Future Agriculture Agrowon
संपादकीय

Future Agriculture : भविष्यातील शेतीचा वेध घेताना...

Challenges of Future Agriculture : माहिती तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचे जग आता आले आहे. देशातील भविष्यातील शेतीची आव्हाने पेलायची असतील तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीत वाढवावा लागेल.

विजय सुकळकर

Agriculture : वाढत्या नैसर्गिक आपत्ती आणि बदलते जागतिक वातावरण यामुळे संपूर्ण जग अन्नसुरक्षेसाठी चिंतीत आहे. कोरोना आपत्ती आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील सर्वच देशांनी आपल्या अन्नसुरक्षेवर लक्ष केंद्रित केले आहे. याचा जागतिक आयात-निर्यातीवरही परिणाम होऊन सर्वांनाच त्याचा फटका बसतोय.

आपल्या देशात तर मागील अनेक वर्षांपासून शेतीचे क्षेत्र घटत चालले आहे. त्यातच लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने त्याचा भार कमी होत असलेल्या शेती क्षेत्रावर पडतोय. दुष्काळ, अतिवृष्टी, वादळी पाऊस, अतिथंडी, वाढते उष्णतामान अशा आपत्तींनी शेतपिकांचे नुकसान वाढून उत्पादन घटत आहे.

हे असेच चालू राहिले तर २०५० मध्ये आपली अन्नसुरक्षा धोक्यात येणार, असा इशारा अनेक संस्थांनी दिला आहे. परंतु याकडे कोणीही गांभीर्याने पाहताना दिसत नाही. तंत्रज्ञान वापराबाबत बोलायचे झाले तर अजूनही आपण हरितक्रांतीतील तंत्रज्ञान वापरावर भर देतोय. आपले बहुतांश कृषी संशोधनही याच अंगाने होतेय. कृषी संशोधनावरील नगण्य खर्चाबाबत तर भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. मंगला राय यांनी नुकतीच चिंता व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे हरितक्रांतीतील संशोधन, तंत्रज्ञान वापराचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. शेतीमध्ये काम करायला कोणीही तयार नाही. मजूरटंचाई दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. यावर उपाय म्हणून यांत्रिकीकरण देशात आले. परंतु त्यातही म्हणावी तशी प्रगती आपल्याला साधता आली नसल्याने यांत्रिकीकरणातून अपेक्षित कामे होत नाहीत, शिवाय हे यांत्रिकीकरण शेतकऱ्यांना महागात पण पडतेय.

अशा एकंदर परिस्थितीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने भविष्यातील शेतीचा आंतरराष्ट्रीय परिषदेमार्फत वेध घेतला ते बरेच झाले. माहिती तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचे जग आता आले आहे. अनेक प्रगत देशांत यावर संशोधनात्मक काम होऊन त्याचा व्यावसायिक वापर पण सुरू झाला आहे.

आपल्या देशात मात्र अजूनही हे तंत्र संशोधनपातळीवर असून, वैद्यकशास्त्रासह शेतीमध्ये त्याचा अल्प वापर सुरू आहे. देशातील भविष्यातील शेतीची आव्हाने पेलायची असतील तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतीत वाढवावा लागेल. ड्रोन, सेन्सर्स, रोबोट ही पुढील काळातील अतिप्रगत शेतीची आयुधे असतील. त्यासाठी प्रथमतः त्यातील संशोधनावर भर द्यावा लागेल. हे संशोधन करताना आपल्या देशातील लहान लहान तुकड्यांत विभागत असलेली शेती, अल्प-अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे अर्थकारण, त्यांची पीक पद्धती या बाबीही विचारात घ्याव्या लागतील.

तसे न करता यांत्रिकीकरणासारखे बाहेर देशांतील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र जसेच्या तसे आपण स्वीकारले तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. ड्रोन, रोबोट या तंत्राचा शेतीत वापर वाढला तर मजूरटंचाईवर मात करता येईल. शिवाय कमीत कमी वेळात अचूक कामांतून उत्पादनवाढही साधेल.

शिवाय आयवोटी तंत्रज्ञानाद्वारे विविध उपकरणे जोडून एकाच वेळी अनेक कामे करता येतील. संरक्षित शेती, व्हर्टिकल फार्मिंग, मातीविना शेती या तंत्राचा देशात सध्या वापर होत असला तरी तो अधिक व्यापक करावा लागेल. हे करीत असताना यातील कुशल मनुष्यबळासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तसेच शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रे घेऊन त्यांचा प्रसार-प्रचार करावा लागेल.

महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारचे संशोधन तसेच संशोधन विस्तारास निधीचा तुटवडा भासू देऊ नये. असे झाले तरच आपल्या देशाची अन्नसुरक्षा भविष्यात अबाधित राहील, हे लक्षात घेतले
पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT