Soil Management
Soil Management Agrowon
संपादकीय

जमिनीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला

डॉ. भास्कर गायकवाड

डॉ. भास्कर गायकवाड

जमीन हा निसर्गातील सर्वांत महत्त्वाचा आणि श्रेष्ठ घटक आहे. कोणत्याही सजीवाची नवनिर्मिती जमिनीतून होते आणि शेवटही जमिनीवरच होतो. म्हणूनच सर्व सजीवांच्या जीवनचक्रामध्ये जमिनीला जास्त महत्त्व दिले जाते. सजीवांसाठी अन्न, वस्त्र आणि निवारा देण्याचे कार्य जमीन करते. म्हणूनच जमिनीचा उल्लेख माता म्हणून केला जातो. सजीवांना निरोगी जगण्यासाठी स्वच्छ हवा, पाणी आणि एकूणच पर्यावरण चांगले ठेवण्यासाठी जमिनीचा मोलाचा वाटा आहे. निसर्गातील सर्व सजीवांचे अवशेष आपल्या पोटामध्ये घेऊन त्यांच्यावर प्रक्रिया करून पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होऊ देत नाही. सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी जास्त झाल्यानंतर निसर्गातील तापमानाला नियंत्रण करण्याचे काम जमीनच करते.

पर्यावरणामध्ये पाण्याचे बाष्पीभवन होत असताना कोणतेही घातक द्रव्य व क्षार पर्यावरणात न पाठवता आपल्या शरीरातच ठेवून पर्यावरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा अनेक घटनांमध्ये जमिनीचा मोलाचा वाटा आहे. सर्व सजीव निसर्गातून जेवढा फायदा घेतात त्याच प्रमाणात निसर्गाची परत फेड करतात. मानव जात निसर्गाचा अनेक पटीने फायदा घेत असते म्हणूनच मानवावर निसर्ग रक्षणाची जास्त जबाबदारी आहे. परंतु आज मानवाच्या वाढत चाललेल्या गरजा आणि वाढलेल्या स्वार्थी स्वभावामुळे जमीन आणि पर्यावरणाची योग्य काळजी घेण्याचा विसर मानवाला पडत चालला आहे.

पर्यावरणातील वाढत चाललेल्या कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण, जमिनीची ढासळलेली प्रत आणि वृक्षांची कमी होत चाललेली संख्या यामुळे तापमानात वाढ होत आहे. जमिनीमध्ये २५ टक्के हवा, २५ टक्के पाणी, ४५ टक्के खनिजे आणि ५ टक्के सेंद्रिय पदार्थ असेल तर ती जमीन सर्वांत उत्तम मानली जाते. दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर वाढून सेंद्रिय खतांचा वापर कमी झाला. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी होऊन खनिजांचे प्रमाण वाढले. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असते त्या जमिनी स्पंजसारख्या असल्यामुळे त्याच्यावर पडलेला सूर्यप्रकाश शोषून घेऊन निसर्गातील तापमान नियंत्रित करण्यास मदत होते. परंतु सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी होऊन खनिजांचे प्रमाण वाढले. त्यामुळे जमिनी कडक-टणक झाल्या. त्यांच्यामध्ये सूर्यप्रकाश ग्रहणाची क्रिया कमी होऊन परावर्तित होण्याचे प्रमाण वाढले. क्षारयूक्त-खनीजयूक्त जमिनी वाढलेल्या सूर्यप्रकाशामुळे लवकर तापतात.

जमीन तापल्यानंतर तिला थंड होण्यासाठी जास्त वेळ लागतो. अशाप्रकारे पूर्ण जगामध्ये हवामानातील तापमान वाढत चालले आहे. बर्फाचे डोंगर वितळण्याची क्रिया वाढली आहे. तापमान वाढण्याचा वेग याचप्रमाणे राहिला तर बर्फाचे पाणी होऊन समुद्राची उंची वाढेल. पुढील पन्नास वर्षामध्ये अर्धी मुंबई समुद्राखाली असेल असे भाकीत करण्यात आले आहे ते याचमुळे. जमिनीची सूर्यप्रकाश शोषून घेण्याची क्षमता वाढविल्याशिवाय पर्यावरणातील तापमान कमी होणार नाही म्हणूनच जमिनीची योग्य काळजी घेऊन जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढविणे, जमिनीवर सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन करणे, वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड करणे यासारखी कामे मानवाला करावी लागणार आहेत. अन्यथा आज मानवाप्रमाणे सर्वच सजीवांच्या शरीराची उष्णतेमुळे लाहीलाही होत असताना एक दिवस खरोखरच लाही होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

निसर्गामध्ये जन्म-मृत्यू या सजीवांच्या जीवनातील अटळ घटना सतत चालू असतात. मानव, प्राणी, वनस्पती, सूक्ष्म जीव-जीवाणू या सर्व सजीवांच्या जन्माबरोबरच मृत्यू ही घटना अटळ असते. कोणत्याही सजीवातील आत्मा (जीव) नष्ट झाल्यानंतर तो निर्जीव होतो व त्याची कुजण्याची क्रिया चालू होते. त्याचे शरीर कुजून ते नष्ट होऊन जमिनीत मिसळले जाते. परंतु या घटनेच्या अंतरंगामध्ये डोकावून बघितले तर त्यातील अनेक महत्त्वाच्या घटना लक्षात येतील. कुजण्याची क्रियाच नसती तर या सर्व सजीवांच्या शरीरामुळे पर्यावरणाचे किती प्रदूषण झाले असते.

पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी कुजण्याची क्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. या कुजणाच्या क्रियेमध्ये जमिनीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. निर्जीव जमिनीमध्ये कुजण्याची क्रिया होत नाही. कारण ज्या जमिनीत जीव जिवाणू, गांडुळे व इतर भूचर प्राणी आहेत, तेथेच कुजण्याची क्रिया चालते. म्हणजेच सजीव जमीन आणि सजीवांचे अवशेष कुजण्याची क्रिया यांचा जवळचा संबंध आहे. कोणत्याही सजीवांचे अवशेष जमिनीवर किंवा जमिनीत मिसळले तर जमिनीतील हा फौजफाटा लगेच कामाला लागून ते कुजवून पर्यावरण स्वच्छ ठेवतो. तसेच त्यापासून घातक घटकांचे रूपांतर पिकाला-जमिनीला आवश्यक असलेल्या उपयुक्त अन्नद्रव्यामध्ये करतात. ही सर्व प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने चालू असते. त्यासाठी मानवाला खर्च करावा लागत नाही किंवा वेळ देऊन नियोजन करून कामही करून घ्यावे लागत नाही. परंतु मानवाने निसर्गामध्ये जास्त ढवळाढवळ केल्यामुळे या प्रक्रियेत बाधा येऊन निसर्गाचे संतुलन बिघडले आहे.

पाणी ज्याला जीवन म्हटले जाते त्याची गरजेनुसार उपलब्धता करून देण्याचे काम जमीन करत असते. अत्यंत कमी कालावधीत पडलेला पाऊस आपल्या पोटामध्ये साठवून ठेवून सजीवांच्या गरजेनुसार उपलब्ध करून देण्याचे मोठे कार्य जमीन करत असते. कोणालाही शक्य होणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा जमीन करून ठेवत असते. पाणी नसेल तर सजीव जगूच शकत नाही. त्यामुळे जमिनीचे हे काम फारच अमूल्य आहे. जमिनीमध्ये पाणी मुरविणे आणि त्याचा साठा करून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यप्रणाली आहे. या कार्यप्रणाली पद्धतीला चालना देऊन त्याचे रक्षण करून जमिनीतील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे मानवाचे कार्य आहे. जमिनीतील पाण्याचे दोन कार्य आहेत. जमिनीच्या वरच्या थरातील पाणी सजीवांच्या जीवनासाठी उपलब्ध असते तर खालच्या थरातील पाणी पर्यावरणातील तापमान नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त असते. परंतु आधुनिकीकरणाच्या आहारी गेलेला मानव ४००-५०० फूट किंबहुना त्यापेक्षा जास्त खोलवर गेलेले पाणी बोअर घेऊन उपसा करतो. त्यामुळे जमिनीतील रेडिएटर मधील पाणी कमी होऊन तापमान वाढण्यावर त्याचा परिणाम होतो.

पाण्याचा उपसा होत असताना पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम मात्र मानवाने थांबविले आहे. गांडुळासारखा प्राणी जमिनीच्या भूपृष्ठामध्ये आपली बिळे करून जमिनीची चाळण करतो. पडलेला पाऊस या चाळणीसारख्या जमिनीत सहज मुरतो. तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थ पाणी साठवून ठेवतो. आजच्या शेती पद्धतीमध्ये सेंद्रिय पदार्थाला पूर्णपणे मूठमाती दिल्यामुळे व रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे गांडुळे मेली, जमिनीची चाळण होण्याची क्रिया बंद झाली, जलधारण क्षमता कमी झाली. त्यामुळे जमिनीत पाणी पुनर्भरणाची क्रिया मंदावली. याचा अनिष्ट परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर झालेला आहे. म्हणूनच पाणी पुरवठा करण्यासाठी निसर्गाने तयार केलेल्या जमिनीतील यंत्रणा नष्ट करण्याऐवजी तिचे संवर्धन करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
जमिनीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. जमिनीला फक्त उत्पन्न देणारी यंत्रणा एवढ्या पुरताच विचार न करता निसर्गातील प्रत्येक घटनेमध्ये जमिनीचा मोलाचा वाटा आहे याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Lok Sabha Elections : चुरशीने मतदान; सकाळी ९ पर्यंत कोल्हापूर ८.०४ टक्के तर हातकणंगले ७.५५ टक्के मतदानाची नोंद

Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT