Sorghum
Sorghum Agrowon
संपादकीय

Jowar Sowing : ज्वारीचा घटता पेरा चिंताजनक

Team Agrowon

संपूर्ण जग २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य (Bharaḍadhānya) वर्ष म्हणून साजरे करीत आहे. या वर्षामध्ये भरडधान्यांची लागवड, उत्पादन, प्रक्रिया आणि आहारात वापर वाढविण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत.

अनेक भरडधान्यांचा पारंपरिक उत्पादक देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. देशात ज्वारी (Sorghum sowing), बाजरी, नाचणी (Ragi) या भरडधान्यांचे मोठ्या प्रमाणात तर वरई, सावा, राळा, कोदो, कुटकी यांचे विभागनिहाय कमी उत्पादन होते.

भरडधान्यांमध्ये वरचे स्थान असलेल्या ज्वारीचे आगार म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. देशातील एकूण ज्वारी क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. उत्पादनदेखील देशाच्या तुलनेत ५७ टक्के इतके आहे.

भारताने २०१८ हे ‘राष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे केले. महाराष्ट्रात तर हवामान बदलास पूरक शेती प्रकल्पांतर्गत ज्वारीसह इतरही भरडधान्यांना प्राधान्य दिले जात आहे. असे असताना राज्यात मागील काही वर्षांपासून रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे.

हाच ट्रेंड देशपातळीवर पण पाहायला मिळतो. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे पिकांचे वाढते नुकसान, कमी उत्पादकता आणि या ज्वारीला मिळणारा कमी दर हे क्षेत्र आणि उत्पादन घटी मागची प्रमुख कारणे आहेत.

मागील पावसाळ्यात अतिवृष्टीने राज्यात खरीप ज्वारीचे नुकसान केले तर पाऊस लांबल्यामुळे रब्बी ज्वारी पेरणी अडचणीत येऊन क्षेत्र घटले आहे. राज्यात या वर्षी रब्बीचे क्षेत्र वाढले, परंतु ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली आहे.

राज्यात रब्बी ज्वारी सरासरी १७ लाख ३७ हजार हेक्टरवर घेतली जात असताना या वर्षी मात्र आतापर्यंत १२ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रच या पिकाखाली आहे. राज्यातून खरीप हंगामातील ज्वारी नामशेष होत असताना रब्बी हंगामातील क्षेत्र घटत असेल, तर शेतकऱ्यांपासून ते सरकारपर्यंत याचे गांभीर्याने चिंतन व्हायला पाहिजेत.

आपल्या राज्याचे ज्वारी हे मुख्य पीक आणि ज्वारीची भाकरी हेच मुख्य अन्न. बदलत्या आहार शैलीत आपल्या ताटातून ज्वारीची भाकरी गायब होऊन त्याची जागा गव्हाच्या चपातीने घेतली आहे.

आता आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांकडून ज्वारीचा आहारात वापर वाढत असला तरी अजूनही ज्वारीला म्हणावी तशी मागणी नाही.

त्यामुळे ज्वारीला दरही कमीच मिळतोय. ज्वारी हे पीक परवडत नसल्याने हंगाम खरीप असो की रब्बी, शेतकरी ज्वारी सोडून इतर पिकांना प्राधान्य देत आहेत. ही वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल.

राज्यात ज्वारीचे क्षेत्र वाढवायचे असेल, तर या पिकाची उत्पादकता वाढवावी लागेल. ज्वारीचे उत्पादन वाढल्यानंतर दर कोसळू नयेत, ही काळजी घ्यावी लागेल.

आहारात ज्वारीच्या भाकरीचे प्रमाण वाढविण्यासाठी याच्या सेवनाचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे लागेल. ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात, हृदयासंबंधी आजारातही ज्वारी उपयुक्त आहे.

ज्वारीमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी होते. ज्वारीचे नवीन पौष्टिक वाण मुलं, महिलांचे कुपोषण कमी करण्यासही हातभार लावतात. ज्वारी सेवनाचे हे सर्व फायदे गावोगाव जाऊन लोकांना पटवून द्यावे लागतील.

ज्वारीपासून धान्याबरोबर जनावरांना चाराही मिळतो. ज्वारीपासून अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. ज्वारीच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना देश-विदेशांतून मागणी वाढत आहे.

गावातील बेरोजगार तरुण, महिलांना ज्वारीवरील प्रक्रियेचे प्रशिक्षण देऊन त्यांना या उद्योगात उतरविण्यासाठी आर्थिक मदतही करावी लागेल.

ज्वारीची प्रक्रिया आणि पोषणमूल्यातील श्रीमंती कळल्याशिवाय या पिकाला चांगले दिवस येणार नाहीत. अनेक विकसित देशांत ज्वारीचा वापर हा जैवइंधनासाठी देखील करीत आहेत.

जागतिक भरडधान्य वर्षाचे सूत्र हे अन्न, चारा व इंधन (फूड, फॉडर आणि फ्यूल) अशा तिन्ही पातळ्यांवर भरडधान्यांचा वापर वाढविणे हे देखील आहे. हे लक्षात घेऊन भारतातील ज्वारीसह इतरही भरडधान्ये जागतिक पातळीवर कशी पोहोचतील, हे पाहायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT