Indian Politics
Indian Politics  Agrowon
संपादकीय

Indian Politics : पक्षनिष्ठा, विचारधारा लोप पावतेय!

सचिन होळकर

राजकारण हा भारतीयांच्या (Indian Politics) नसानसांत भिनलेला शब्द आहे. राजकारणाची सुरुवात कधी झाली हे निश्‍चित सांगता येणार नाही; कारण राजकारणाचा अर्थ फक्त निवडणूक, राजकीय पक्ष इथपर्यंत असत नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात राजकारण असते, प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक नात्यात कमी-अधिक प्रमाणात राजकारण सुरू असते. पण नात्यांमध्ये असणाऱ्या या डावपेचाला कोणी राजकारण म्हणत नाही. असो. हे राजकीय डावपेच काढून आपण जीवनाचा विचार करू शकत नाही.

निवडणुका, राजकीय पक्ष, मतभेद, विचारधारा, तत्त्व, निष्ठा हे सर्व शब्द आपल्या देशातील तरुणांच्या रक्तात भिनले आहेत, ते असणेही गैर नाही. कारण राजकीय पक्षांची निर्मिती काही विचारधारांवर झाली आहे. ती विचारधारा ज्यांना आवडते ते त्या पक्षात काम करणार, त्यावर देखील जनतेकडून लोकशाहीच्या माध्यमातून ती निवडण्याचे काम आपण करत असतो. त्यात बहुमताने निवडून येणारे पक्ष सत्तेत बसून देशावर राज्य करतात, मात्र ते मिळवण्यासाठी पडद्यामागची धडपड निश्‍चितच खेदजनक आहे असे मला वाटते. ज्या राजकीय पक्षात आपण काम करतो, त्या प्रत्येक पक्षाला स्वतःचे तत्त्वज्ञान, विचारधारा असते. ती मान्य असली तरच आपण तिथे यावे हा राजकीय संकेत आहे. मात्र सध्या देशात राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, उलथापालथ पाहता पक्षनिष्ठा, विचारधारा याचा काहीही संबंध दिसत नाही.

आजवर सर्व राजकीय पक्ष त्यांचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी हे सर्व राजकीय निवडणुका वगळता इतर सर्व वेळी समाजसेवेच्या आणि सामान्य जनतेच्या प्रश्‍नांवर एकत्र येऊन काम करताना आपण पाहत आलो आहे. एकमेकांबद्दल आदर, मान- सन्मान ठेवून काम करणे हे सकस राजकारणाचे लक्षण आहे. समाजाचा विकास व्हावा हा उद्देश प्रत्येकाच्या मनात असणे त्यासाठी आवाज उठवणे स्वाभाविक आहे आणि तोच खरा राजकीय पक्षांचा उद्देश आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून देशभरातील तसेच राज्याराज्यांतील राजकारणाची पातळी खालावली आहे. पक्ष विचारधारेवर चालतात की दडपशाहीवर, असा प्रश्‍न विचारण्याची वेळ आली आहे.

साम-दाम-दंड-भेद तंत्र वापरून, दडपशाही, चौकशा, सरकारी यंत्रणेचा गैरवापर, सत्तेचे आणि पैशाचे आमिष दाखवून विरोधी पक्षातील नेते, कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्याचा फंडा जो सध्या सुरू आहे तो या देशातील लोकशाहीला घातक आहे. हे सर्व प्रकार राजकीय तत्त्वांना मुरड घालून सुरू आहेत, आजवर ज्यांच्या विरोधात काम केले, ज्यांच्या विरोधात भाषणे केली, आरोप-प्रत्यारोप केले, उद्या त्यांच्यासोबत जाऊन काम करावे लागणे ही नेत्यांची मजबुरी असेल. मात्र हाडाच्या कार्यकर्त्यांची परवड सध्या राजकारणात सुरू आहे. नेमका झेंडा कोणाचा हातात घ्यायचा हा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात असला, तरी जड अंतःकरणाने तो स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो.

राजकीय पक्ष विचारधारेने स्वीकार करायचा असतो. बळजबरीने केलेला विवाहदेखील यशस्वी होत नाही, राजकारण तर फार दूरची बाब आहे. सत्ता आज आहे उद्या नसणार आहे. परंतु पक्ष आणि विचारधारा जिवंत राहणे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. कारण ज्या दिवशी देशातील राजकीय पक्षांवरचा जनतेचा विश्‍वास उडेल, त्या दिवशी लोकशाहीवरचा देखील विश्‍वास उडण्याची भीती निर्माण झाली आहे, आज सुलभ वाटणारी गोष्ट उद्यासाठी घातक ठरणार आहे, याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.

भ्रष्टाचारमुक्त राजकारण हे जवळपास मृगजळ आहे. ते होणे शक्य नाही. मात्र आपले राज्य, आपला देश प्रगतिपथावर नेण्यासाठी चांगल्या विचारधारा आणि कमीत कमी भ्रष्टाचारी माणसं सत्तेत बसवण्याची आवश्यकता आहे. याचा अर्थ भ्रष्टाचार करण्यास समर्थन आहे असे अजिबात नाही. या देशात ‘झिरो करप्शन’ची गरज आहे. मात्र केवळ गरज असून चालणार नाही, तर देशातील जनतेने देखील यासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे. भ्रष्टाचाराची सुरुवात मतदारांपासून होते आणि ती नेत्यांपर्यंत येऊन थांबते.

अगदी ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, शैक्षणिक संस्था आदी सर्वच निवडणुकांमध्ये पैशाचा महापूर वाहतो. इमानदार व्यक्तीकडे वाटण्यासाठी पैसे नसल्याने पैसे वाटणारा बेइमानसुद्धा निवडून येतो आणि सत्तेत बसतो. अशावेळी नंतर विकास न झाल्याने त्यांना दोष देणेही योग्य ठरत नाही. मतदारांनी पैसे वाटणाऱ्या व्यक्तीला मतदान करणे टाळले पाहिजे किंवा पैसे घेणे टाळले पाहिजे, तेव्हाच या देशात भ्रष्टाचारमुक्त सरकारे येतील आणि आपण पैशाच्या जोरावर निवडून येऊ शकतो, असा भ्रम ज्या नेत्यांच्या झाला आहे त्यांचा भ्रमनिरास होण्यास मदत होईल.

मी देखील एका राष्ट्रीय पक्षात काम करतो. पक्षांच्या धोरणात जर काही चुकत असेल, तर ते बोलण्याचे धाडस आपल्यात असणे, म्हणजे आपण योग्य ठिकाणी आहोत याची निशाणी आहे. आज काही पक्षांतील पदाधिकारी, नेते आपल्याच पक्षाच्या विरोधात बोलू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. यातून सकस राजकारणाचा जन्म कसा होईल, हा खरा प्रश्‍न आहे. तरुण पिढीने राजकारणात रस घ्यावा, असे मत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले होते. मात्र आज राजकीय पक्षात तरुणांची दडपशाही आणि घालमेल पाहता तरुण पिढीने या क्षेत्राकडे का वळावे, हा प्रश्‍न त्यांना पडत असेल. गेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्ष, विचारधारा या सर्व बाबी थट्टा- मस्करीच्या झाल्या आहेत. सोशल मीडियामधून यावर अनेक विनोद रोज बाहेर येतात. टीव्ही, वर्तमानपत्रातील दररोजच्या राजकीय बातम्या पाहिल्या, तर देशातील सामान्य जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न संपले की काय, असा भास निर्माण होऊ लागतो. माध्यमांनी फक्त राजकीय कव्हरेज करण्याचा ठरवलं आहे की काय, असा देखील प्रश्‍न उपस्थित होतो.

इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय, सीआयडी, न्यायालय, निवडणूक आयोग या सर्व संस्था स्वायत्त असणे देश हितासाठी गरजेचे आहे, मात्र आज चौकशीचा ससेमिरा लावून हवं तसं करता येतं हा संदेश जनतेत जात आहे, जो घातक आहे. राजकीय नेत्यांच्या शैक्षणिक संस्था, कारखाने इतर काही सहकारी संस्था असणे स्वाभाविक आहे. परंतु त्यांच्या चौकशा लावून ब्लॅकमेलिंग करणे योग्य नाही. भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेला त्यांचे काम करू देणे आवश्यक आहे. त्यांचा वापर करून त्यांचे राजकीय बाहुले बनवणे योग्य नाही. भ्रष्टाचारी नेता, पैसे घेऊन पक्ष बदलणारा, घोटाळेबाज नेत्यांना जनतेने घरी बसवावे. परंतु अगोदर जनतेने मतांसाठी पैसे घेणे थांबवणे

आवश्यक आहे. आजच्या तरुण पिढीने राजकारण क्षेत्राकडे बघताना सर्व पक्षांची विचारधारा, तत्त्व, आजवरची कामे डोळसपणे पाहणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्‍वास न ठेवता, तसेच पूर्वग्रह दूषित होऊन बघण्यापेक्षा उघड्या डोळ्यांनी आणि आपल्या सदसद्‍विवेक बुद्धीचा वापर करणे आवश्यक आहे. या देशात राजकीय पक्षावरची निष्ठा, तत्त्व, विचारधारा हीच भविष्यात काम येणार आहे यावर विश्‍वास ठेवून काम करणे आणि त्याचे जतन करणे आवश्यक आहे.

(लेखक राजकारण-समाजकारणाचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT