Agriculture IOT Technology
Agriculture IOT Technology Agrowon
टेक्नोवन

Agriculture IOT Technology : कृषी क्षेत्रात ‘आयओटी‘ तंत्रज्ञानाचा वापर

डॉ. सुनील गोरंटीवार

Agriculture Technology गेल्या चार वर्षांपासून आपण पाहात आहोत की, जेव्हा रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनचालकास निर्दिष्ट केलेला पथकर (टोल टॅक्स) (Toll Tax) द्यावयाचा असतो, तेव्हा सर्वसाधारणपणे खालील प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात.

• पथकर नाका (टोलनाका) जवळ आल्यावर वाहन विशिष्ट रांगेतून पथकर नाक्याच्या खिडकीजवळ थांबते.

• पथकर नाका खिडकी संचालक (टोल टॅक्स वसूल करणारी व्यक्ती) पथकर किती भरायचा याबाबतची पावती वाहन चालकास देतो.त्याप्रमाणे वाहन चालक पथकर खिडकी संचालकास रक्कम (पैसे) देतो.

• जर पावतीमध्ये नमूद केलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे दिले तर खिडकी संचालक उर्वरित रक्कम वाहन चालकास परत करतो.

• खिडकी संचालक एक विशिष्ट कळ (बटन) दाबतो. वाहनासमोरील स्वयंचलित दरवाजा उघडला जातो आणि चालक वाहन पुढे नेतो.

सध्याच्या काळात बऱ्याच पथकर नाक्यावर वाहन चालक पथकर नाका खिडकीसमोर वाहन काही सेकंदासाठी थांबवितो.वाहन चालकासमोरील स्वयंचलित दरवाजा उघडला जातो आणि वाहन चालक वाहन पुढे नेतो.

पुढील काळात भारतामध्ये आणि इतर काही देशात सध्या पथकर नाका नाही, खिडकी नाही,वाहन चालवीत राहायचे.याचा अर्थ असा नाही की वर नमूद केलेल्या प्रक्रियेमध्ये पथकर द्यावा लागत नाही, तो निर्दिष्ट केल्याप्रमाणे द्यावाच लागतो.

पण आपल्या लक्षात येईल की, पहिल्या नमूद केलेल्या प्रक्रियेद्वारे आपल्याला वाहन पथकर नाक्याजवळ लांब रांगेतून खिडकीपर्यंत न्यावे लागते. तसेच खिडकीमधील संचालकाशी पैशाची देवाणघेवाण करावी लागते.

यामध्ये वेळेचा बराच अपव्यय होतो (रांग लांब होण्याचे हे एक कारण सुद्धा आहे) वाहन रांगेत बराच काळ असल्यामुळे इंधनाचा अपव्यय व पर्यावरण सुद्धा दूषित होते.पथकर देण्यासाठी पैशाची देवाणघेवाण, त्यानंतर दरवाजा उघडणे इत्यादीमध्ये मानवी हस्तक्षेप असतो.

त्यामध्ये संवाद अंतर निर्माण झाल्यास होणारी चिडचिड व संघर्ष आपण पाहिला आहेच. लांब रांग तयार झाल्यास त्यापेक्षा कमी लांब रांगेत जाण्यासाठी वाहन चालकांची चढाओढ आणि त्याद्वारे काही काळ का होईना पण ठप्प होणारी वाहतूक आपण पाहिली आहे.

दुसऱ्या प्रक्रियेमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेद्वारे पथकर नाक्याच्या खिडकी जवळ सर्व प्रक्रिया (पथकर भरणे, दरवाजा उघडणे इत्यादी) स्वयंचलितपणे होतात.

त्यामुळे त्या जलद होतात. त्यामुळे ना रांग नाही, ना जादा इंधन, ना पर्यावरण दूषित, ना मानवी हस्तक्षेप व ना त्यामुळे पुढे होणाऱ्या इतर अनावश्यक बाबी.

पण हे कसे होते?

१) वाहनाच्या विंडोस्क्रीनवर फासटॅग (FASTag) किंवा तत्सम प्रणाली म्हणजेच विशिष्ट प्रकारचा संवेदक बसविलेला असतो.

२) फासटॅग बँकेच्या खात्याशी जोडलेला असतो.

३) वाहन पथकर नाक्याच्या खिडकीजवळ थांबल्यावर खिडकीजवळ असलेल्या स्कॅनर किंवा विशिष्ट उपकरणाद्वारे उत्सर्जित होत असलेल्या रेडिओ सिग्नलद्वारे फासटॅगचा ट्रान्सपांडर (विशिष्ट प्रकारचा संवेदक) सक्रिय होऊन त्याद्वारे वाहन प्रकार, वाहन नोंदणी क्रमांक, इलेक्ट्रॉनिक पेमेंट प्रणाली इत्यादीची माहिती स्कॅनरला पुरविले जाते.

त्याप्रमाणे निर्दिष्ट पथकर वाहन मालकाच्या बँकेच्या खात्यातून वळता केला जातो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दरवाजा आपोआप उघडल्या जातो.

वाहन पुढे गेल्यावर दरवाजा परत बंद होतो. ही सर्व प्रक्रिया स्वयंचलित असल्याने ती क्षणार्धात होते तसेच तिसऱ्या प्रक्रियेमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेद्वारे वाहनास कुठेही थांबायचे नाही.

वाहन रस्त्यातून जात असतानाच रस्त्यावर विशिष्ट ठिकाणी बसविलेल्या स्कॅनरद्वारे धावत्या वाहनावर बसविलेल्या फासटॅग सारख्या प्रणाली द्वारे ही प्रक्रिया स्वयंचलितपणे पूर्ण होते. यालाच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज' असे संबोधतात.

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज'चा वापर ः

आपल्या लक्षात आलेच असेल की, इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये वेगवेगळी साधने (वाहन, फासटॅग, संवेदक, स्कॅनर, दरवाजा, बँक खाते इत्यादी) आहेत. ती अंतरजालाच्या साह्याने एकमेकास जोडलेली आहे.

ही सर्व साधने विशिष्ट संगणकीय प्रणालीने दिलेल्या सूचनेप्रमाणे एकमेकांशी स्वतःच संवाद साधतात. निर्दिष्ट कार्य पूर्ण करतात. यामध्ये कुठेही मानवी हस्तक्षेप नाही. मानवी हस्तक्षेप असल्यामुळे वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण करायला स्वाभाविकच जो वेळ जातो त्याची बचत होते.

मानवाकडून नकळत होणाऱ्या चुकाही होत नाही. सर्व कार्य ही मशिनद्वारे होत असल्याने ती काटेकोरपणे सुद्धा होतात.

इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाद्वारे जग हे अधिकच जवळ आले आहे. वास्तव अंतर ही आता कुठलेही कार्य पूर्ण करायला मर्यादा नाही. किंबहुना संपूर्ण जग कवेत घेण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. दैनंदिन जीवनात सध्या संपूर्ण किंवा अंशतः आयओटीचा वापर सुरू झाला आहे.

उदाहरणार्थ,

• घरगुती वापराच्या गोष्टी जसे की आवश्यकतेप्रमाणे बंद चालू किंवा प्रकाश कमी जास्त करणारे दिवे, हवेची तीव्रता तसेच वातावरणातील गारवा कमी जास्त करणारी वातानुकूलित संयंत्रे (ही संयंत्रे किंवा गोष्टी गरजेप्रमाणे स्वयंचलित किंवा दूरस्थ चालू बंद करता येतात), घर/गॅरेजमधील दरवाजे स्वयंचलितपणे उघडणे अथवा बंद होणे, सीसीटीव्ही कॅमेरा, वॉशिंग मशिन, स्मार्ट टीव्ही इत्यादी.

• वैद्यकीय उपकरणे, बायोमेट्रिक सुरक्षा प्रणाली, वाहतूक नियंत्रण प्रणाली, औद्योगिक प्रणाली

• वित्तीय प्रणाली (बँकेच्या खात्यातून वेगवेगळ्या कार्यासाठी दिले जाणारे पेमेंट, वेगवेगळ्या प्रकारच्या कर देण्याच्या वित्तीय प्रणाली)

• नागरी पाणीपुरवठा नियंत्रण

• वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॅकिंग सिस्टीम, शॉपिंग मॉल मध्ये वापरण्यात येणारी बारकोड प्रणाली अशी अनेक उदाहरणे आहेत.

कृषी क्षेत्रात आयओटी तंत्रज्ञान ः

आयओटी तंत्रज्ञान हे कृषी क्षेत्रात वापरण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्तरावर संशोधन सुरू झाले आहे. काही शेतीविषयक कार्यासाठी आयओटी तंत्रज्ञान उपलब्ध सुद्धा आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे भारतीय कृषी संशोधन परिषद प्रायोजित राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या हवामान अद्ययावत शेती व पाणी व्यवस्थापन (CAAST Project) प्रकल्पाद्वारे आयओटीचा कृषीसाठी वापर यावर कार्य सुरू झाले आहे.

विशेषतः जल व्यवस्थापन संदर्भातील काही आयओटी संबंधित प्रणाली शेतकऱ्यास वापरण्यायोग्य विकसित झाल्या आहेत.

आयओटी तंत्रज्ञानाचे घटक ः

आयओटी म्हणजे वस्तूंचे आंतरजाळे. या तंत्रज्ञानात साहजिकच वेगवेगळ्या वस्तूंचा तसेच अंतरजाळे प्रणालीचा वापर होतो. त्या खालील प्रमाणे आहेत.

• वस्तू: संवेदक, नियंत्रक, ॲक्टिव्हेटर

• संगणकीय प्रणाली, निर्णय प्रक्रिया प्रणाली

• आंतरजाल, दळणवळण यंत्रणा

लेखांच्या पुढील भागांद्वारे आयओटी तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये वापरण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या विविध घटकांची, तसेच कृषी क्षेत्रामध्ये वापरण्यासाठी विकसित झालेल्या व विकसित करण्याचे येत असलेल्या विविध आयओटी प्रणालीची माहिती घेणार आहोत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT