agrowon editorial
agrowon editorial 
संपादकीय

झळाळी पिवळ्या सोन्याची!

विजय सुकळकर

मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक अगदी प्राचीन  काळापासून घेतले जाते. कापसात देशी, सुधारीत, संकरीत आणि आता जनुकीय सुधारीत (बीटी) अशा प्रकारे जातींचा विकास झाला. सर्वच कापूस जातींच्या विकासकाळात शेतकऱ्यांनी उत्पादनात अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, काळ्या मातीतील या पांढऱ्या सोन्याने शेतकऱ्यांचे दारिद्र्य काही दूर झाले नाही. उलट कापूस उत्पादक दिवसेंदिवस आर्थिक संकटाच्या खाईतच लोटला जात आहे. दरम्यान मागील दोन-अडीच दशकांत मराठवाडा, विदर्भात सोयाबीनच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. सुरवातीच्या काळात या पिकाचा कमी उत्पादनखर्च अन् मिळणाऱ्या बऱ्यापैकी उत्पादनामुळे यास मॅजिक बीन, गोल्डन बीन असे संबोधले जाऊ लागले. मात्र मागील चार-पाच वर्षांपासूनच्या बदलत्या हवामान काळात या पिकांचे नुकसान वाढले, उत्पादकता घटली आहे. अपेक्षित दरही मिळत नाहीत. त्यामुळे गोल्डन बीन सुद्धा शेतकऱ्यांना किफायतशीर ठरताना दिसत नाही.

अशा एकंदरीतच परिस्थितीमध्ये मागील सुमारे दशकभरापासून मराठवाडा, विदर्भात हळदीचे क्षेत्र वाढतेय. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत हळदीखालील क्षेत्र अधिक असून यांच्या शेजारील यवतमाळ, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांतही बऱ्यापैकी लागवड वाढत आहे. वसमत (जि. हिंगोली) येथून नुकतीच २०० टन हळद बांगला देशला निर्यात झाली आहे. या भागातून हळद निर्यातीचे स्वागत करताना नव्याने रुजत असलेल्या या पिकाचेही कापूस अथवा सोयाबीनसारखे हाल होऊ नये, एवढीच अपेक्षा!

इतर हंगामी पिकांच्या तुलनेत हळदीचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान कमी होते. हळदीची लागवड आणि काढणी या दोन्हीसाठी शेतकऱ्यांना खूप वेळ मिळतो. शेतकरी १५ मे ते ३० जूनपर्यंत हळदीची लागवड तर फेब्रुवारी ते मेपर्यंत काढणी करु शकतात. असे इतर हंगामी पिकांच्या बाबतीत करता येत नाही. कापूस, सोयाबीनसह इतरही सर्वच हंगामी पिकांचे वन्यप्राणी खूप नुकसान करतात. हळदीला मात्र कोणताही वन्यप्राणी नुकसान करीत नाही. अशा काही कारणांमुळे मराठवाडा, विदर्भात हळदीची लागवड वाढत आहे. असे असले तरी सांगली-सातारा जिल्ह्यांपेक्षा या भागात हळदीचे एकरी उत्पादन खूप कमी मिळते. योग्य नियोजनातून हळदीच्या उत्पादनात एकरी १० ते १५ क्विंटलपर्यंत वाढ होऊ शकते. चांगल्या वाणांचे दर्जेदार बेणे तसेच प्रगत लागवड तंत्राचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये व्हायला पाहिजे. हळदीमध्ये उत्पादकता वाढीसाठी सेंद्रिय घटक महत्वाचे ठरत असताना या घटकांची वानवा विदर्भ, मराठवाड्यात दिसून येते. यात लागवडीपासून ते काढणी-पॉलिश करण्यापर्यंत आधुनिक यंत्रांचा वापरही वाढवायला पाहिजे.

मसाल्याचे पीक म्हणून हळदीचा आहारात मोठ्या प्रमाणात वापर होतो. औषधी आणि सौदर्य प्रसाधने उद्योगातही हळदीचा वापर वाढतच आहे. त्यामुळे हळदीला देशांतर्गत तसेच विदेशी बाजारातून मागणी वाढत आहे. हळदीवर योग्य प्रक्रिया करुन त्याचे व्यवस्थित मार्केटिंग झाल्यास उत्पादकांसाठी ते पिवळे सोने ठरु शकते. या बाबींची नोंद हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास गटाने घ्यायला हवी. सुदैवाने या गटाचे अध्यक्ष याच भागातील खासदार हेमंत पाटील असल्याने त्यांनी हळद लागवडीपासून ते प्रक्रिया-निर्यातीपर्यंतच्या चांगल्या सोयीसुविधा शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना कशा मिळतील, ते पाहायला हवे. हिंगोली जिल्ह्यातील गोदा फार्म तसेच सूर्या या शेतकरी उत्पादक कंपन्या स्थानिक पातळीवर हळदीच्या खरेदीपासून ते निर्यातीपर्यंत चांगले काम करताहेत. या भागातील हळद देश-विदेशात गेली तर उत्पादकांना चांगला दर मिळू शकतो. असे झाले तरच या पिवळ्या सोन्याची झळाळी कधीही कमी होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT