भरघोस मका उत्पादनासाठी सुधारीत पद्धती
भरघोस मका उत्पादनासाठी सुधारीत पद्धती 
तृणधान्ये

भरघोस मका उत्पादनासाठी सुधारीत पद्धती

डॉ. एल. एन. जावळे, डॉ. के. आर. कांबळे, डॉ. आर. आर. धुतमल

महाराष्ट्रात रब्बी हंगामापेक्षा खरीप हंगामात मका पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्रात मका पिकाखालील सर्वात जास्त क्षेत्र औरंगाबाद जिल्ह्यात (२०४१ हजार हे.) असून त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात (१५४१ हजार हे.) तसेच जळगाव (१०८२ हे.) व नाशिक (१२०० हजार हे.) या जिल्ह्यात असून त्यांची उत्पादकता इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रातील मका पिकाखालील एकूण क्षेत्रापैकी ३० टक्के क्षेत्र व १२ टक्के उत्पादन हे मराठवाड्यात होते. खरीप २०१७-१८ या वर्षाच्या आकडेवारी नुसार महाराष्ट्रात ९.१३ लाख हेक्टर क्षेत्र, २९.७८ लाख मेट्रीक टन उत्पादन व ३२५८ किलो प्रति हे. उत्पादकता आहे. हवामान ः मका उष्ण, समशीतोष्ण आणि शीत (थंड) अशा वेगवेगळ्या हवामानाशी समरस होणारे पीक आहे. मात्र, पीक वाढीच्या कोणत्याही काळात धुक्याचे हवामान मक्यास मानवत नाही. मका उगवणीसाठी १८ अंश सेल्सिअस तापमान योग्य असून त्यापेक्षा कमी तापमान असल्यास थंड आणि ओलसरपणामुळे अनेक रोगाचा प्रादूर्भाव होऊन उगवणीवर प्रतिकूल परिणाम होतो. मक्याची योग्य वाढ आणि विकासासाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान चांगले, परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ अंश सेल्सिअस) आहे, अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो. तसेच ३५ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते. परागीभवनाच्यावेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्यांचा विपरीत परिणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते. जमीन मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन चांगली. नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक फार चांगले येते. परंतु अधिक आम्ल (सामु ४-५पेक्षा कमी ) आणि चोपण अगर क्षारयुक्त (८.५ पेक्षा अधिक सामु) जमिनीत मका घेऊ नये. दलदलीची जमीनदेखील टाळावी. जमिनीचा सामु ६.५ ते ७.५ असावा. पूर्वमशागत उन्हाळ्यात जमिनीची खोल (१५ ते २० सें. मी.) नांगरट करावी. कुळवाच्या २-३ पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी. शेवटच्या पाळीच्या अगोदर २५ गाड्या शेणखत प्रति हेक्टरी पसरून द्यावे. जमिनीत चांगले मिसळावे. सुधारीत जाती मक्याच्या संमिश्र व संकरित जाती या स्थानिक जातीपेक्षा ६०-८० टक्के अधिक उत्पादन देणाऱ्या आहेत. महाराष्ट्रासाठी कालावधीप्रमाणे शिफारस केलेल्या संकरित आणि संमिश्र जाती ः करवीर, राजर्षी, पुसा अर्ली संकरित मका-१, पुसा अर्ली संकरित मका-२, पुसा अर्ली संकरित मका-३, प्रिया (मधुमका), विंग ऑरेंज (मधुमका), माधुरी (मधुमका), एनएससीएच-१२, एनके-६२४०, पीएससी-७०१, ९००-एम गोल्ड, एचक्युपीएम-१, एचक्युपीएम-५, एचक्युपीएम-७, पी-३५२२, बायो-९५४४, पीएस-६२१७ इ. पेरणीची वेळ खरीप हंगामात मक्याची लागवड जून महिन्यात मृग नक्षत्रावर पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर ताबडतोब करावी. खरिपातील पेरणीस उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. यामुळे रोपांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येते. पेरणीची पद्धत

  • उशिरा व मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या जातीसाठी ६० ते ७५ से. मी. अंतरावर मार्करच्या साह्याने ओळी आखून २० ते २५ से.मी. अंतरावर २ बिया ४ ते ५ सें.मी. खेाल टोकाव्यात. बियाणे मातीने झाकून घ्यावे.
  • लवकर तयार होणाऱ्या जातीसाठी दोन ओळीस ६० से.मी. व दोन रोपात २० सें.मी.अंतर ठेवून वरील प्रमाणे पेरणी करावी.
  • सरी वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला जातीपरत्वे अंतर ठेवून पेरणी करावी.
  • बियाण्याचे प्रमाण १५-२० किलो बियाणे प्रति हेक्टर पुरेसे. पेरणीपूर्वी थायरम २ ते २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. (करपा नियंत्रण) तसेच अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धक १५ ग्रॅम प्रति किलो बियाणास चोळल्यास उत्पादनात ५ टक्के वाढ होते. रासायनिक खत

