देशात यंदा १०२ टक्के पावसाची शक्यता : हवामान विभाग
देशात यंदा १०२ टक्के पावसाची शक्यता : हवामान विभाग 
मुख्य बातम्या

देशात यंदा १०२ टक्के पावसाची शक्यता : हवामान विभाग

टीम अॅग्रोवन

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता. १) जाहीर केला. या अंदाजात चार टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मध्य भारतात १०३ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. देशात जुलै महिन्यात १०३ टक्के तर ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पावसाची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन, हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी मॉन्सून पावसाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हवामान विभागाने १५ एप्रिल रोजी जाहिर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजामध्ये देशात १०० टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार १९६१ ते २०१० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८८ सेंटिमीटर म्हणजेच ८८० मिलिमीटर आहे. तर, सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. सुधारित अंदाजानुसार मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४१ टक्के), तर दुष्काळाची शक्यता ५ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

‘स्टॅटेस्टिकल एनसेंबल फोरकास्टिंग सिस्टिम’(एसईएफएस) मॉडेलचा वापर करून मॉन्सून हंगामातील पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज वर्तविण्यासाठी प्रिंसिपल काम्पोनंट रिग्रेशन (पीसीआर) मॉडेलचा आधार घेण्यात आला आहे. ‘आयएमडी’च्या मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिमनुसार (एमएमसीएफएस) यंदा सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच १०७ टक्के पाऊस पडणार असून, यातही चार टक्क्यांची कमी अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे.

हंगाम अखेरीस सौम्य ला-निना स्थिती विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसामान्य एल-निनो स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मॉन्सून हंगामात थंड एल-निनो स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. शेवटच्या टप्प्यात सौम्य ला-निना स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. प्रशांत महासागरात ला-निना स्थिती असल्यास देशात चांगला पाऊस पडतो असे समजले जाते. यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसामान्य आहे. मॉन्सून हंगामातही हीच स्थिती कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मॉन्सूनच्या पावसाची शक्‍यता
पावसाचे प्रमाण शक्‍यता
९० टक्‍क्‍यांहून कमी ५ टक्के
९० ते ९६ टक्के १५ टक्के
९६ ते १०४ टक्के ४१ टक्के
१०४ ते ११० टक्के २५ टक्के
११० टक्‍क्‍यांहून अधिक १४ टक्के
हवामान विभागनिहाय पावसाचा अंदाज
वायव्य भारत १०७ टक्के
मध्य भारत १०३ टक्के
दक्षिण भारत १०२ टक्के
ईशान्य भारत ९६ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT