दुग्ध व्यवसायासाठी सौरऊर्जा तंत्रज्ञान
दुग्ध व्यवसायासाठी सौरऊर्जा तंत्रज्ञान 
टेक्नोवन

दुग्ध व्यवसायासाठी सौरऊर्जा तंत्रज्ञान

संतोष चोपडे, प्रशांत वासनिक

पारंपरिक ऊर्जेला अंशतः किंवा पूर्ण पर्याय म्हणून सौरऊर्जेचा वापर करून दूध प्रक्रिया व पदार्थ निर्मितीसाठी लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो अाणि व्यवसायात प्रगती साधता येते.

भारतीय दुग्ध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती उद्योग जलदगतीने वाढत अाहे, तसेच दूध उत्पादनाचा वृद्धीदर ४ टक्के आहे. १५५.५ दशलक्ष टन दूध उत्पादनासह भारताचा दूध उत्पादनात जगात प्रथम क्रमांक लागतो. जगाच्या एकूण दूध उत्पादनाच्या १८.५ टक्के उत्पादन भारतात होते. भारतातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण व बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांचा दूध व दुग्धजन्य पदार्थांकडे कल वाढत आह. २०२० मध्ये भारतातील दुधाची मागणी २०० दशलक्ष टन होईल व भारतीय दूध उद्योगाची प्रक्रिया क्षमता वाढेल. या वाढत्या क्षमतेमुळे या उद्योगातील ऊर्जेची मागणीसुद्धा वाढेल. कुठल्याही प्रक्रिया उद्योगात ऊर्जा अावश्‍यक बाब आहे व दूध प्रक्रिया उद्योग यास अपवाद नाही. प्रकिया उद्योगात जास्त खर्च हा ऊर्जेवर केला जातो. दूध प्रक्रियेसाठी उष्णता, रेफ्रिजरेशनसाठी विद्युत ऊर्जेची आवश्यकता असते. सध्या दूध उद्योगात ऊर्जेसाठी जीवाश्म इंधन जसे वीज, डिझेल, फर्नेस आॅईल, द्रवरूप पेट्रोलियम गॅस, कोळसा इ. पारंपरिक ऊर्जा स्राेताचा उपयोग होतो. दूध उद्योगात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक ऊर्जेऐवजी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उष्ण ऊर्जा व विद्युत निर्मिती प्रणालीचा वापर केला जाऊ शकतो.

पारंपरिक ऊर्जेचे स्राेत वापरण्यातील दोष

  • पारंपरिक ऊर्जेचा दर दिवसेंदिवस वाढत आहे.
  • पारंपरिक ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरण प्रदूषित होते.
  • पारंपरिक ऊर्जेचे स्राेत मर्यादित आहे.
  • ज्या प्रमाणात हे ऊर्जा स्राेत वापरले जात आहेत. त्यामुळे भविष्यात या ऊर्जेची उपलब्धता कमी होईल अाणि या ऊर्जेच्या दरामध्ये वृद्धी होणार अाहे.
  • सौर ऊर्जा ऊर्जेचा शाश्वत पर्याय

  • सौर ऊर्जा हा सूर्याकडून मिळणारा ऊर्जेचा अविरत स्राेत असून पर्यावरणासाठी अनुकूल आहे व पारंपरिक ऊर्जेपेक्षा याचा दर खूप कमी आहे.
  • भारतासारख्या उष्ण कटीबंधीय प्रदेशात जेथे सौर विकीरणाची सरासरी तीव्रता २०० मेगा वॅट प्रती स्क्वेअर किलोमीटर आहे तेथे सौर ऊर्जा हा पारंपरिक ऊर्जेचा शाश्वत पर्याय आहे.
  • मागील दशकात सौर ऊर्जा निर्मिती तंत्रज्ञानात झालेल्या संशोधनामुळे या प्रणालीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे भविष्यात सर्व उद्योगात सौर ऊर्जेचा वापर होईल.
  • दुग्ध व्यवसायात साैर ऊर्जेचा वापर डेअरीमध्ये प्रामुख्याने विद्युत अाणि उष्णता या दोन प्रकारच्या ऊर्जेचा वापर होतो. विद्युत ऊर्जेचा वापर प्रक्रिया संयंत्रे, मशिन्स, रेफ्रिजरेशन यंत्रणा, बल्ब व पंखे इत्यादी विद्युत चलित उपकरणे चालविण्यासाठी होतो तर उष्णतेचा वापर दूध प्रक्रियेसाठी, दुग्ध पदार्थ निर्मितीसाठी व संयत्रांच्या स्वच्छतेसाठी होतो.

    १) गरम पाणी व वाफ निर्मिती प्रणाली

  • डेअरीमध्ये दूध प्रक्रियेसाठी व दुग्धपदार्थ निर्मितीसाठी लागणारी उष्णता बाॅयलरद्वारे निर्माण केली जाते. त्यासाठी विविध प्रकारच्या इंधनाचा (लाकूड, डीझेल) वापर केला जातो.
  • या पारंपरिक प्रणालीऐवजी सौर ऊर्जेपासून उष्णता निर्मिती प्रणालीचा वापर करून वरील सर्व प्रकिया व पदार्थ तयार करता येतात.
  • यामुळे दूध प्रक्रिया व दुग्धपदार्थ निर्मितीवरील लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.
  • या प्रणालीचे सोलर कलेक्टर (ट्रफ कलेक्टर, डिश स्टर्लिंग, फे्रस्नेल रिफलेक्टर्स, सोलर पाॅवर टाॅवर), नियंत्रक पंप, पाणी साठवण टाकी, बॉयलर असे भाग अाहेत.
  • वरीलपैकी पॅराबोलिक ट्रफ कलेक्टरच्या साहाय्याने ३५०-४०० अंश सेल्सिअस तापमान वाढवता येते.
  • २) साैर विद्युत निर्मिती प्रणाली

  • विद्युत निर्मितीसाठी सौर ऊर्जेचा वापर करता येतो, त्यासाठी सोलर फोटोवोल्टेक प्रणालीचा प्रयोग केला जातो.
  • निर्मित विद्युत ऊर्जेचा वापर प्रक्रिया संयंत्रे, मशिन्स तसेच रेफ्रिरेजरेशन प्रणाली चालविण्यासाठी करता येते.
  • एकूण ऊर्जेच्या ४०-५० टक्के ऊर्जा ही केवळ रेफ्रिजरेशन यंत्रणेवर वापरली जाते, त्यामुळे ही यंत्रणा सौर ऊर्जा चलीत केली तरी ऊर्जेची मोठ्या प्रमाणात बचत होईल.
  • सोलर फोटोवोल्टेक प्रणालीचे सोलरफोटोवोल्टेक मोड्यूल, चार्ज नियंत्रक, बॅटरी अाणि विद्युत ऊर्जा वितरण प्रणाली हे मुख्य घटक आहेत. वरील चित्रामध्ये त्याची कार्यप्रणाली दाखविली आहे.
  • सध्या महाराष्ट्रातील नामवंत डेअरीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून दुधावर प्रक्रिया केली जाते. सौर ऊर्जा वापरून दुधाचे पाश्चरीकरण, क्रेट व कॅनची स्वच्छता व क्लिनिंग इन प्लेस या क्रिया केल्या जातात.
  • दूध पाश्चरीकरणासाठी (३५,००० लिटर प्रती दिवस) वापरल्या जाणाऱ्या १६० स्क्वेअर मीटर आकाराच्या यंत्रणेमुळे (औद्योगिक प्रक्रिया केंद्रित सौर यंत्रणा) प्रतिदिन ८०-१०० लिटर भट्टी तेलामध्ये बचत होते.
  • संपर्क ः संतोष चोपडे, ९०११७९९२६६ (दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT