agrowon editorial
agrowon editorial 
संपादकीय

संकट टळले, की वाढले?

विजय सुकळकर

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या झालेल्या पुनरागमनामुळे दुबार पेरणीचे संकट टळले, असा दावा कृषी विभागाने नुकताच केला आहे. अशा दाव्याच्या चार दिवसांपूर्वीच पेरणीच नाही तर पीकविमा कशाचा काढू, असा सवाल अकोला जिल्‍ह्यातील अनेक शेतकरी विचारत होते. या जिल्ह्यातील काही भागांत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली नव्हती. जूनअखेरपर्यंत पावसाने ओढ दिल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यांत शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. तर थोड्याफार पावसावर पेरणी केल्यानंतर पावसाने दिलेल्या उघडिपीने राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी तर अंकुर फुटलेली रोपे कोमेजल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले असून त्यासाठी मदतीची मागणी सुद्धा केली आहे. मागील दोन दिवसांपासून कोकणसह विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्‍ह्यांत मुसळधार पाऊस अतिवृष्टीने दाणादाण उडवून दिली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. नांदेड जिल्‍ह्यातील ३२ मंडळांत अतिवृष्टीच्या तडाख्याने पिकेच नाही, तर शेतातील माती देखील खरवडून गेली आहे. अधिक गंभीर बाब म्हणजे पुढील चार-पाच दिवस राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग मुंबई यांच्या सूचनेनुसार काही जिल्ह्यांत जिल्हा प्रशासनाने अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेने सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अतिमुसळधार पावसाने पेरणी झालेल्या क्षेत्रात पिकांचे नुकसान वाढू शकते. त्यामुळे आधी उघडिपीने आणि आता अतिवृष्टीने दुबार पेरणीचे संकट टळले नाही, तर वाढले आहे.

प्रत्यक्ष पेरणीचे क्षेत्र आणि कृषी विभागाचे पीकनिहाय पेरणीची आकडेवारी यात दरवर्षीच मोठी तफावत असते. कृषी, महसूल आणि ग्रामविकास अशा तिन्ही विभागांचे कर्मचारी गावपातळीवर असतात. असे असताना पेरणीची अचूक आकडेवारी कृषी विभागाकडे नसते. गावनिहाय पीकपेऱ्याच्या आधारे गोळा केलेल्या माहितीवरून पेरणीची आकडेवारी सांगितली जाते आणि पीकपेरे कसे लिहितात, याची जाण आपणा सर्वांना आहेच. ५ जुलैपर्यंत मका, ज्वारी, बाजरी या पिकांचा पेरा सरासरी क्षेत्राच्या ५० ते ६० टक्केच आहे. भात, तूर, उडीद, सोयाबीन या पिकांचा पेरा ९० टक्क्यांवर, तर कापसाचा पेरा ८० टक्क्यांवर आहे. तूर, मूग, उडीद राज्यात बहुतांश करून आंतरपीक म्हणून घेतात. पावसाच्या खंडात उडीद, मूग घेणे शेतकऱ्यांनी टाळले आणि भाताच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. अशावेळी या सर्व पिकांच्या पेरणीच्या आकडेवारीबाबत शंका येते.

कृषी विभागाने ढोबळमानाने दुबार पेरणीचे संकट टळले, असे मत व्यक्त करण्यापेक्षा आतापर्यंत लांबलेल्या पेरण्या, दुबार पेरण्या आणि आता अतिवृष्टीने झालेले, होणारे पिकांचे नुकसान याचा वास्तववादी आढावा घ्यायला हवा. या आढाव्यावरून राज्यभरातील शेतकऱ्यांना नेमके मार्गदर्शन करावे. यासाठी त्यांनी विभागनिहाय असलेली कृषी विद्यापीठे, जिल्हानिहाय असलेली कृषी विज्ञान केंद्रे यांच्या सहकार्याने नापेर अथवा दुबार पेरणीच्या क्षेत्रात आता नेमकी कोणती पिके घेता येतील तसेच या सर्व दिव्यांतून वाचलेल्या पिकांची नेमकी काळजी कशी घ्यायची याबाबत जिल्हा-तालुकानिहाय सल्ला शेतकऱ्यांना द्यायला हवा. महत्त्वाचे म्हणजे जेथे पेरण्या लांबल्या, दुबार पेरण्या कराव्या लागल्या तसेच सध्याच्या  अतिवृष्टीत पीक हातचे गेले असल्यास राज्य शासनाने तत्काळ आर्थिक मदत करायला हवी. असे केले तरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT