पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची मालिका
पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची मालिका  
मुख्य बातम्या

पावसाने मोसंबीच्या उत्पादनातही संकटाची मालिका

Santosh Munde

औरंगाबाद : लिंबूवर्गीय फळपिकात 'राजा' पीक म्हणून ओळख असलेल्या मोसंबीच्या उत्पादनातही मॉन्सूनोत्तर पावसाने संकटाची मालिका उभी केली आहे. त्याचा थेट फटका मोसंबीच्या आंबिया बहार फुटण्यावर ४० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत होणार हे जवळपास स्पष्ट असून, उत्पादनातही तितकीच घट येण्याची शक्‍यता असल्याने सुमारे ९८५ कोटी रुपयांचे थेट नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. दुसरीकडे मोसंबी बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून मोठा प्रमाणात फांद्यांना 'आगारी'ही फुटते आहे. बुरशीजन्य रोगांमुळे झाडे जाण्याचे प्रमाण वाढले असून उत्पादन खर्चातही वाढ होत असल्याची माहिती मोसंबी उत्पादकांनी दिली.  राज्यात जवळपास १ लाख ८९ हजार हेक्‍टरवर लिंबूवर्गीय फळपिकांचे क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास सुमारे ९० हजार हेक्‍टरवर मोसंबी असून यामध्ये सर्वाधिक जवळपास ४० हजार हेक्‍टर क्षेत्र एकट्या मराठवाड्यात, १० हजार हेक्टर विदर्भात, तर २० हजार हेक्टर क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रात असून उर्वरित मोसंबीची क्षेत्र खानदेशात आहे.  साधारणपणे आंबिया बहार मोठ्या प्रमाणात घेणाऱ्या मोसंबी उत्पादकांनी अलीकडच्या काही वर्षांतील दुष्काळाचा अनुभव घेऊन दर बरे मिळत नसले तरी मृग बहार घेण्याकडे कल वाढविला आहे. मृग बहार नैसर्गिकरीत्या घेतल्या जातो, तर आंबिया बहारासाठी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान मोसंबी बागांना ताणावर सोडले जाते. मोसंबीच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ६० ते ७० टक्‍के क्षेत्रावर आंबिया तर ३० ते ४० टक्‍के क्षेत्रावर मृग बहार घेतला जातो. हेक्‍टरी २० ते २५ टनापर्यंत उत्पादन मोसंबी उत्पादक घेतात, तर ७ ते ५५ हजार रुपये प्रतिटनापर्यंत दर राहिल्याचे शेतकरी सांगतात.  अपवाद वगळता मोसंबीची बहुतांश विक्रीसाठी बागवानालाच बाग दिली जाते. गतवर्षी बहुतांश भागात दुष्काळाचे सावट होते, मराठवाड्यात पराकोटीचा दुष्काळ होता. अशाही स्थितीत मराठवाड्यातील मोसंबी उत्पादकांनी विकत पाणी घेऊन बागा जगवत काही प्रमाणात उत्पादनक्षमही बनविल्या. प्रचंड संकटात विकतच्या पाण्यावर मृग बहार घेणाऱ्या मोसंबी उत्पादकांना ऑक्‍टोबरमध्ये अवेळी व अतिप्रमाणात झालेला पाऊस पोषक ठरला असला तरी मोसंबीच्या आंबिया बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांचे बागा ताणावर सोडण्याचे स्वप्न या पावसाने भंग केले आहे. त्याचे दूरगामी परिणाम मोसंबी बागांवर होणार असून ताणातील अडथळा फुलोरा (फ्लॉवरिंग) साठी ४० ते ५० टक्‍के बाधित करण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे शेतकरी व तज्ज्ञ सांगतात.  झाडांची झाली ‘दमकोंडी’ मोसंबीच्या बागांमध्ये आधी पाऊस नसणे व नंतर सतत पाऊस ढगाळ हवामान यामुळे बहुतांश भारी जमिनीतील बागांमध्ये फांद्या वाळणे, पान पिवळी पडणे, तंतुमय मूळ कुजणे, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणे, प्राणवायू खेळता न राहणे परिणामी अन्नद्रव्य वहन न होणे, झाड पिवळी पडून संपणे आदींचे प्रमाण जवळपास २० ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत गेले असल्याचे तज्ज्ञ व शेतकरी सांगतात.  मोसंबीचे असे होत आहे नुकसान...

  •    आंबिया बहाराच्या ताणात अडथळा
  •    बागांमध्ये वाढला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव
  •    फुलोरा अवस्थांत ४० ते ५० टक्‍के फटका 
  •    मोठ्या प्रमाणात फुटते आहे 'आगारी'
  •    बुरशीजन्य रोगांना झाडेही पडताहेत बळी 
  •    थंडी, तापमानावरती बरंच काही अवलंबून
  •    उत्पादन खर्चात होते आहे वाढ
  • दृष्टिक्षेपात मोसंबी हंगाम

    मराठवाडा   ४० हजार हेक्टर
    विदर्भ    १० हजार हेक्टर
    पश्‍चिम महाराष्ट्र २० हजार हेक्टर 
    खानदेश व इतर विभाग   २० हजार हेक्टर
    हेक्टरी उत्पादन  २० ते २५ टन
    आंबिया बहार क्षेत्र ६० ते ७० टक्के
    मृग बहार क्षेत्र   ३० ते ४० टक्के
    यंदाचे नुकसान आंबिया बहार  ४० ते ५० टक्के
    सरासरी दर  १७ हजार रुपये
    एकूण नुकसान ९८५ कोटी रुपये

    प्रतिक्रिया अति पावसामुळे बागेतील ओल हटण्याचे नाव घेईना. ती हटण्यासाठी रोटार मारले, उपाय करतोय पण पुढे वातावरण कसं राहील यावर आंबिया बहाराचे भवितव्य अवलंबून आहे. गतवर्षी दोन ते अडीच कोटी लिटर पाणी विकत घेऊन बाग जगविली. पाणी कमी पडल्यानं फळ टिकली नाही यंदा आंबिया बहारात अति पावसानं अडथळे सुरू केले. फुटणारी नवती उत्पादनात घट होण्याचे संकेत आहेत.  - गणेश किडे, मोसंबी उत्पादक, बोधलापूरी,  ता. घनसावंगी, जि. जालना. 

    अति पावसाला संवेदनशील असलेल्या मोसंबीच्या बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. झाडं बुरशीजन्य रोगाला बळी पडताहेत. आंबे बहाराचं गणित ताणातील अडथळ्याने अवघड झालं. हीच ती वेळ आहे की मोसंबी उत्पादकांनी बहार व्यवस्थापन समजून घेऊन मृग बहार घेतलेल्या बागा आंबे बहारासाठी ताणावर सोडण्याचा प्रयत्न न करता एकाच बहाराचे शास्त्रोक्‍त व्यवस्थापन करून चांगले उत्पादन घ्यावे. - डॉ. संजय पाटील, शास्त्रज्ञ तथा प्रमुख,  मोसंबी फळ संशोधन केंद्र बदनापूर जि. जालना.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

    Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

    Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

    Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

    Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

    SCROLL FOR NEXT