  • उशिरा तयार होणाऱ्या जातीसाठी नत्र, स्फुरद व पालाश १२०:६०:६० किलो प्रति हेक्टर या प्रमाणात खत मात्रा द्यावी. त्यातील संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि ४० किलो नत्र पेरते वेळी द्यावे. उर्वरित नत्र ४० किलो पेरणीनंतर २० दिवसांनी आणि ४० किलो नत्र ४० ते ४५ दिवसांनी द्यावे.
  • खते पेरणीच्या वेळी ५-७ सें.मी.खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावीत. उभ्या पिकात नत्र मात्रा (युरिया) मका ओळीपासून १०-१२ सें.मी. अंतरावर द्यावी.
  • मध्यम, भारी व चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मक्याच्या अधिक उत्पादनासाठी व आर्थिक फायद्यासाठी ५ टन शेणखत, १५०:५०:५० किलो नत्र, स्फुरद व पालाश, ३० किलो गंधक, २० किलो झिंक सल्फेट द्यावे. पेरणीनंतर कायिक वाढ (४० ते ५० दिवसांनी)व फुलोरा येण्याच्या अवस्थेत (६० ते ७० दिवसांनी) लोह सल्फेट ( २ टक्के) या प्रमाणात दोन फवारण्या करण्याची शिफारस केलेली आहे.
  • विरळणी मका उगवणी नंतर ८-१० दिवसांनी एका ठिकाणावर एकच जोमदार रोप ठेवून विरळणी करावी. गरज भासल्यास खाडे भरून घ्यावेत. आंतरमशागत

  • कालावधी पेरणी नंतर १५ ते ३५ दिवसांपर्यंत तणांचे नियंत्रण करावे. त्यासाठी एक ते दोन खुरपण्या आणि कोळपण्या करून ताटांना आधारासाठी माती लावावी.
  • वाढती मजुरी व पाऊस अशा कारणाने कोळपणी शक्य न झाल्यास, पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी अट्रॅाझीन (५० टक्के) तणनाशक १ किलो ग्रॅम किंवा पेंडिमिथॅलीन १ लीटर प्रती हेक्टरी ५०० लीटर पाण्यात मिसळून जमिनीवर समप्रमाणात फवारावे. फवारणीनंतर १५-५० दिवसापर्यंत आंतरमशागत करू नये. त्यानंतर ६ आठवड्यांनी एक खुरपणी करावी.
  • अनियमित पावसाच्या भागात पाण्याचा ताण असलेल्या काळात थायोयुरीया ( ०.२ टक्के) २ ग्रॅम प्रती लीटर या प्रमाणे नर व मादी पीक फुलोऱ्यात येण्यापूर्वी फवारणी केल्यास उत्पादनात वाढ दिसून आलेली आहे.
  • पाणी व्यवस्थापन

  • मका पिकाची पाने रुंद व लांब असल्यामुळे बाष्पीभवन क्रियेद्वारे पानातून अधिक पाणी बाहेर टाकले जाते. परिणामी मका पिकास पाण्याची गरज जास्त असते. खरीप हंगामात निश्चित आणि विस्तृत पावसाचे प्रमाण असणाऱ्या भागात मका पीक जिरायतीखाली घेता येते. मका पीक पाण्याचा ताणास संपूर्ण पीक कालावधीत संवेदनशील आहे.
  • त्यातही खालील संवेदनशील अवस्थांमध्ये संरक्षित पाणी द्यावे.
  • पेरणीनंतर २० ते ४० दिवसांनी पीक वाढीची अवस्था, ४०-६० दिवसांनी पीक फुलोऱ्यात असताना आणि ७५-९५ दिवसानंतर पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत.
  • संपर्क : डॉ. एल. एन. जावळे, ९४२१०८५९४७ (गहु व मका पैदासकार, गहु व मका संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.) ------------- ॲग्रोवन टीप - केंद्रिय कृषी मंत्रालयाने २८ कीडनाशकांवर बंदीचा प्रस्ताव नुकताच आणलेला आहे. त्यात वरील लेखातील ॲट्राझीन व पेंडिमिथॅलीन ही तणनाशके आणि थायरम या बुरशीनाशकाचा समावेश आहे.या बंदीच्या प्रस्तावावर हरकती व सूचना मागवण्यासाठी ४५ दिवसाचा अवधी दिलेला आहे. त्यानंतरच बंदीचा निर्णय कायम होऊ शकतो.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

    Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

    Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

    Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

    Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

    SCROLL FOR NEXT