agrowon editorial
agrowon editorial 
संपादकीय

देर आए दुरुस्त आए

विजय सुकळकर

जीआय (जिओग्राफिकल इंडिकेशन) अर्थात ‘भौगोलिक मानांकन’बाबत देशात कोणीच गंभीर दिसत नाही. त्यामुळे यांत देश खूपच मागे आहे. खरेतर कोविडोत्तर काळात देशी-विदेशी बाजारात खूप मोठे बदल दिसून येत आहेत. येथून पुढे वैशिष्टपूर्ण कृषी उत्पादने, खाद्य पदार्थ यांना ग्राहकांकडून मागणी वाढणार असून त्यांना दरही चांगला मिळू शकतो. याबाबत युरोपियन देश सुरवातीपासूनच सजग असल्याचे दिसून येते. युरोपने १३०० हून अधिक कृषी उत्पादनांना जीआय मिळवून दिला आहे. जीआय मिळालेल्या कृषी उत्पादनांचे पद्धतशीर ब्रॅंडिंग करून ते त्यांचे मार्केटिंग करीत आहेत. आपल्या देशातील शेतीही खूप वैशिष्टपूर्ण आहे. देशाच्या विविध भागातील माती, तेथील भौगोलिक परिस्थिती, स्थानिक हवामान यांत घेतलेली पिके, त्यांची देशी वाणे हे सर्व पाहता येथील हजारहून अधिक कृषी उत्पादनांना जीआय मिळू शकतो. असे असताना देशभरातील जेमतेम ११० कृषी उत्पादने व खाद्य पदार्थांना जीआय लाभले आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे यातील काही उत्पादने सोडले तर अनेकांची देशांतर्गत तसेच जागतिक बाजारात ओळख मिळवून देण्याबाबत पण संबंधित विभागांकडून फारसे प्रयत्नच झाले नाहीत. त्यामुळे जीआय उत्पादनांचे अपेक्षित लाभ उत्पादक शेतकऱ्यांसह देशाला मिळताना दिसत नाहीत. याबाबत आता उशिराने काही विभाग, संस्थांना जाग येत आहे. 

जीआय मिळालेल्या पिकांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना या पिकांचा अधिकृत वापरकर्ता म्हणून प्रमाणपत्र मिळवून देण्याबाबत महाराष्ट्रातील फलोत्पादन विभागाने मागच्याच महिन्यापासून मोहिम हाती घेतली आहे. तर आता देशभरातील २४ राज्यांतील जीआय प्राप्त उत्पादनांची ‘अपेडा’ने नोंदणी केली असून त्यांचे देश-विदेशात ब्रॅंडिंग करण्याबाबत धोरण निश्चित केले जात आहे. राज्यातील फलोत्पादन विभाग असो की अपेडा यांचे जीआय उत्पादनांचे ब्रॅंडिंग अन् मार्केटिंगबाबतचे प्रयत्न ‘देर आए दुरुस्त आए’ असेच म्हणावे लागतील.

जीआय म्हणजे एखाद्या विशिष्ट भूभागांतून विशिष्ट गुणधर्म असलेला पदार्थ निर्माण होतो किंवा केला जातो. जीआयमुळे शेतमालास वेगळी ओळख प्राप्त होते. असा शेतमाल जीआय टॅग लावून विशेष ब्रॅंडने विकता येतो. त्यामुळे ब्रॅंडेड उत्पादनांच्या बोगसगिरीच्या प्रकाराला आळा बसतो. वैशिष्टपूर्ण अशा उत्पादनास अधिकचा दर मिळतो. उत्पादकांसह ग्राहकांचा सुद्धा यात फायदा होतो. अशावेळी देशभरातील जीआय मानांकन लाभलेली शेती उत्पादने तसेच खाद्य पदार्थांचे नेमके वेगळेपण काय आहे, त्या उत्पादनांचे अधिक पोषणमूल्ययुक्त अथवा आरोग्यवर्धक गुणधर्म काय आहेत, हे देश-विदेशातील ग्राहकांना पटवून द्यावे लागतील. त्यानंतर आकर्षक पॅकिंग करून त्यावर सुद्धा ठळक अक्षरात त्या उत्पादनाच्या वेगळेपणाचा उल्लेख करावा लागेल.

देशभरातील जीआय कृषी उत्पादनांचा अपेडाने एकच ब्रॅंड करुन त्याचे जगभर मार्केटिंक करायला हवे. मार्केटिंग करताना नेमक्या कोणत्या उत्पादनांना कोणत्या देशातून अधिक मागणी आहे, याचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर आपल्या येथील निर्यातदार आणि त्या देशातील आयातदार यांचे सुद्धा जीआय उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी प्राधान्य देण्याबाबत प्रबोधन करावे लागेल. महत्वाचे म्हणजे हे सर्व करण्यासाठी अपेडा या संस्थेला प्रत्येक राज्यातील कृषी-फलोत्पादन-पणन विभाग यासह केंद्रातील कृषी तसेच वाणिज्य मंत्रालयांचे चांगले सहकार्य लाभायला हवे. या सर्वांच्या समन्वयातून आणि एकत्रित प्रयत्नांतूनच जीआय उत्पादनांचे जगभर यशस्वी मार्केटिंग शक्य आहे, हेही लक्षात घेतले पाहिजेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT