agrowon editorial
agrowon editorial 
संपादकीय

लॉकडाउनचा निर्णय विचारपूर्वकच हवा

विजय सुकळकर

लॉकडाउन शिथील केल्यानंतर गेल्या काही दिवसांत वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता या विषाणूची साखळी तोडण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांसह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये १३ जुलैच्‍या मध्यरात्रीपासून १० दिवसाच्या लॉकडाउनचा निर्णय पुन्हा घेतला आहे. या भागात पहिले पाच दिवस तर केवळ दूध, औषधे आणि वृत्तपत्रे विक्री सुरु राहणार असून भाजीपाल्यासह किराणा दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. लॉकडाउनचा हा निर्णय घाईगडबडीत घेतला गेला असल्याने त्यावर व्यापाऱ्यांच्या संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील लॉकडानमध्ये गावी गेलेले राज्यातील तसेच परराज्यातील हातावर पोट असणारे अनेक कामगार, मजूर नुकतेच पुणे-ठाणे-मुंबईत येऊन दाखल झाले होते. त्यांना पुन्हा १० ते १५ दिवस घरातच बसून राहण्याशिवाय आता पर्याय नाही. पुण्याबरोबर ठाणे, मुंबई या शहरांबरोबर नांदेड जिल्ह्यातही लॉकडाउन सुरु आहे. सध्याच्या लॉकडाउनमुळे या शहरांना लागून असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर फळे-भाजीपाला फेकून देण्याचीच वेळ आली आहे. यात त्यांचे दररोज कोट्यवधींचे थेट नुकसान होत आहे. 

मोठ्या शहरांमधील बहुतांश लोकांची क्रयशक्ती चांगली असल्याने ते दररोज ताजा फळे-भाजीपाला खरेदी करतात. अशा शहरांत मोठ्या प्रमाणात फळे-भाजीपाल्याचा खपही होत असतो. ग्रामीण भागातील लोकांची क्रयशक्ती कमी असल्याने तेथे या शेतमालाची फारशी विक्री होत नाही. विशेष म्हणजे फळे-भाजीपाला हा नाशिवंत शेतमाल असल्याने दररोज तोडणी करूनच त्याची विक्री करावी लागते. अशावेळी आठ-दहा दिवसांच्या लॉकडाउनने या काळातील शेतमाला नाश होऊन आर्थिक फटका तर शेतकऱ्यांना बसतोच परंतू त्यांचे पुढील लागवडीचे पूर्ण नियोजनही कोसळते. त्यामुळे लॉकडाउनचा निर्णय घेताना आणि त्यात फळे-भाजीपाला विक्री बंद ठेवताना संबंधित जिल्हा प्रशासनाने कृषी तसेच पणन खात्यालाही विश्वासात घ्यायला हवे. खरे तर बाजार समित्या, मंडई, खासगी बाजार हे सर्व बंद ठेवताना शेतकऱ्यांना शहरांत थेट फळे-भाजीपाला विक्रीस (अर्थात कोरोना संसर्ग टाळण्याबाबतची सर्वोतोपरी काळजी घेत) परवानगी दिली असती तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळले असते. 

देशात कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांच्या जवळ तर राज्यात हा आकडा दोन लाख ७५ हजारांवर जाऊन पोचलाय. देशात दररोज २८ ते ३० हजार तर राज्यात पाच ते सहा हजार नवीन रुग्णांची भर पडतेय. हा सामूहीक संसर्गच आहे. ही सगळी सरकारी आकडेवारी आहे. त्यातच आपल्या देशात, राज्यात अत्यंत कमी प्रमाणातील चाचण्यांवर आधारीत आहे. जसजशा चाचण्या वाढतील कोरोना बाधितांची संख्या वाढणार आहे. असे असताना देशात अजूनही सामूहीक संसर्ग होत नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ, हर्ष वर्धन करताहेत. अधिक दुर्दैवी बाब म्हणजे सध्यातरी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाउन हाच उपाय आपल्याकडे आहे. शेतकरी, व्यापारी वर्गाचे होणारे नुकसान आणि कामगार, मजुरांच्या हालअपेष्टा पाहता लॉकडाउन हा ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ ठरतोय. कोरोनाचा सामूहीक संसर्ग जेंव्हा होतो, त्यावेळी लॉकडाउन प्रभावी ठरत नाही. त्याचा प्रत्यय पुण्यात येऊ लागलाय. लॉकडाननंतरच्या दुसऱ्या दिवशी (बुधवार) आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ पुण्यात आढळून आली आहे. लॉकडाउन नव्हते तेव्हा पुण्यात दररोज ५०० ते ६०० कोरोना रुण्गवाढ होती. लॉकडाउननंतर बुधवारला एकाच दिवशी पुण्यात १४१६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर येथून पुढे तरी लॉकडाउनचा निर्णय विचार पूर्वक घेण्यात यायला हवा. यात शेतकऱ्यांसह कोणचेही नुकसान होणार नाही ही काळजी घेतली गेली पाहिजे. कोरोनाशी समर्थपणे लढा देण्यासाठी प्रतिबंधात्मक (लस) आणि नियंत्रणात्मक (प्रभावी औषधे) उपायांवर काम व्हायला पाहीजे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT