गोपाल हागे
अकोला जिल्ह्यातील पारस (ता. बाळापूर) येथील विजयसिंग पवार (ViJaysingh Pawar) (वय ७० वर्षे) यांनी अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून मानवचलित यंत्रे (Human-driven machines) तयार केली आहेत. त्यांच्या पेरणी यंत्रानेखासगी स्पर्धेमध्ये पहिल्या दहामध्ये क्रमांक मिळवला आहे. सोबतच खाडे भरण्याचे यंत्र, को ळपणी यंत्र तयार केले आहे.
पारस (ता. बाळापूर, जि. अकोला) येथील विजयसिंग मोहनसिंग पवार यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आयटीआय किंवा पॉलिटेक्निक करण्याची इच्छा होती. मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शिकण्याऐवजी रोजंदारीवर कामाला सुरुवात केली. नंतर त्यांना गावातच पारस औष्णिक वीजनिर्मिती केंद्रामध्ये रोजंदारीवर बागकाम करू लागले. पुढे त्यांनी वर्कशॉपमध्ये फिटर व टर्नरचे काम शिकून घेतले. त्यामुळे कंपनीच्या वर्कशॉपमध्येच त्यांना कायमस्वरूपी नोकरीही लागली. ३१ मार्च २०१२ ला सेवानिवृत्त झाले.
आज त्यांच्या परिवारामध्ये पत्नी सौ. निर्मला, पंजाबसिंग, उदयसिंग आणि मधुसिंग अशी तीन मुले, तीन सुना व ६ नातवंडे आहेत. त्यामुळे आपल्या १०० गुंठे शेतीकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. या शेतीला बोअरवेल घेतले असून, १० गुंठे क्षेत्रामध्ये एक शेततळे केले आहे. त्यामुळे पुरेशी सिंचन व्यवस्था आहे. खरिपामध्ये त्यात कपाशी, सोयाबीन तर रब्बीमध्ये गहू, हरभरा अशी पारंपरिक पिके घेतात. त्यातील २० गुंठे क्षेत्रामध्ये कुटुंबाला लागणारा भाजीपाला ते पिकवतात. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. भाजीपाल्यामध्ये वेगवेगळ्या कामासाठी त्यांना वेगवेगळ्या अवजारे व यंत्राची गरज जाणवू लागली. मग आपल्या यांत्रिक ज्ञानाच्या बळावर येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली.
स्वतःचे वर्कशॉप उभारले
छोटी छोटी यंत्रे अवजारे बनविण्यासाठी इतरांवर अवलंबून राहणे त्यांना आवडेना. मग त्यांनी आवश्यक अशी काही साधने विशेषतः लेथ मशिन, ड्रिल मशिन, ग्राइंडर अशी यंत्रे जुनी नवी विकत घेण्यास सुरुवात केली. त्यातून त्याचे स्वतःचे छोटेसे वर्कशॉप उभे राहिले. भारतामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी असून, त्यांना बैल किंवा ट्रॅक्टर यासह मोठी यंत्रे व अवजारे ठेवणे किंवा वापरणे परवडत नाही. स्वतः अल्पभूधारक असल्यामुळे कल्पकतेने वेगवेगळी शेती उपयोगी मानवचलित यंत्रे, साधने व अवजारे बनविण्यास प्रारंभ केली.
त्यांनी मानवचलित एक बहुगुणी डवरणी यंत्र तयार केले. शेतात पेरणी झाल्यानंतर राहिलेल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी खाडे भरणी यंत्र बनवले. त्यानंतर त्यावर आधारित तीन फण असलेले, निर्धारित ओळीचे अंतर व निर्धारित अंतरावर बियांच्या पेरणीसाठी मानवचलित बहुगुणी पेरणी यंत्रही बनविले. त्यांची कल्पकता बघून बाळापूरचे तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने यांनी यंत्राची अचूकता वाढवण्यासाठी काही सूचना केल्या. त्यानुसार बदल करून चाचण्या घेतल्या. त्याची भाजीपाला उत्पादनातील धडपड पाहता कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेमार्फत त्यांना परसबागेतील भाजीपाला प्रात्यक्षिक देण्यात आले. आत्मा तालुका तंत्र अधिकारी व्ही. एम. शेगोकार व कृषी सहाय्यक प्रज्ञा अवचार यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
वैशिष्ट्यपूर्ण डवरणी (कोळपणी) यंत्र
पवार यांनी तयार केलेल्या डवरणी यंत्रामुळे जमिनीत खोल काकर (नाली) काढणे, पिकातील तणाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास कापणी करणे, परसबाग तयार करण्यासाठी वखरणी करणे, सऱ्या पाडून झाडाला भर देण्यासाठी वरंबा तयार करणे, इ. विविध प्रकारची कामे करता येतात.
खाडे भरण्याचे यंत्र
पेरणीनंतर पिकामध्ये खाडे भरण्यासाठीही त्यांनी छोटे यंत्र बनवले. शिवाय परस बागेत भाजीपाला बियाणे लागवडीसाठीही याचा वापर करता येतो.
पेरणीयंत्र
वैशिष्ट्यपूर्ण अशा मानवचलित बहुगुणी पेरणी यंत्राने बहुतांश सर्व प्रकारच्या बियाण्याची पेरणी करता येते. त्याला गरजेनुसार तीन किंवा चार फण लावून आवश्यक तितक्या अंतरावर ओळीत पेरणी करता येते. यामध्ये दोन झाडांतील अंतरही कमी जास्त करता येते. बियांची संख्या सुद्धा पिकाप्रमाणे कमी किंवा जास्त करणे शक्य होते. या यंत्राच्या साह्याने एक व्यक्ती प्रति दिन किमान दोन ते तीन एकरापर्यंत पेरणी करू शकतो. या पेरणी यंत्राला दोन चाके लावली आहेत. दोन्ही चाकांच्या ॲक्सलवर पोकळ असा ड्रम आडवा बसवलेला आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी छिद्रे केलेली आहेत. त्याला एकूण बारा रॉड लावता येतात. आपण १२ रॉड लावले तर बियाणे दर ३ इंचांवर पडते. जर ६ रॉड लावले तर बियाणे सहा इंचावर पडते.
अशा प्रकारे रॉडची संख्या कमी करत गेल्यास शेतकऱ्याला बियाणे ३-६-९-१२-१८-३६ इंच अंतरावर सोडता येते. याद्वारे पेरणीची व्यवस्था आहे. मोटारसायकलीच्या ब्रेक केबल या रॉडला जोडल्या आहेत. या केबलच्या दुसऱ्या टोकाचा संबंध बी ठेवलेल्या ड्रमशी जोडलेला आहे. ॲक्सल फिरतेवेळी सोबत रॉडही फिरतो आणि त्या वेळी ब्रेक वायरवर ताण पडून एक किंवा दोन बियाणे खाली पडते. यामध्ये बदल करण्यासाठी एक नट दिलेला आहे. हे यंत्र बनवण्यासाठी लोखंडी पाइप, लोखंडी अँगल, पीव्हीसी पाइप, मोटर सायकलची ब्रेक वायर, लोखंडाची दोन चाके इतक्या कमी साहित्याचा वापर केला आहे. हे पेरणी यंत्र अवघे १५ किलो वजनाचे असून, चाकांमुळे कुठेही ने आण करण्यास सोईस्कर होते. या यंत्राच्या निर्मितीला त्यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये विजया दशमीच्या मुहूर्तावर सुरुवात केली. ऑगस्ट २०२२रोजी त्यांचे काम पूर्ण झाले. या वैशिष्ट्यपूर्ण अशा पेरणी यंत्राच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला.
पेरणी यंत्रामुळे होणारे फायदे
या मानवचलित यंत्रामुळे मजुरी, बियाणे, खतांची बचत शक्य होते.
वेळेवर पेरणी करता येते.
ट्रॅक्टरच्या पेरणीपेक्षा खर्चात खूप बचत होते.
आवश्यकतेनुसार एका जागेवर कमी जास्त बिया टाकण्याची व्यवस्था करता येते.
हाताने केलेल्या टोकणीच्या तुलनेमध्ये झाडाच्या दोन ओळी व रोपातील अंतर योग्य व नियमित राहते.
क्षमतेनुसार तीन ते चार फाळ लावणे शक्य आहे. असे फाळ लावल्यास कामाचा वेग वाढतो.
या यंत्राद्वारे एका व्यक्तीकडून कपाशीची टोकण पारंपारिक पद्धतीपेक्षा दुप्पट ते तिप्पट होऊ शकते.
स्पर्धेत उतरल्यामुळे पेटंटसाठी झाली मदत : पेटंट करण्यासाठी धडपड सुरू असताना एका कंपनीचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यांनी पेटंट करण्यासाठी दीड लाखाचा खर्च सांगितला होता. मात्र ते पवार यांना शक्य नव्हते. मग त्याच ‘ब्रेनआयएसी आयपी सोल्यूशन कंपनीने भारतीय पातळीवरील यंत्राच्या निर्मितीची स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेमध्ये ८९ यंत्रनिर्मात्यांनी भाग घेतला होता. त्यामधील फक्त १९ यंत्रे दुसऱ्या फेरीत गेली. आणि त्यानंतर झालेल्या परिक्षणामध्ये आणखी ९ यंत्रे बाहेर पडली. पहिल्या १० यंत्रांना प्रमाणपत्रे देण्यात आली. आणि त्यांनी या यंत्राच्या मोफत पेटंट अर्ज करण्यासाठी मदत केली.
विजयसिंग मोहनसिंग पवार
८९९९३८१९७१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.