agrowon editorial
agrowon editorial 
संपादकीय

समुद्र, सौंदर्य अन् समृद्धी

विजय सुकळकर

को कणातील मालवण येथील समुद्रात असलेल्या आंग्रिया बॅंक या प्रवाळ बेटाचा १६ शास्त्रज्ञांकडून सागरी मोहिमेद्वारा अभ्यास होणार आहे. खरेतर जागतिक पातळीवर १९६० च्या दशकापासून प्रवाळ बेटांचे सर्वेक्षण आणि अभ्यास केला जातोय. समुद्राचे वाढते प्रदूषण, समुद्राच्या पाण्याचे वाढत असलेले तापमान, कार्बन डाय-ऑक्साईड वायूचे वाढते उत्सर्जन, मॅंग्रूव्ह वनांची होत असलेली तोड अशा अनेक कारणांमुळे प्रवाळ बेटे नष्ट होत आहेत. वातावरणातील वेगाने होत असलेल्या बदलामुळे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कॅरिबियन समुद्र व ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरिअर रिफमधील प्रवाळ बेटे २०५० पर्यंत नष्ट होतील, असा इशारा दशकभरापूर्वी ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ने (आयपीपीसी) दिला आहे. त्यामुळे प्रवाळ बेटे वाचविण्यासाठी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कोलंबिया या देशांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या देशातही लक्षद्वीप, कच्छ, अंदमान-निकोबार बेटे आणि कोकणातील समुद्रात प्रवाळ बेटे आहेत. यामध्ये कोकणातील विजयदुर्गच्या पश्चिमेला समुद्रात २० मीटर खोलीवर असलेले आंग्रिया बॅंक नावाचे प्रवाळ बेट संशोधनाच्या पातळीवर दुर्लक्षितच म्हणावे लागेल. या बेटावर गोव्याच्या राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेमार्फत संशोधनाचे काम सुरू असते. परंतु पर्यावरण बदलाचा या प्रवाळ बेटावर नेमका काय परिणाम झाला, तसेच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या बेटाचा विकास कसा करता येईल, यावर आत्तापर्यंत फारसे काम झाले  नाही, त्यामुळे आता हे काम केंद्र सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या संशोधन मोहिमेद्वारे व्हायला हवे.  

वातावरणातील बदलाचा प्रवाळ बेटांवर व त्यातील प्रवाळ जीवाणूंवर प्रतिकूल परिणाम होत आहे. प्रवाळांमध्ये अब्जावधी प्रवाळ कीटक असतात. या प्रवाळांची रचना अतिशय गुंतागुंतीची असते. सळसळते, रंगबिरंगी, सुंदर प्रवाळ लक्ष वेधून घेणारी अशी असतात. काही प्रवाळांचा आयुर्वेदिक औषधांमध्ये उपयोग होतो. अनेक स्थानिक माशांच्या प्रजातींचे प्रजनन प्रवाळ बेटांमध्ये होते. तसेच, इतर समुद्र जीवसृष्टीसाठी प्रवाळ बेटे आश्रयापासून ते अन्नापर्यंत अशा अनेक अंगांनी उपयुक्त असतात. त्यामुळेच समुद्र जीवसृष्टीसाठी प्रवाळ बेटे जीवदानच म्हणावी लागतील. प्रवाळ बेटांची उपयुक्तता एवढ्यापुरतीच सीमित नाही, तर ते समुद्रकिनारे सुरक्षित ठेवण्यासाठीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. समुद्रात भरती-ओहोटीच्या वेळी अनेक लाटा निर्माण होतात. परिणामी समुद्रकाठची  झीज होते. समुद्राच्या पृष्ठभागावर रेलून वाढणाऱ्या प्रवाळांमुळे वादळांना, मोठ्या लाटांना अटकाव होतो, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील अनेक गावांना त्यांचा तडाखा बसत नाही. त्यामुळेच प्रवाळ बेटांचे संवर्धन झालेच पाहिजे. 

आंग्रिया बॅंक हे एक बुडालेले कंकणाकृती प्रवाळ बेट असून जगातील सर्वांत मोठा प्रवाळ साठा तिथे असावा, असा अनेक संशोधकांचा अंदाज आहे. आंग्रिया बॅंकवर जिथे वाळू आणि शिंपल्यांचा थर आहे, तिथेच प्रवाळांची चांगली वाढ झालेली आहे. या भागात विविध प्रकारच्या प्रवाळीय वनस्पती व प्राणी आढळतात. स्थलांतर करून येणाऱ्या १० ते १५ फूट लांबीच्या व्हेल्स आणि सार्क व्हेल्स जमा होण्याचे हे मुख्य ठिकाण आहे. आत्ता हाती घेतलेल्या संशोधन मोहिमेतून या प्रवाळ बेटांबाबतची सर्व रहस्ये उघड व्हायला हवीत. असे झाले तर आंग्रिया बॅंक जगातले सर्वोत्तम सागरी पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येऊ शकते. पर्यटन केंद्र विकसित करताना या प्रवाळ बेटात दडून असलेल्या जैवविविधतेच्या खजिन्याचे संवर्धनही होईल, हे पाहावे लागेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT