभ्र राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे गरव्या भात जातींची काढणी करून झोडणी करावी. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंड वारे कोकणातही पोहोचतील.
सर्व जिल्ह्यांत किमान तापमान घसरून २१ अंश सेल्सिअस राहील; तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील.
सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २४ ते ३० टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे व थंड राहील. या हवामानाचा फायदा भात कापणी, मळणी, झोडणी या कामांसाठी आणि रब्बी हंगामातील पिकांनाही होईल. आंब्याचा मोहर लवकर निघण्यास मदत होईल.
उत्तर महाराष्ट्र ः
नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस व किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस व किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस; तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यात निरभ्र राहील. पावसाची शक्यता नाही.
वाऱ्याची दिशा नाशिक व धुळे जिल्ह्यांत आग्नेयेकडून तर नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत पूर्वेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ४२ टक्के; धुळे जिल्ह्यात ३४ टक्के; नंदूरबार जिल्ह्यात २९ टक्के आणि जळगाव जिल्ह्यात ३५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १८ ते २३ टक्के इतकी कमी राहील. हवामान कोरडे राहील.
मराठवाडा ः
धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. जालना, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्येयेकडून राहील; तर उर्वरित हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव व लातूर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव जिल्ह्यात १२ किमी, बीड जिल्ह्यात १० किमी, तर उर्वरित लातूर, परभणी, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ८ ते ९ किमी आणि नांदेड व हिंगोली जिल्ह्यात ६ ते ७ किमी राहील. कमाल तापमानात घट होईल.
कमाल तापमान लातूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस; तर धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत १८ अंश; तर उर्वरित जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २५ टक्के राहील.
पश्चिम विदर्भ ः
बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत आग्नेयेकडून व ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ किमी सर्वच जिल्ह्यात राहील. वाशीम, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील; तर अकोला जिल्ह्यात ते ३० अंश सेल्सिअस राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस; तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यात निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ४२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० टक्के राहील.
मध्य विदर्भ ः
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात ५ ते ६ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस; तर किमान तापमान १६ ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यात निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ४४ टक्के; तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २१ ते २३ टक्के राहील.
पूर्व विदर्भ ः
चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा या सर्व जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यात अत्यंत कमी म्हणजे ३ ते ५ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २९ अंश; तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३० अंश आणि चंद्रपूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील.
किमान तापमान गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १५ अंश; चंद्रपूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ६० टक्के, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यात ५० टक्के व भंडारा जिल्ह्यात ४८ टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० ते २९ टक्के राहील.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र ः
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात आग्नेयेकडून; तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ९ ते १२ किमी राहील. कमाल तापमान सोलापूर जिल्ह्यात ३० अंश; तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सांगली व सोलापूर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील; तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४६ ते ५४ टक्के व दुपारची २१ ते ३३ टक्के राहील.
कृषी सल्ला ः
हरभरा व गव्हाच्या पेरण्या पूर्ण कराव्यात.
कांदा रोपे ६० दिवसांची झाली असल्यास, त्या रोपांची पुनर्लागवड लवकरात लवकर पूर्ण करावी.
कोबी, फ्लॉवर, नवलकोलचे रोपांची लागवड पूर्ण करावी.
पूर्वहंगामी उसाची लागवड पूर्ण करावी.
कपाशी वेचणी सकाळी करावी.
गरव्या भात वाणांची वैभव विळ्याने कापणी करून झोडणी करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.